कोण होते Birasa Munda ज्यांनी पाजलं होतं इंग्रजांना पाणी?

148

१५ नोव्हेंबर हा दिवशी बिरसा मुंडा (Birasa Munda) यांची जयंती आहे. बिरसा मुंडा हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते आणि मुंडा जमातीचे लोकनायक होते. ब्रिटिश राजवटीत १९व्या शतकाच्या उत्तरार्धात बंगाल प्रेसिडेन्सी (आता झारखंड) येथे झालेल्या वनवासी चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले, ज्यामुळे ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. भारतातील वनवासी समाजातील लोक त्यांना देव मानतात, त्यांना भगवान म्हटले जाते आणि त्यांना ‘धरती आबा’ म्हणूनही ओळखले जाते.

झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात जन्म झाला

भारतीय स्वातंत्र्य समरातील त्यांच्या योगदानासाठी त्यांचे छायाचित्र भारतीय संसदेच्या संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आले आहे. वनवासी समाजात आतापर्यंत फक्त बिरसा मुंडा (Birasa Munda) यांनाच हा सन्मान मिळला आला आहे. बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात १५ नोव्हेंबर १८७२ मध्ये झाला. बिरसाचे बालपण स्वतःच्या घरी, मामाच्या घरी आणि मावशीच्या सासरच्या घरी शेळ्या चरण्यात गेले. नंतर त्यांनी ‘चायबासा’च्या जर्मन मिशन स्कूलमध्ये काही दिवस शिक्षण घेतले.

धर्मांतर थांबवले

पूर्वी त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. मात्र पुन्हा ते हिंदू धर्मात आले. ते स्वामी आनंद पांडे यांच्या संपर्कात आले आणि त्यांना हिंदू धर्म आणि महाभारतातील पात्रांची ओळख झाली. असे म्हणतात की १८९५ मध्ये काही अलौकिक घटना घडल्या ज्यामुळे लोक बिरसा यांना देवाचा अवतार मानू लागले. त्यांच्या स्पर्शाने रोग बरे होतात हा विश्वास लोकांमध्ये दृढ झाला. त्यांचं वक्तृत्व ऐकण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमा होऊ लागले. लोकांना हिंसा आणि अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांच्या बोलण्याचा परिणाम असा झाला की ख्रिश्चन धर्म स्वीकारणार्‍यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आणि ख्रिस्ती झालेले अनेक मुंडा त्यांच्या जुन्या धर्मात परत येऊ लागले. पुढे त्यांच्या शिकवणुकीला क्रांतिकार्याचे वळण लागले. शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या जमीनदारांविरुद्ध लढण्यासाठी बिरसा मुंडा (Birasa Munda) यांनी लोकांना प्रेरित केले. हे पाहून इंग्रज सरकारने त्यांना लोकांची गर्दी जमवण्यापासून रोखले. बिरसा म्हणाले की, मी माझ्या जातीला माझा धर्म शिकवत आहे. त्यावर पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र गावकऱ्यांनी त्याची सुटका केली. लवकरच त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि दोन वर्षांसाठी हजारीबाग तुरुंगात टाकण्यात आले. त्यानंतर कोणताही प्रचार न करण्याचा इशारा देऊन त्यांची सुटका करण्यात आली.

(हेही वाचा Muslim : श्री कानिफनाथ मंदिरात पुजारी-भाविकांना मारहाण करणे धर्मांधांची ‘मोगलाई’च; मास्टरमाइंड शोधा)

तरुणांचे संघटन केले

मात्र तुरुंगातून सुटल्यावर त्यांच्या कार्याने अधिकच जोर धरला. त्यांनी अनुयायांचे दोन गट तयार केले. एक गट मुंडा धर्माचा प्रचार करू लागला आणि दुसरा राजकीय कार्य करू लागला. नवीन तरुणांची भरती झाली. त्यावर सरकारने पुन्हा त्यांच्या अटकेचे वॉरंट जारी केले, पण बिरसा मुंडा (Birasa Munda) यांना पकडता आले नाही. या वेळी बळाच्या जोरावर सत्ता काबीज करण्याच्या उद्देशाने आंदोलन पुढे सरकले. युरोपियन अधिकारी आणि पादर्‍यांना हटवून त्यांच्या जागी बिरसा यांच्या नेतृत्वाखाली नवीन राज्य स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही त्या काळातली वनवासी जमातीची सर्वात मोठी क्रांती होती.

तुरुंगातच मृत्यू

मात्र नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. २४ डिसेंबर १८९९ रोजी त्यांनी चळवळीला सुरूवात केली. पोलिस ठाण्यांवर बाणांनी हल्ला करून जाळपोळ करण्यात आली. सैन्याशी थेट चकमक झाली, पण धनुष्यबाण बंदुकीच्या गोळ्यांचा सामना करू शकले नाहीत. बिरसा मुंडा यांचे साथीदार मोठ्या प्रमाणात मारले गेले. बिरसा मुंडा यांना त्यांच्याच दोन लोकांनी पैशाच्या लोभापोटी अटक केली. ९ जून १९०० रोजी तुरुंगातच त्यांचा मृत्यू झाला. असं म्हटलं जातं की इंग्रजांनी त्यांना विष देऊन मारुन टाकलं.

बिरसा मुंडा (Birasa Munda) यांची समाधी रांचीमधील कोकर नजिकच्या डिस्टिलरी पुलाजवळ आहे. त्यांचा पुतळाही तिथे उभारला आहे. त्यांच्या स्मरणार्थ रांचीमध्ये बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृह आणि बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील आहे. १० नोव्हेंबर २०२१ रोजी भारत सरकारने १५ नोव्हेंबर म्हणजेच बिरसा मुंडा यांची जयंती वनवासी गौरव दिन म्हणून साजरी करण्याची घोषणा केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.