
- ऋजुता लुकतुके
इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) पुन्हा एकदा टी-20 क्रिकेटमध्ये मोठी एन्ट्री करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून (International Test Cricket) निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता स्टोक्स ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग (BBL) मध्ये खेळण्याच्या मार्गावर असल्याचं समोर आलं आहे.
स्टोक्सला सिडनी सिक्सर्स संघाकडून आकर्षक आर्थिक ऑफर मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा माजी प्रशिक्षक मॅथ्यू मॉट नुकतेच सिडनी सिक्सर्सच्या प्रशिक्षकपदी नियुक्त झाले आहेत. स्टोक्स आणि मॉट यांनी २०२२चा टी-20 विश्वचषक एकत्र जिंकला होता. त्यामुळे या दोघांमधील जुने संबंध सिडनी सिक्सर्सला फायदेशीर ठरू शकतात.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि खेळाडू संघटना यांच्यातील करार प्रक्रियेचे काम पूर्ण झाल्यानंतर परदेशी खेळाडूंसाठी कराराचे दरवाजे उघडतील. त्यानंतर स्टोक्सच्या कराराची अधिकृत घोषणा होऊ शकते. काही वृत्तांनुसार, या कराराची किंमत ३ लाख ऑस्ट्रेलियन डॉलरपेक्षा अधिकअसू शकते.
(हेही वाचा – Uttar Pradesh मधील वाँटेड गँगस्टर निशांत सिंग याला मुंबईत अटक)
स्टोक्सने अलीकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खेळण्याबाबत त्याने कोणतीही दारे बंद केलेली नाहीत. इंग्लंड क्रिकेट मंडळातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही “बेनबाबत काहीही शक्य आहे” असे म्हणत त्याच्या भविष्यातील क्रिकेट कारकिर्दीबाबत संकेत दिले आहेत. स्टोक्स यापूर्वी २०१३-१४ हंगामात मेलबर्न रेनेगेड्सकडून बिग बॅशमध्ये खेळला होता. त्यानंतर त्याने या स्पर्धेत भाग घेतलेला नाही. त्यामुळे जवळपास दशकभरानंतर त्याची BBLमध्ये पुनरागमनाची शक्यता निर्माण झाली आहे.
सिडनी सिक्सर्सव्यतिरिक्त होबार्ट हरिकेन्स संघानेही स्टोक्समध्ये रस दाखविल्याचे वृत्त आहे. मात्र सध्या सिडनी सिक्सर्स (Sydney Sixers) हा सर्वात प्रबळ दावेदार मानला जात आहे.
स्टोक्सच्या संभाव्य आगमनामुळे बिग बॅश लीगची लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता आहे. जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रभावशाली अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जाणारा स्टोक्स पुन्हा टी-20 क्रिकेटमध्ये दिसणार का, याकडे आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
