-
मंजिरी मराठे
Veer Savarkar : वीर सावरकरांना “तुम्ही सुटलात!”, असा संदेश उजाडताच मिळाला आणि लगेचच पर्यवेक्षकांचं बोलावणंही आलं. त्यामुळे आदल्या दिवशीची रात्र त्यांच्या चांगलीच स्मरणात राहिली. मुळात येरवड्यात थंडी खूप. त्यातच जानेवारी महिना असूनही त्या रात्री पावसाची जोरदार सर आली. त्याच्या खिडकीतून येणाऱ्या तुषारांनी सावरकरांची चवाळी, अंगावरची वस्त्र भिजून गेली. ते तसेच कोठडीच्या कोपऱ्यात अंग चोरून पडून राहिले. अशी थंडीनं कुडकुडत काढलेली ती काही पहिली रात्र नव्हती, त्यामुळे त्याही स्थितीत काही काळ त्यांचा डोळा लागला. सकाळ उजाडली तोच त्यांना सुटकेची वार्ता मिळाली. ही काही साधीसुधी सुटका नव्हती. ती मुक्तता होती पन्नास वर्षांच्या सश्रम कारावासातून, जन्मठेपेतून.
६ जानेवारी १९२४ – पर्यवेक्षकानं त्यांना सुटकेची आज्ञा वाचून दाखविली. पाच वर्षांपर्यंत प्रचलित राजकारणात भाग घेऊ नये आणि रत्नागिरी जिल्ह्यात स्थानबद्धता या दोन मुख्य अटी त्यांच्यावर लादण्यात आल्या होत्या. पन्नास वर्षांची जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी आलेल्या सावरकरांना त्या दिवशी कारागृहातील शेवटची ‘आज्ञा’ मिळाली- बंदीवानाचा वेष उतरवून घरचे कपडे घालावे आणि कुठेही न थांबता थेट रत्नागिरीला जावे. पण त्यांच्याकडे घरचे कपडे होतेच कुठे? कारण मुंबईतील डोंगरीच्या कारागृहात १९११ मध्ये अंगावर चढलेले बंदीवानाचे कपडे उतरवण्याची वेळ थेट १९२४ मध्ये आली होती.
वीर सावरकरांच्या सुटकेची बातमी ऐकून त्यांच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले होते. सावरकरांच्या मनात मात्र संमिश्र भावना होत्या. आनंदाबरोबरच त्यांना विषण्ण आणि उदास वाटत होतं. अंदमानात त्यांच्याबरोबर असलेले काही बंदीवान आता येरवडा कारागृहातही त्यांच्या बरोबर होते. ज्यांच्या संगतीत त्यांनी अंदमानातील कष्टप्रद अशी अनेक वर्ष काढली होती, ते मित्र बंदीगृहातच राहणार आणि आपण मात्र सुटणार या विचारानं सावरकर अस्वस्थ होते. सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. काहीजण त्यांच्या गळ्यात पडले. त्यांना मिठ्या मारू लागले. आपण आमच्या आधी काळ्यापाण्यावर गेलात आणि आमच्या आधी सुटलात म्हणून काय झालं? आपली सुटका तीच आमची सुटका. तुमच्या मुक्ततेनं आमच्या मुक्ततेचा मार्गही काही अंशी मोकळा झाला आहेच आणि पर्यायानं आपल्या प्रिय मातृभूमीच्या सुटकेचा मार्गही काही अंशी मोकळा झाला आहे, अशा भावना ते व्यक्त करत होते.
सावरकर म्हणाले, “पुढे ईश्वर काय शक्ती देईल ते खरे. पण बंधूंनो.. ही भयंकर शिक्षा लागली तेव्हा जो जयघोष माझ्या ओठावर नाचत होता, ती शिक्षा आपल्या सर्व भयांस आणि यातनांस माझा बळी देत देत आज थकून स्वतःच निश्चेष्ट पडत असताही माझ्या आणि तुमच्या ओठावर तोच जयघोष निनादत आहे! बोला! स्वातंत्र्यलक्ष्मीकी जय!” कारागृहात असूनही सर्वांनी स्वातंत्र्यलक्ष्मीचा जयजयकार केला. पर्यवेक्षकांनं देखील त्यांचं मनापासून अभिनंदन केलं आणि म्हणाले, ‘आता मात्र जपा बरं का!”
