Asian Champions Trophy : जपानचा ५-० ने धुव्वा उडवत भारतीय संघ अंतिम फेरीत

पहिल्या पंधरा मिनिटांनंतर भारतीय संघाने गोलचा लावला धडाका

94
Asian Champions Trophy : जपानचा ५-० ने धुव्वा उडवत भारतीय संघ अंतिम फेरीत
Asian Champions Trophy : जपानचा ५-० ने धुव्वा उडवत भारतीय संघ अंतिम फेरीत
  • ऋजुता लुकतुके

पहिली पंधरा मिनिटं गोल शिवाय गेली. पण, नंतर भारतीय संघाने गोलचा धडाकाच लावला, जो शेवटपर्यंत टिकला. आता अंतिम फेरीत गाठ मलेशियाशी असेल. चेन्नईच्या राधाकृष्णन मैदानात भारत विरुद्ध जपान असा आशियाई चॅम्पिअन्स करंडकाचा उपांत्य सामना सुरू झाला तेव्हा प्रेक्षक आणि जाणकारही भारतीय संघाच्या बाजूने होते. एकतर साखळी सामन्यांमध्ये भारतीय संघ अपराजित होता. आणि सूर गवसलेल्या संघासाठी घरचे प्रेक्षक आवाज करणारच.

त्याचमुळे असेल कदाचित सामन्यात जम बसवायला भारतीय संघाला थोडा वेळ लागला. त्यातच भारतीय संघ पहिल्या सेकंदापासून आक्रमक होता आणि जपानचा संघ अभेद्य बचावाचं प्रात्यक्षिक घडवत होता. त्यामुळे पहिल्या काही मिनिटांत भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला तेव्हा कर्णधार मनप्रीत सिंगचा चेंडू जपानी गोलकीपर ताकाशी योशिकावाने बिनचूक अडवला. पहिल्या क्वार्टरमध्ये पुढचा सगळा वेळही गोल शिवायच गेला. चेंडूचा ताबा भारताकडे होता. पण, जपानचा बचावही चांगला होता. त्यामुळे सुरुवातीला वाटलं सामना तुल्यबळ होणार. शेवटी साखळी सामन्यात भारताने एकमेव सामना बरोबरीत सोडवला होता तो जपान विरुद्धच होता. तीच शंका इथंही वाटायला लागली.

(हेही वाचा – Axis Hypersomnia : ३०० दिवस झोपणारा खराखुरा कुंभकर्ण)

पण, दुसरा क्वार्टर सुरू झाला आणि मनप्रीत तसंच आकाशदीपने खेळाचा नूरच पालटला. भारताच्या चढाया सुरू झाल्या आणि यावेळी त्यात अचूकताही होती. त्या जोरावर १९ व्या मिनिटाला संघाला पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावेळी हार्दिक सिंगने मारलेला फटका गोलकीपरने अडवला. पण, चेंडूचा ताबा त्याला राखता आला नाही. आणि परत आलेला चेंडू चपळपणे पुन्हा गोलजाळ्यात भिरकावत आकाशदीपने संघाचा पहिला गोल केला. त्यानंतर भारतीय संघाची अवस्था रक्ताची चटक लागलेल्या वाघासारखी होती. ठरावीक अंतराने गोल होतच गेले.

२३ व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर चेंडू बरोबरच गोलजाळ्याच्या कोपऱ्यात ढकलला. आणि मध्यंतराला काही मिनिटं शिल्लक असताना यावेळी मनदीपने संघाचा तिसरा गोलही केला. थोडक्यात एका क्वार्टरमध्ये भारतीय संघाने सलग तीन गोल केले. संघाची आक्रमकता जराही ढिली पडली नव्हती. आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये सुमितने संघासाठी चौथा गोल केला. हा गोल कदाचित स्पर्धेतील सर्वोत्तम ठरावा. मनदीपने उजव्या बगलेतून चाल रचत चेंडू योग्य वेळी सुमितकडे दिला. आणि सुमितने क्रिकेटमध्ये रिव्हर्स स्वीप खेळतात तसा हॉकीच्या मागच्या बाजूने बॅक फ्लिक मारत चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. युवा कार्ती सेल्वनने मग ५१ व्या मिनिटाला पाचवा गोल करत विजयात आपलाही वाटा उचलला. भारतीय संघाने आतापर्यंत या स्पर्धेत दमदार खेळ केला आहे. आणि आता संघाकडे विजेतेपदाची संधीही चालून आली आहे. शनिवारी अंतिम फेरीत भारतीय संघाची गाठ मलेशियाशी पडेल. तर जपान आणि कोरियाचे संघ तिसऱ्या स्थानासाठी झुंज देतील.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.