-
ऋजुता लुकतुके
Rohit Sharma Selectors Controversy : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरच्या पदाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, रोहित शर्मा प्रकरणामुळे त्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. BCCI निवड प्रक्रियेचा आढावा घेत असून भविष्यात निवड समितीच्या नेतृत्वात बदल होण्याची तसंच निवडीची रणनीती बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या चर्चेचा केंद्रबिंदू रोहित शर्माला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून दूर करण्याचा निर्णय ठरला आहे. २०२५ मध्ये रोहितच्या जागी शुभमन गिलकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. त्या निर्णयामागे संघाच्या दीर्घकालीन नियोजनाचा विचार करण्यात आल्याचे आगरकर यांनी स्पष्ट केले होते. मात्र या निर्णयावर क्रिकेट वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता रोहित प्रकरण आगरकरनी कसं हाताळलं यावर चर्चा सुरू झाली आहे.
(हेही वाचा – RBI MCP Meeting : आरबीआय दर स्थिर ठेवणार का? ऑगस्ट पतधोरण बैठकीकडे लक्ष )
ताज्या अहवालांनुसार, BCCI मध्ये आगरकरच्या जागी काही माजी दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. भविष्यात निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी एका माजी भारतीय महान खेळाडूचा विचार केला जाऊ शकतो, अशी अटकळ व्यक्त केली जात आहे. तथापि, BCCI कडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
आगरकरच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स करंडक यांसारख्या स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. तसेच संघात युवा खेळाडूंना संधी देण्याच्या धोरणालाही त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील कामगिरीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे मत अनेक माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केले आहे.
सध्या उपलब्ध माहिती ही प्रामुख्याने माध्यमांतील अहवालांवर आधारित असून, आगरकर यांच्या पदावर तातडीने कोणताही निर्णय झाल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या घडामोडीकडे क्रिकेट वर्तुळात उत्सुकतेने पाहिले जात असून, आगामी काळात BCCI ची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

