Veer Savarkar : स्वा. सावरकर यांच्या समाजक्रांतीकारी कार्याला उजाळा देणारी स्वा. सावरकर कारावास मुक्ती शताब्दी 

सावरकर कर्ते समाजक्रांतीकारक होते, नुसते बोलके समाज सुधारक नव्हते.

381
  • चंद्रशेखर साने

६ जानेवारी १९२४ या दिवशी स्वत: सावरकरांच्या (Veer Savarkar) अनेक प्रयत्नांनंतर, तसेच बाहेरील नेत्यांच्या आणि जनतेच्या दबावानंतर ब्रिटिशांनी त्यांची दोन अटी लादून तुरुंगातून मुक्तता केली. ८ जानेवारी १९२४ या दिवशी ते रत्नागिरीत पोहोचले आणि त्यांच्या स्थानबद्धतेचा काळ सुरु झाला. हे नुसते कारावासातून जिल्हाबंदीत स्थलांतर नव्हते, तर सशस्त्र क्रांतीकारकांचे समाजक्रांतीकारकांत रूपांतर होण्याचा हा प्रसंग होता. येथून पुढे १३ वर्षे सावरकरांनी प्रबोधन आणि प्रत्यक्ष कृती अशा दोन्ही माध्यमांतून हिंदू समाजाच्या पायात पडलेल्या स्पर्शबंदी, रोटीबंदी, व्यवसायबंदी सारख्या अदृश्य असलेल्या सात बेड्या मोडण्यास सुरुवात केली. सावरकर कर्ते समाजक्रांतीकारक होते, नुसते बोलके समाज सुधारक नव्हते.

कारागृहात कैद्यांशी जुळवून घेताना बॅरिस्टरीचा झालेला फायदा

कारागृहात असताना सावरकरांचा राजबंद्यांप्रमाणेच इतर सर्वसामान्य गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कैद्यांशीही संबंध आला. एका उच्चशिक्षित, क्रांतीकारक, देशभक्त बंद्याला अशा क्रूर, अशिक्षित, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या बंद्यांशी वेगवेगळ्या प्रकारे जमवून घ्यावे लागले, तरी त्यांनीच लिहून ठेवल्याप्रमाणे त्रास मात्र झाला नाही. कारण सावरकर लिहितात, “…सुदैवाने मी ‘बॅरिस्टर’ आणि ‘मोठासाहेब’ असा बोलबाला ज्याच्या-त्याच्या तोंडी झालेला. बंदीवानांत आणि त्यांतही निर्ढावलेल्या बदमाश अपराध्यांत जर कोणा वर्गाविषयी सहजच आदर आणि भय उत्पन्न होत असेल, तर ते ‘बॅरिस्टर’ वर्गाविषयी होय. कवी, विद्वान, सात्त्विक, कारस्थानी-इंग्रजांचा मुख्य प्रधान जरी असला, तरी यांचे त्यांना काही विशेष वाटत नाही. ‘बॅरिस्टर’ म्हटला की, आदराश्चर्याने भुवया उभारून ‘अच्छा’ असा उद्गार त्यांच्या तोंडून निघालाच! त्याचे कारणही उघड आहे. त्यांचा जन्म चोऱ्या-माऱ्या आणि न्यायालये व तुरुंग यात गेलेला. तिथे त्यांच्या मतांनी अत्यंत कौशल्याने रचलेली त्यांची पापांची जाळी आपल्या बुद्धीच्या कुशाग्राने छिन्नविच्छिन्न करणारा किंवा उलटपक्षी त्यांच्या धडधडीत अपराधांस बुद्धीच्या ढालीखाली लपवून त्यांस निर्दोषी म्हणून सोडविणारा ‘बालिस्टर’ हा त्यांस सहजच ‘कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम्समर्थ’ असा एक अद्वितीय प्राणी वाटणारच. ते त्यांस सहजच भितात. त्यांची मैत्री जोडण्यास ते सहजच झटतात. पूर्वी बादशहा आणि बिरबल यांच्या कथा जशा प्रचलित असत, तशा काराजगतांत बालिस्टर आणि साक्षीदार यांच्या दंतकथा सर्वत्र पसरलेल्या असतात. एरव्ही माझ्या ‘बालिष्टरी’चा मला दुसरा काहीही उपयोग जरी झाला नाही, तरी एवढा उपयोग तेथे झाला खरा! कसलाही अट्टल बदमाश का असेना, तो पटकन नमे…..”

(हेही वाचा Veer Savarkar : सवंग प्रसिद्धीसाठी सावरकरांवर टीका; जनता काँग्रेसला पुढच्याही निवडणुकांमध्ये धडा शिकवेल; रणजित सावरकरांचा हल्लाबोल)

या बॅरिस्टरीमुळेच सावरकरांना (Veer Savarkar) तेथील सर्वसामान्य गुन्हेगार मंडळींत एक प्रकारचा स्वार्थपरायण भीतीयुक्त आदरभाव निर्माण झाल्याने पुढे सावरकरांना कारागृहात सुधारणा घडवताना त्यांचे बरेच सहाय्य झाले. अगदी अंदमानातून सुटताना एका बंदीवानाने गुपचूप आणून केलेल्या रानटी कोरांटीच्या फुलांचा पुष्पहारही स्वा. सावरकरांविषयीचा प्रतिकात्मक आदरभाव म्हणून त्यांच्या गळ्यात घातला गेला.

