Aditi Swami : तिरंदाजीतील भारताच्या ‘या’ उगवत्या ताऱ्याविषयी ५ महत्त्वाच्या गोष्टी

तिरंदाजी जागतिक स्पर्धेत अदिती स्वामीने दुहेरी सुवर्ण पटकावून अतुलनीय कामगिरी केली

530
  • ऋजुता लुकतुके

जर्मनीत सुरू असलेल्या तिरंदाजी जागतिक स्पर्धेत अदिती स्वामीने दुहेरी सुवर्ण पटकावून अतुलनीय कामगिरी केली. सांघिक तसंच एकेरीत सुवर्ण जिंकणारी ती एकमेव तिरंदाज ठरली आहे. आणि तिचं वय आहे अवघं १७ वर्षांचं. युवा तिरंदाज अदिती स्वामीने अवध्या सतराव्या वर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कम्पाऊंड प्रकारात सांघिक आणि एकेरी प्रकारात दोन सुवर्ण पदकं जिंकली. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय तिरंदाज ठरली आहे. या कामगिरीमुळे अदितीचं सगळीकडे कौतुक होत आहे.

अदितीचा विजेतेपद मिळवतानाचा आणि पोडिअमवर चढून पदक स्वीकारतानाचा व्हीडिओ इथं तुम्ही पाहू शकता.

आपल्या कामगिरीने अदिती स्वामी सध्या प्रकाशझोतात आली आहे. ती अजून भारतात परतलेली नाही. पण, तिचं जोरदार स्वागत नवी दिल्लीत केलं जाईल हे नक्की. अशा या अदितीविषयी तुम्हाला माहीत नसलेल्या पाच गोष्टी इथं जाणून घेऊया…

महाष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मूळ गाव

अदिती सातारा जिल्हयातली शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे. साताऱ्यापासून पंधरा किलोमीटरवर अंतरावर तिचं मूळ गाव आहे. पण, खेळाची आवड असलेल्या वडिलांनी तिला आठव्या वर्षी साताऱ्यात आणलं. वडील गोपीचंद स्वामी सरकारी शाळेत गणिताचे शिक्षक आहेत. तर आईही सरकारी कर्मचारी आहे. वडिलांनी अदितीला दहाव्या वर्षी साताऱ्यातल्या शाहू स्टेडिअमवर नेलं. तिथं एखाद्या प्रशिक्षण कार्यक्रमात तिला भरती करावं असा त्यांचा विचार होता. अदितीला आवडला तिरंदाजी हा खेळ. ती तिरंदाजीच्या प्रशिक्षण वर्गाजवळ गेली तेव्हा तिथे काही मुलं आपला धनुष्याची आणि भात्याची जुळवाजुळव करत होती.

तेव्हाच तिने तिरंदाजी हा खेळ पहिल्या नजरेत स्वत: साठी निवडला. या खेळाचे तिथले प्रशिक्षक प्रवीण सावंत यांना सुरुवातीला अदिती या खेळासाठी योग्य वाटत नव्हती. लहान चणीची आणि कमजोर अदिती धनुष्याचं वजनही पेलेल की नाही, असं त्यांना वाटलं. पण, वडील गोपीचंद यांच्या आग्रहामुले अदितीला थोडा वेळ द्यायला ते तयार झाले. शिवाय हा काळ होता २०१६ चा. आंतरराष्ट्रीय तिरंदाजीतही बदल होत होते. रिकर्व्ह च्या जोडीला कम्पाऊंड तिरंदाजीचाही जम बसत होता. आणि या प्रकारात बाणाच्या उंचीवर मर्यादा असल्याने उंचीने कमी तिरंदाजही कम्पाऊंडमध्ये यश मिळवू शकत होते. म्हणून प्रवीण यांनी अदितीला शिकवायचं मान्य केलं आणि तिची ग्रहण क्षमता बघून लवकरच ती त्यांची लाडकी बनली.

५२ मिनिटांचं राष्ट्रगीत वाजताना ऐकायचं होतं

तिरंदाजीत स्थानिक मैदान गाजवायला अदितीने सुरुवात केली तेव्हापासून तिचा एकच ध्यास होता. जागतिक पातळीवर खेळताना तिच्यासाठी राष्ट्रगीत वाजलेलं तिला ऐकायचं होतं. ही तिची इच्छा पहिल्यांदा पूर्ण झाली ती २०१८ साली तिने ज्युनिअर गटात अजिंक्यपद पटकावलं तेव्हा. आणि आताच्या अजिंक्यपद स्पर्धेतही तिला अशीच कामगिरी करायची होती. उपान्त्य फेरीत तिने आपली आदर्श खेळाडू ज्योती वेन्नमला हरवलं होतं. तेव्हापासूनच तिला जिंकण्याची आशा निर्माण झाली होती.

