
-
ऋजुता लुकतुके
Share Market New Timings : भारतीय शेअर बाजारात ३ ऑगस्ट २०२६पासून फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) शेअर्सच्या व्यवहाराच्या वेळेत महत्त्वाचा बदल होणार आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) यांनी Closing Auction Session (CAS) लागू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे F&O विभागातील व्यवहार आणि बाजार बंद होण्याची वेळ बदलणार आहे.
F&O शेअर्समधील रोख बाजारातील नियमित व्यवहार दुपारी ३:१५ वाजता थांबतील. त्यानंतर ३:१५ ते ३:३५ या वेळेत क्लोजिंग ऑक्शन सेशन होईल. या कालावधीत खरेदी-विक्रीचे आदेश गोळा करून एका समतोल किमतीवर व्यवहार केले जातील आणि तीच त्या शेअरची अधिकृत बंद किंमत (closing price) मानली जाईल.
याचवेळी स्टॉक आणि इंडेक्स डेरिव्हेटिव्ह्ज (फ्युचर्स आणि ऑप्शन्स) व्यवहाराला अतिरिक्त १० मिनिटे दिली जाणार आहेत. त्यामुळे F&O विभाग दुपारी ३:४० वाजता बंद होईल, तर यापूर्वी ही वेळ ३:३० होती. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह्ज व्यवहारासाठी गुंतवणूकदारांना आणि ट्रेडर्सना आणखी १० मिनिटांचा वेळ मिळणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे F&O विभागाबाहेरील शेअर्सच्या व्यवहाराच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही. हे शेअर्स पूर्वीप्रमाणे सकाळी ९:१५ ते दुपारी ३:३० या वेळेत व्यवहारासाठी खुले राहतील. तसेच पोस्ट-क्लोज सत्र ३:५० ते ४:०० या वेळेत सुरू राहील.
(हेही वाचा – शिवछत्रपतींच्या ‘शुद्धीकरण मोहिमेला’ ३५० वर्षे पूर्ण; Solapur मध्ये ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिना’निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन)
सेबीने हा बदल करण्यामागील मुख्य उद्देश बंद किमतीची अधिक अचूक आणि पारदर्शक किंमत निश्चित करणे हा आहे. आतापर्यंत F&O शेअर्सची बंद किंमत शेवटच्या ३० मिनिटांतील Volume Weighted Average Price (VWAP) वर आधारित होती. मात्र मोठ्या व्यवहारांमुळे ही किंमत बदलण्याची शक्यता असल्याने आता स्वतंत्र लिलाव पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.
नव्या प्रणालीमुळे किंमत शोध प्रक्रिया (price discovery) अधिक कार्यक्षम होईल, तसेच डेरिव्हेटिव्ह्ज व्यवहारातील सेटलमेंट किंमत अधिक वास्तववादी ठरेल, असा विश्वास नियामक संस्थांनी व्यक्त केला आहे.
या बदलाचा सर्वाधिक परिणाम F&O ट्रेडर्स, अल्गोरिदमिक ट्रेडर्स आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांवर होणार आहे. त्यामुळे ३ ऑगस्टपासून व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांनी नव्या वेळापत्रकाची नोंद घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
