पहिली एसटी कधी आणि कुठे धावली? आपल्या लालपरीचा रंजक इतिहास!

560

आजच्या पिढीला लालपरीचा इतिहास ठाऊक आहे का?

आज अनेक प्रायव्हेट बस रस्त्यावरुन धावतात. त्यामुळे आताच्या पिढीला लालपरीचं महत्व माहित नाही असं म्हणावं लागेल. आज एसटी कर्मचार्‍यांचं आदोंलन पाहुन या पिढीला एसटी चा इतिहास जाणून घेण्याबाबत उत्सुकता नक्कीच असणार.

खरंतर एमएसआरटीसी महामंडळांतर्गत २२ कर्मचारी संघटना येतात. श्रमिक संघ मान्यता व अनुचित प्रथा प्रतिबंध कायदा १९७१ यानुसार एसटी कामगार संघटना या संघटनेला मान्यता प्रदान केलेली आहे.

कर्मचारी संघटना आणि महामंडळाचे व्यवस्थापन यांच्यात एसटी कर्मचार्‍यांचे वेतन व सुविधा याबाबतीत सतत वाद होत राहिलेला आहे. म्हणूनच आज हे आंदोलन इतके चिघळले गेले आहे.

( हेही वाचा : UPI पेमेंट करताना या गोष्टींची काळजी घ्या! अन्यथा होऊ शकते फसवणूक… )

पहिली लालपरी कधी धावली?

आपल्या लाडक्या लालपरीचा जन्म हा स्वातंत्र्यपूर्व काळातला. १९३२ साली महाराष्ट्रात पहिल्यांदा प्रवासी वाहतुकीची सुरुवात खासगी प्रवासी व्यावसायिकांकडून करण्यात आली. पुढे आपला भारत देश १९४७ साली स्वतंत्र झाला. त्यानंतर मुंबई प्रांतामध्ये सार्वजनिक वाहतूक सुरु करण्यात आली. ही घटना १९४८ सालची. यासाठी बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएसआरटीसी) या कंपनीची स्थापना करण्यात आली.

ही पहिली बस पुणे ते अहमदनगर या मार्गावर १ जून १९४८ रोजी धावली. स्वतंत्र भारताची ही पहिली बस… आता सांगून कुणाला खरं वाटणार नाही पण ही पहिली एसटी लाकडाची होती आणि एसटी चं छप्पर होतं कापडाचं. एकून ३० प्रवाशांची क्षमता असलेली ही एसटी रस्त्यावरुन दिमाखात धावायची.

तुकाराम पांडुरंग पठारे हे पहिले ड्रायव्हर होते आणि लक्ष्मण कवटे यांना पहिले कंडक्टर होण्याचा मान मिळाला. त्याकाळी ड्रायव्हर म्हणजे चालक आणि कंडक्टर म्हणजे वाहक असे म्हटले जायचे.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि लालपरी

पूर्वी गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र या प्रदेशाला बॉम्बे स्टेट म्हटलं जायचं. आधुनिक निर्मितीनुसार महाराष्ट्राची स्थापना झाली नव्हती. नंतर मात्र भाषावार प्रांतरचना झाली. या भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर महाराष्ट्र हे एक वेगळं राज्य म्हणून नावारुपाला आलं ते १९६० साली.

त्या त्या भागात वाहतूक सेवा सुरु झाली आणि बॉम्बे स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशन (बीएसआरटीसी) चं नावं बदलून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) असे करण्यात आले. पुढे या लालपरीचा अवाका वाढला आणि एमएसआरटीसी च्या माध्यमातून गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, गोवा आणि तेलंगणा अशा राज्यांमधल्या प्रवाशांच्या सेवेला देखील आपली एसटी तत्परतेने हजर राहू लागली.

लालपरीचे बदलते स्वरुप

आधुनिक काळात लालपरीचे स्वरुपही बदलले. निमआराम बस तर आलीच त्याचबरोबर एसी बससुद्धा सुरु झाली. तुम्ही कधी लालपरीच्या एससी बसमध्ये बसला आहात का? प्रायव्हेट बसगाड्यांना टक्कर देण्याची क्षमता आपल्या लालपरीत आहे बरं का!

खरंतर २००२ मध्ये दादर – पुणे मार्गावर पहिल्यांदा एससी बस धावली. परवडणार्‍या किंमतीत सुखद प्रवास एसटी च्या शिवनेरी, अश्वमेध आणि शीतल या गाड्यांनी प्रदान केला. सर्वसामान्य प्रवासी राजासारखा प्रवास करु लागला.

अनेक आधुनिक प्लॅटफॉर्मवर एसटी ची तिकिटे मिळू लागली. मग मोबाईल ऍप असो, वेबसाईट असो किंवा प्रायव्हेट एजेंट. प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी या लाल-सुंदरीने घेतली. २००७ साली आलेल्या शिवशाही या नव्या रुपाच्या एसटीने तर प्रवाशांची मने जिंकली. शिवसाहीचा उदोउदो झाला.

’गाव तेथे एसटी’, ’रस्ता तेथे एसटी’ या ब्रीवाक्यानुसार खेड्यापाड्यात आणि राज्याराज्यात पोहोचलेली एसटी ला आज उतरती कळा लागलेली आहे. एकेकाळी लालपरी आणि प्रवासी यांचं भावनिक नातं होतं. पण आजच्या आधुनिक युगात लोकांना लालपरीचाही विसर पडला आणि एसटी कर्मचार्‍यांचाही. काही झालं तरी ही लालपरी जुन्या जाणत्या प्रवाशांच्या मनात अजूनही घर करुन आहे.

@जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.