बंदीवानांसमोर सावरकर चरित्राचा आदर्श ठेवण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन

कारागृहात सुधारणा, बंदीवानांसाठी साक्षरता, पुस्तकालय, त्यांना माणूस म्हणून वागणूक मिळावी, असे जे जे प्रयत्न सावरकरांनी राजबंदीवानांसाठी केले, त्याचे लाभ अर्थातच गुन्हेगार बंदीवानांनाही मिळत असत, त्यामुळे त्यांच्यातही माणसात जी कृतज्ञताबुद्धी असते, तशी सावरकर बंधूंविषयी काही प्रमाणात जागृत असे.

आपोआपच सावरकर चरित्राचा तब्बल १३-१४ वर्षांचा काळ कारावास सुधारणा, बंदीवानांतून चांगले नागरिक घडवणे या गोष्टींशी जोडला जातो. याच हेतूने स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाने महाराष्ट्रातील काही कारागृहांतून सावरकर (Veer Savarkar) साहित्य तेथील ग्रंथालयांतून देऊन निबंध स्पर्धा घेण्याचा उपक्रम चालू केला.

याचाच पुढचा भाग म्हणून सावरकरांच्या कारागृहातून सुटकेची शताब्दी महाराष्ट्रातील सर्व कारागृहांतून साजरी करावी आणि त्या निमित्ताने बंदीवानांसमोर सावरकर चरित्राचा आदर्श ठेवत चांगले नागरिक घडवण्याच्या सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलावा, अशी कल्पना पुढे आली.

या दृष्टीने काय करता येईल, त्याचा विचार सुरू झाला. सावरकरांवर महाराष्ट्रातील प्रत्येक कारागृहातून एक अथवा दोन बंदीवानांकडून सावरकर चरित्राचा थोडाफार अभ्यास करून घ्यावा आणि त्याच कैद्यांकडून पाच-पाच मिनिटांची भाषणे करवून घ्यावीत, असे ठरवण्यात आले आहे. त्यानंतर स्मारकाच्या वतीने एक दोन प्रतिनिधींनी प्रास्ताविक करून स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाने निर्मिती केलेला ‘समाजक्रांतीकारकाची यशोगाथा’ हा एक तासाचा लघुपट बंदीवान आणि तुरुंगातील कर्मचारी यांना दाखवण्याची योजना निश्चित केली गेली. स्वा. सावरकरांना तब्बल पन्नास वर्षांची शिक्षा झाली. ती कोणत्याही वैयक्तिक फायद्यासाठी, गुन्ह्यासाठी नसून देशस्वातंत्र्याच्या तळमळीने देशप्रेमातून झाली, हे बंदीवानांना कळावे. पुढे सुटल्यानंतरसुद्धा आपले आयुष्य केवळ वैयक्तिक सुखासाठी किंवा स्वार्थासाठी न दवडता लोककल्याणासाठी कसे खर्च केले, हे एक चांगला नागरिक घडवण्यास बिंबवावे, या हेतूनेच.

महाराष्ट्रातील विविध तुरुंगांत सध्या अंदाजे ४० सहस्र बंदीवान आहेत. त्यातील प्रत्यक्ष किमान ४ सहस्र बंदीवानांसमोर सावरकरांचे अल्प चरित्र आणि समाजक्रांती पोचेल, असा विश्वास आहे. मुख्य समन्वयक म्हणून मी केवळ निमित्तमात्र असलो, तरी अनेकांचा याला हातभार लागणे आवश्यक आहे. अशा उस्फूर्तपणे पुढे आलेल्या आणि अजूनही पुढे येणाऱ्या स्वयंसेवकांवरच कार्यक्रमाचे यश अवलंबून आहे. संबंधित तुरुंगातून प्रत्यक्ष भेटून वा दूरध्वनीवरून संपर्क साधल्यावर मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. महाराष्ट्रातील चार विभागांचे तुरुंग उपनिरीक्षक सौ. स्वाती साठे मॅडम, श्री. सुपेकर साहेब, योगेश देसाई साहेब, येरवड्याचे अधिकारी कांबळे सर, मराठवाडा विभागाचे प्रमुख यु. टी. पवार साहेब अशा उच्चपदस्थांची मोलाची साथ लाभत आहे. सरकारी पातळीवरून योजनेसाठी एकदा हिरवा कंदील मिळाला की, समाजातून सध्या बाजूला पडलेल्या एका वेगळ्या वर्गात सावरकर आदर्श (IDOL) म्हणून काही ना काही प्रमाणात पोहोचतील, अशी अपेक्षा आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रेचे आयोजन

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने शनिवार, ६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९.०० वा. येरवडा कारागृह ते फर्ग्युसन कॉलेज मार्गे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, डेक्कन जिमखाना अशी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रा’ आयोजित करण्यात येत आहे. या यात्रेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले आहे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, भाजपा नेते सुनील देवधर, सावरकर व्याख्याते आणि अभिनेता शरद पोंक्षे तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, पुण्यातील अनेक हिंदू संघटना आणि कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतील सावरकर स्मारक सभागृहात त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता विशेष कार्यक्रम होईल. अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

(लेखक इतिहासकार आणि सावरकर अभ्यासक आहेत.)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.