-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांमध्ये अभियंत्यांकडून कामचुकारपणा करून दुर्लक्ष केला जात असल्याने अखेर या कामांमध्ये कोणातरी अभियंत्यांवर कारवाई होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. ही शक्यताच आता सत्यात उतरली आहे. एच (पश्चिम) विभागात एका रस्ते कामात ‘सब बेस लेयर’ म्हणून वापरल्या जाणाऱ्या ड्राय लीन काँक्रिट मिश्रणात गुणवत्तेचा अभाव आढळून आल्यावर संबंधित दुय्यम अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, रस्ते कंत्राटदाराला ५० लाख रुपये आणि गुणवत्ता नियंत्रण संस्थेस २५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, निकृष्ट दर्जाचे काम त्वरित काढून टाकून पुन्हा दर्जेदार पद्धतीने काम करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. (CC Road)
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार ही सक्त कारवाई करण्यात आली आहे. रस्ते कॉंक्रिटीकरण कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा, निष्काळजीपणा अथवा त्रुटी खपवून घेतली जाणार नाही. जिथे दोषपूर्ण प्रकार आढळतील तिथे सर्व संबंधित जबाबदार व्यक्ती अथवा संस्था यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिका आयुक्तांनी दिला आहे. (CC Road)
(हेही वाचा – Crime News : नैनीतालमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मोहम्मद उस्मानवर गुन्हा दाखल ; हिंदू संघटनांनी केला निषेध)
रस्ते कॉंक्रिटीकरण कामांवर देखरेख आणि निरीक्षण करण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर हे नियमितपणे विविध प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन रस्ते कामांची पाहणी करत आहेत. याच अनुषंगाने, बांगर यांनी ७ एप्रिल २०२५ रोजी पश्चिम उपनगरातील एच (पश्चिम) विभागातील रस्ते कामांना आकस्मिक भेट दिली. ड्राय लीन काँक्रिटचे निरीक्षण केले असता ग्रेडेशन, मिक्स डिझाईन, कॉम्पक्शन इत्यादी बाबतीत गुणवत्तेचा अभाव आढळून आला. पृष्ठभागावर उंच सखलता व असमानता या त्रुटी आढळून आल्या. याची गंभीर दखल घेत, महानगरपालिकेचे दुय्यम अभियंता, कंत्राटदार आणि गुणवत्ता नियंत्रण संस्थायांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली. (CC Road)
ड्राय लीन काँक्रिटचा क्युरिंग कालावधी कमीत कमी सात दिवसांचा आवश्यक आहे. प्रत्यक्ष कार्यस्थळी विचारणा केली असता संबंधितांनी ड्राय लीन काँक्रिट होऊन सात दिवस पूर्ण झाल्याचे सांगितले. तथापि, प्रत्यक्षात तीनच दिवस पूर्ण झाल्याचे कंत्राटदाराने लेखी खुलासापत्रात मान्य केले. तसेच, तांत्रिक तपशिलांनुसार आवश्यक असलेली फील्ड ड्राय डेन्सिटीही चाचणी आकुंचनाच्या वेळेस करण्यात आली नसल्याचे देखील स्पष्ट झाले. (CC Road)
(हेही वाचा – अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यात २६ Child Marriage रोखण्यात यश)
या सर्व प्रकारची गंभीर दखल घेत निष्काळजीपणा आणि दुर्लक्षितपणा केल्याबद्दल दुय्यम अभियंता, कंत्राटदार आणि गुणवत्ता देखरेख संस्था यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसेच खुलासा मागविण्यात आला. परंतु, संबंधितांकडून प्राप्त खुलासा असमाधानकारक असल्याने तो अमान्य करण्यात आला. यामुळे, संबंधित दुय्यम अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर, रस्ते कंत्राटदाराला ५० लाख रुपये आणि गुणवत्ता नियंत्रण संस्थेस २५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, निकृष्ट दर्जाचे काम त्वरित काढून टाकून पुन्हा ते काम दर्जेदार पद्धतीने करण्याचेदेखील निर्देश कंत्राटदारास देण्यात आले आहेत. (CC Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community