Ind vs SA 3rd ODI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला हवी आघाडीच्या फळीकडून दमदार सुरूवात

एकदिवसीय मालिकेत कामगिरीत सातत्याचा अभाव भारतीय संघाला भोवला आहे 

131
Ind vs SA 3rd ODI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला हवी आघाडीच्या फळीकडून दमदार सुरूवात
Ind vs SA 3rd ODI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला हवी आघाडीच्या फळीकडून दमदार सुरूवात

ऋजुता लुकतुके

भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ गुरुवारी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी (Ind vs SA 3rd ODI) आमने सामने येतील तेव्हा दोघांसमोर सारखीच आव्हानं असतील. म्हणजे हा सामना जिंकून दोन्ही संघांना मालिका आपल्या नावावर करायची असेल. कारण, सध्या मालिकेत १-१ अशी बरोबरी आहे. शिवाय दोन्ही संघांना खेळात सातत्य दाखवून द्यायचं असणार, जे आधीच्या सामन्यांत दोघांनाही जमलं नाहीए.

जोहानसबर्गच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघाने वर्चस्व गाजवलं. पण, तोच संघ गेबेखात पार ढेपाळला. आणि कसंबसं २११ धावांचं आव्हान संघाला उभं करता आलं. महत्त्वाचं म्हणजे पूर्ण ५० षटकंही ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, रिंकू सिंग, तिलक वर्मा, के एल राहुल यांच्या संघाला खेळून काढता आली नाहीत. नंतर गोलंदाजीत अर्शदीप वगळता एकालाही अचूक टप्प्याने गोलंदाजी करता आली नाही.

म्हणजेच जोहानसबर्गमध्ये भारतीय संघाने जे मिळवलं ते गेबेखामध्ये गमावलं. नाही म्हणायला साई सुदर्शन पदार्पणाच्या मालिकेत चांगली कामगिरी करतोय. आणि युवा अर्शदीप सिंगही फॉर्ममध्ये आहे ही भारतीय संघासाठी जमेची बाजू आहे. दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार के एल राहुलने संघाला खडे बोल सुनावले होते. ‘पराभवासाठी सर्वस्वी आमचा निकृष्ट खेळ जबाबदार आहे. खेळाडूंना आता वेळेत आपला खेळ सुधारावा लागेल,’ असं सामन्यानंतर तो म्हणाला होता.

(हेही वाचा-U.R. Ananthamurthy : कन्नड साहित्यिक उडुपी राजगोपालाचार्य अनंतमूर्ती)

आता सुधारणा करण्याची वेळ आलीय. शेवटचा एकदिवसीय सामना ही सुधारणा दाखवून द्यायची शेवटची संधी आहे. नंतर वेळ निघून गेलेली असेल. आणि त्यासाठी भारताच्या आघाडीच्या फळीला चांगल्या धावा कराव्या लागतील. सुदर्शनच्या बरोबरीने सलामीवीर ऋतुराज गायकवाडलाही आपला वाटा उचलावा लागेल. आणि तिलक वर्माला समंजसपणे फलंदाजी करावी लागेल.

आवेश खान आणि मुकेश कुमार यांना कामगिरीत सातत्य आणावं लागेल. कुलदीप, अक्षर यांनाही आफ्रिकन खेळपट्टीशी जुळवून घ्यावं लागेल.

दुसरीकडे आफ्रिकन संघासमोरही तेच आव्हान आहे. पहिल्या सामन्यात (Ind vs SA 3rd ODI) ढेपाळल्यानंतर त्यांनी बहुतेक चुका दुसऱ्या सामन्यात सुधारल्या खऱ्या. पण, आता त्यात सातत्य राखण्याची गरज आहे. आणि सलामीला रिझा हेनरिक्स आणि टोनी डी झोर्जी चांगली कामगिरी करतायत. पुढे मार्करम, व्हॅन डेअर ड्युसेन यांनी धावांचा डोलारा उभारण्याची गरज आहे.

गोलंदाजीत त्यांना अपेक्षा असेल ती नांद्रे बर्गरकडून. दुसऱ्या सामन्यात त्याने भारतीय फलंदाजांच्या नाकी नऊ आणले होते. आताही त्याची दहा षटकं सामन्यात निर्णायक ठरू शकतात.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.