Vaibhav Sooryavanshi ने ड्रेसिंगरुमध्ये कुणाच्या पाया पडून घेतले आशीर्वाद? Video व्हायरल, चाहत्यांकडून कौतुक

94
Vaibhav Sooryavanshi receiving blessings in dressing room.
Vaibhav Sooryavanshi seeks blessings from a senior figure.

Vaibhav Sooryavanshi : सोमवारी, भारत आणि श्रीलंका (India vs Srilanka) यांच्यामध्ये  झालेला सामना जितका रंगला, त्यापेक्षा जास्त सामन्यानंतर वैभव सूर्यवंशीचा मैदानावर झालेला वाद अधिक चर्चेत राहिला. मात्र, सध्या वैभव सूर्यवंशीचा ड्रेसिंगरुमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका ज्येष्ठ व्यक्तीच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहे, ज्यामुळे वैभवच्या चाहत्यांकडून आणि नेटकऱ्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

अनुरा टेन्नेकून यांची विशेष भेट

वैभव सूर्यवंशीच्या वादाच्या व्हिडीओ पाठोपाठ, आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये वैभव सूर्यवंशी श्रीलंकेचे माजी कर्णधार अनुरा टेन्नेकून (anura tennekoon) यांच्या पाया पडताना दिसत आहे. 1975 च्या पहिल्या क्रिकेट विश्वचषकात श्रीलंका संघाचे नेतृत्व करणारे अनुरा टेन्नेकून, हे श्रीलंकन क्रिकेटमधील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व मानले जातात. त्यांनी दांबुलामध्ये वैभवची भेट घेत, त्याला खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि बाहेरील चर्चांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Gold Silver Price Today 16 June 2026: सोन्या-चांदीचे भाव वधारले, तुमच्या शहरात 10 ग्रॅमचा भाव काय?

सुपर ओव्हरनंतर मैदानावर रंगला वाद

दरम्यान, दांबुला येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 50 ओव्हरमध्ये 265 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंका अ संघानेही 265 धावांपर्यंत मजल मारल्याने सामना टाय झाला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये श्रीलंका अ संघाने भारतावर 8 धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतर मैदानातून परतताना काही श्रीलंकन खेळाडू आणि वैभव सूर्यवंशी यांच्यात शाब्दिक वाद झाला. परिस्थिती इतकी तापली की दोन्ही बाजूंच्या खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली.

सामन्यातील वैभवची कामगिरी

या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 14 चेंडूत 21 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. मात्र त्याला पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. श्रीलंका दौऱ्यात त्याने आतापर्यंत 14, 44 आणि 21 अशा धावा केल्या आहेत.

हेही वाचा: Pune-Sainagar Shirdi Express : साई भक्तांसाठी पुणे- साईनगर शिर्डी दैनंदिन रेल्वे होणार सुरू

दरम्यान, IPL 2026 मधील दमदार कामगिरीनंतर वैभव सूर्यवंशीकडे भारतीय क्रिकेट वर्तुळाचे विशेष लक्ष आहे. शानदार हंगामानंतर त्याला भारत अ संघात संधी मिळाली. त्यामुळे मैदानावरील प्रत्येक घटना आणि त्याची कामगिरी चर्चेचा विषय ठरत आहे. अशा परिस्थितीत वादानंतरही ज्येष्ठ क्रिकेटपटूंचा सन्मान करताना दिसलेल्या वैभवच्या कृतीचे सोशल मीडियावर अनेकांकडून कौतुक केले जात आहे.

एका बाजूला मैदानावरील आक्रमकता आणि दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ क्रिकेटपटूंसमोर दाखवलेला नम्रपणा यामुळे वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. दांबुलातील हा प्रसंग युवा खेळाडूंनी स्पर्धात्मक वृत्तीबरोबरच क्रिकेटमधील परंपरा आणि वरिष्ठांचा आदर कसा जपावा, याचे उदाहरण म्हणून पाहिला जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.