(हेही वाचा – Anant Chaturdashi 2026 : 25 सप्टेंबरला गणपती विसर्जन; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी )
वीर सावरकर कारागृहातून बाहेर पडताना कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी आणि बंदीवान त्यांच्या भोवती गोळा झाले होते. त्यातला एकजण म्हणाला, “रामाप्रमाणेच चौदा वर्षे वनवास भोगलात. धन्य आहे! आज आपल्या राष्ट्राचा आनंद गगनात मावणार नाही”. त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करून सावरकर म्हणाले, “आपण वनवास भोगला खरा पण. . . ! ते कार्य झाले म्हणजे खरा वनवास संपेल! आणि ईश्वराची दया असेल, तर तेही कार्य एक दिवस या आनुषंगिक कार्यासारखेच यशस्वी होईल!” गाळलेल्या शब्दांचा अर्थ सर्वांनाच उमगला होता. वीर सावरकरांच्या मुक्ततेची वार्ता शासनानं त्यांचे धाकटे बंधू डॉ. नारायण सावरकर यांना ४ जानेवारी १९२४ला पत्रानं कळवली होती आणि त्यानुसार ते येरवड्याला ५ जानेवारीला सावरकरांना भेटायला आले, पण त्यांना लगेचच सोडणार हे नारायणरावांना सांगितलेलं नसल्यामुळे त्या दिवशी रात्रीच ते मुंबईला परतले. त्यावेळी येरवड्याच्या कारागृहात लेखनिक म्हणून गोपाळ गणेश ढेरे काम करत होते.
“माझ्या सुटकेची वार्ता ढेरे केसरी कार्यालयात जाऊन नरसिंह चिंतामण केळकर यांना देतील”, असं सावरकरांनी अधीक्षकाला सांगितलं. शासनाची चाकरी करत असूनही कुठलीही भीती न बाळगता ढेरे यांनी सावरकरांनी लिहिलेली चिठ्ठी न. चिं. केळकर यांना नेऊन दिली. ही वार्ता मुंबईला डॉ. सावरकरांना त्वरेने कळवण्याची व्यवस्था करण्यात आली. वीर सावरकरांचा जागोजागी सत्कार होईल, त्यांचं उत्साहानं स्वागत होईल म्हणून शासन ही वार्ता गुप्त ठेवू इच्छित होतं. तसं ढेरे यांनाही बजावण्यात आलं होतं. पण ढेरे यांनी ही वार्ता शिवरामपंत परांजपे यांनाही कळवली. शासनानंच ही वार्ता सावरकरांचे मावसभाऊ डॉ. विष्णू महादेव भट यांनाही कळवली होती. त्यामुळे सावरकरांसाठी कपड्यांची व्यवस्था करून डॉ. शंकर रघुनाथ फाटक यांच्या गाडीनं डॉ. भट येरवडा कारागृहात पोहोचले.
सावरकर लिहितात, “कारागृहाचे दार उघडले. मी बाहेर पडलो. कोण युक्त्याप्रयुक्त्यांनी बाहेर पडलो! ..माझी सुटका झाली तर! क्षणभर आजूबाजूस पाहिले. मनात म्हटले या जन्मठेपीतून सुटलो – पण कोणी सांगावे..! बंदीगृहास नित्याचा रामराम ठोकण्याची वेळ अजून आली नाही. त्याची अगदीच ओळख सोडून सध्याच चालावयाचे नाही. मार्सेलिसलाही असाच एकदा सुटलो- निसटलो होतो! तसेच हे सुटणेही होणार नाही कशावरून?.. असे मित्रांशी बोलत आणि हसत मोटारमध्ये बसलो. तिची चाके हालली आणि जन्मठेपेच्या सीमेस उल्लंघून जीवनाच्या सीमेत आम्हास तिने पुन्हा आणून सोडले.”
शासनानं कितीही प्रयत्न केला तरी सावरकरांच्या सुटकेची बातमी अल्पावधीत दूरवर पोहोचली होती. त्यामुळे वीर सावरकर डॉ. वि. म. भट यांच्या घरी पोहोचले, त्यावेळी डॉ. फाटक, न. चिं. केळकर, शिवरामपंत परांजपे, बॅरिस्टर घासवाला, दा. वि. गोखले, समर्थभक्त शंकरराव देव यांच्यासह शे सव्वाशे माणसं सावरकरांच्या स्वागतासाठी जमा झाली होती. ते प्रेम, ती कृतज्ञता पाहून सावरकरांना क्षणभर साऱ्याचाच विसर पडला. “पहिल्याच दिवशी मी माझ्या मायभूमीच्या घरी अगदी घरच्यासारखा वागू लागलो. तिने “भले वीर” म्हणून पाठ थोपटताच या जन्मठेपीचे खोल खोल गेलेले यातनांचे सर्व घाव भरून आले, तिच्याविषयी शेष जे काही उरले ते केवळ या तिच्या “अंदमानच्या आठवणी”!” वीर सावरकरांची जन्मठेपेतून सुटका झाली असली तरी आता त्यांच्या नशिबी होती स्थानबद्धता.. किती वर्ष? कोण जाणे..
(लेखिका स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

