Maharashtra State Legislature : बहुप्रतीक्षित अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बिगुल वाजले; ‘या’ तारखेला होणार सुरु

110
Maharashtra State Legislature building with statue
Maharashtra State Legislature : बहुप्रतीक्षित अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बिगुल वाजले; 'या' तारखेला होणार सुरु
  • प्रतिनिधी

​महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या बहुप्रतीक्षित अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बिगुल वाजले असून, सोमवार २३ फेब्रुवारी २०२६ पासून मुंबईत या राजकीय रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. आज विधानभवन येथे पार पडलेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत २५ मार्चपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाचा अधिकृत आराखडा निश्चित करण्यात आला. राज्याचा सर्वांगीण लेखाजोखा मांडणारा अर्थसंकल्प ६ मार्च २०२६ रोजी सादर केला जाणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. (Maharashtra State Legislature)

​या अधिवेशनाची सुरुवात भावूक वातावरणात होणार आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडला जाईल. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर दिग्गज नेते उपस्थित होते. (Maharashtra State Legislature)

(हेही वाचा – Dombivli : माणूसच उठला झाडांच्या मुळावर; हिरव्या सावरीवर कुऱ्हाडीचे घाव)

​महिला शेतकऱ्यांसाठी विशेष चर्चा आणि सुट्ट्यांचा मेळ

​संयुक्त राष्ट्र संघाने २०२६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले असल्याने, या अधिवेशनात राज्यातील महिला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर मंथन होणार आहे. तसेच ९ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष चर्चा आणि निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ हे या अधिवेशनाचे मुख्य आकर्षण असतील. (Maharashtra State Legislature)

​अधिवेशनाच्या वेळापत्रकात सुट्ट्यांचा विचार करून काही बदल करण्यात आले आहेत. २ मार्च रोजी होळी आणि ३ मार्चला धूलिवंदन असल्याने कामकाज बंद राहील. तसेच १९ मार्चला गुढीपाडवा आणि २० मार्च रोजी सुट्टी असेल. मात्र, शनिवार २८ फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टी असूनही विधिमंडळाचे कामकाज सुरू राहणार आहे. राज्याच्या विकासाचे धोरण ठरवणारे हे अधिवेशन राजकीय संघर्षाचे आणि महत्त्वाच्या निर्णयांचे केंद्र ठरेल, अशी चिन्हे आहेत. (Maharashtra State Legislature)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.