त्यामुळे अंतिम सामन्यापूर्वी घरी वडिलांशी बोलताना तिने एकच सांगितलं, ‘माझ्यासाठी बर्लिनमध्ये राष्ट्रगीत वाजलेलं मला पाहायचंय.’ आणि तिची ही इच्छा पूर्ण झाली. अंतिम फेरीत मेक्सिकोच्या आंद्रिया बेरेकाला १४९-१४७ असं हरवत तिने सुवर्ण जिंकलं. अदिती आत्मविश्वासाने भारलेली आहे. आणि कठीण काळातही तिचा मानसिक तोल ढळत नाही, असं तिचे संघसहकारी तिच्याविषयी म्हणतात.

एक दिवसही सरावात खंड नाही

१२ व्या वर्षी स्पर्धात्मक तिरंदाजीला सुरुवात केल्यावर प्रवीण यांनी एक एकर ऊसाच्या शेतात उभ्या केलेल्या तिरंदाजी केंद्रात ती सराव करते. पहिली दोन वर्षं ती भारतीय धनुष्य बाणाने खेळत होती. पण, नंतर स्पर्धात्मक तिरंदाजीच्या दृष्टीने तिने आंतरराष्ट्रीय मापदंड असलेला धनुष्य वापरायला सुरुवात केली. अदितीला प्रेरणा मिळावी म्हणून वडील गोपीचंद तिला दीपिका कुमारी आणि अभिषेक वर्मा या देशातील आघाडीच्या तिरंदाजांचे व्हीडिओ दाखवायचे.

त्यांच्यासारखं बनण्यासाठी मग अदितीचा सराव सुरू व्हायचा. अगदी कोरोनाच्या काळातही अदितीने आपला सराव थांबला नाही, असं तिचे वडील अभिमानाने सांगतात. तिच्या घरच्या आवारात तिचा सराव सुरूच होता. अगदी सणाचे दिवस असले तरी अदिती सकाळचा वेळ घरी सण साजरा करते. आणि दुपारपासून लगेच सरावाच्या ठिकाणी हजर होते.

सरावासाठी वडिलांनी घेतलं १० लाखांच्या वर कर्ज

कुठलाही खेळ खेळायचा तर आर्थिक पाठबळ हवं. थोडं नावारुपाला आल्यावर सरकारी पाठिंबा किंवा इतर मदत मिळते. पण, तोपर्यंत सगळा खर्च कुटुंबालाच उचलावा लागतो. गोपीचंद स्वामी यांचं कुटुंबंही निम्न मध्यमवर्गीय कुटुंब. अदितीला आंतरराष्ट्रीय दर्जाचा धनुष्य आणि बाण घ्यायचा होता तेव्हा त्यांना पहिल्यांदा अडीच लाखांचं कर्ज घ्यावं लागलं. त्यानंतर सराव आणि स्पर्धांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवास यासाठी होणारा खर्च वाढतच गेला.

‘कोरोनाची दोन वर्ष सरली आणि अदिती एकदम सीनिअर गटात खेळायला लागली. मग सुरू झाला तिचा आंतरराष्ट्रीय प्रवास. त्यासाठी पैसा उभा करणं हे आव्हान होतं,’ असं गोपीचंद यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना अलीकडेच सांगितलं. अर्थात अदितीच्या कामगिरीमुळे गोपीचंद यांना सध्या कर्जाची परतफेड केल्यासारखा आनंद मिळत असल्याचंही ते सांगतात.

(हेही वाचा – Online Transaction : …तर कुठल्याही मोबाईल ॲप शिवाय करू शकाल युपीआय पेमेंट)

२ महिन्यात ज्युनिअर ते सीनिअरचा प्रवास

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेपूर्वीची अदिती दुसरी महत्त्वाची स्पर्धा होती आयर्लंडमध्ये झालेला ज्युनिअर वर्ल्डकप. या स्पर्धेत तिने बाजी मारली. आणि त्यानंतर लगेचच ती जागतिक सीनिअर अजिंक्यपदासारख्या स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाली.

अर्थात, मधल्या काळात ती राष्ट्रीय तिरंदाजी शिबीरात सहभागी होत होती. आणि तिथेच ज्योती वेन्नम आणि परणीत कौर यांची जोडीही जमली होती. त्यामुळे ज्युनिअर ते सीनिअर असा तिचा प्रवास तिला तुलनेनं सोपा गेला.

अदिती आठवड्याचे सहा दिवस प्रत्येकी तीन तास सराव करते. आणि रविवार तसंच सुटीच्या दिवशी प्रत्येकी पाच तास सराव करते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.