आदित्य ठाकरेंच्या मर्जीतील या सहायक आयुक्तांसह चार अधिकाऱ्यांच्या बदल्या

146

मुंबई महापालिकेत मागील काही दिवसांपासून सहायक आयुक्तांच्या बदलींचे सत्र असून आणखी तीन सहायक आयुक्तांच्या बदलीचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासकांनी जारी करत पुन्हा एकदा खांदेपालट केली आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतील सहायक आयुक्त किरण दिघावकर यांची बदली केल्यानंतर त्यांच्या वरळी विधानसभा क्षेत्रातील जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांचीही बदली केली. उघडे यांची डि विभागाच्या सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आली असून डि विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांना पदमुक्त करून त्यांच्याकडे मालमत्ता विभागाचा पूर्ण कार्यभार सोपवला आहे.

( हेही वाचा : सदोष बायोमॅट्रीक : हजेरीची नोंद न झाल्याने महापालिका कामगारांच्या पगारालाच कात्री)

राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर सहायक आयुक्त जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, आर उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे, एन विभागाचे सहायक आयुक्त संजय सोनावणे, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्यासह अल्ले आदींची बदली केल्यानंतर आता चार विभागांमधील सहायक आयुक्तांची बदली करण्यात आली आहे.

जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांची बदली डि विभागात करून जी दक्षिण विभागात पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी तत्कालिन उपनगराचे पालकमंत्री, शिवसेना नेते आणि वरळीचे स्थानिक आमदार असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या गळ्यातील ताईत बनल्याने ते शिवसेनेच्या कुठल्याही नगरसेवकांना विचारत नव्हते. त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक उघडे यांच्यावर प्रचंड नाराज होते. एक माजी आणि विद्यमान महापौर तसेच एक बेस्ट समिती अध्यक्ष असतानाही उघडे हे आदित्य ठाकरे यांच्याशिवाय कुणाचेही ऐकत नसल्याने ही सर्व मंडळी प्रचंड नाराज होती. त्यामुळे राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर उघडे यांची बदली होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. अखेर प्रशासकांनी त्यांची बदली डि विभागात केली.

डि विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्याकडे मालमत्ता विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्यामुळे गायकवाड यांना दोन्ही विभागांच्या कार्यभार सांभाळताना तारेवरील कसरत करावी लागत होती. त्यामुळे गायकवाड यांच्याकडे मालमत्ता विभागाचा पूर्णवेळ कार्यभार सोपवून त्यांच्याकडील डि विभागासाठी उघडे यांची नियुक्ती केली. संतोष कुमार धोंडे यांची पी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्तपदावरुन जी दक्षिण विभागात बदली केल्यांनतर या विभागाच्या सहायक आयुक्तपदाचा भार विभागातील कार्यकारी अभियंता राजेश अक्रे यांच्याकडे सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

कुणाची कुठे झाली बदली

  • पी -दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोष कुमार धोंडे (बदलीचे ठिकाणी जी -दक्षिण विभाग)
  • जी-दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे (बदलीचे ठिकाणी डि विभाग)
  • डि -विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड (बदलीचे ठिकाणी मालमत्ता विभाग)
  • पी -दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश अक्रे(सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.