विनापरवाना कासव बाळगल्याप्रकरणी वनविभागाकडून दंड आणि ताकीद

148

विनापरवाना स्टार टर्टल प्रजातीचे कासव बाळगल्याप्रकरणी प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार ऐश्वर्या श्रीधरला वनविभागाने ताकीद देत केवळ वीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या संपूर्ण प्रकरणात कासव मिळाल्याचा स्त्रोत तसेच हरवलेल्या कासवांचा पत्ता लागलेला नसताना चौकशीबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात वनविभागाच्या धाडीत मोठ्या प्रमाणात स्टार टर्टल प्रजातीची कासवांची अवैध विक्री होत असल्याचे उघडकीस होत आहे. केवळ दक्षिण भारतात आढळणारा स्टार टर्टल प्रजातीचा कासव आता घराघरांत अवैधरित्या आढळून येत आहे. या तस्करीविरोधात राज्यभरातील वनाधिका-यांकडून जोरदार कारवाया होत असताना या प्रकरणात वीस हजारांची रक्कम ही तडजोड रक्कम असल्याची माहिती वनविभागाने दिली.

काय आहे प्रकरण 

जुलै महिन्यात पनवेलहून पुण्यातील रेस्क्यू या प्राणीप्रेमी संस्थेकडे वन्यजीव छायाचित्रकार ऐश्वर्या श्रीधर यांनी जखमी कासव आणले. कासव रक्तबंबाळ अवस्थेत आणल्याने संस्थेने कासवाला उपचारांसाठी ठेवले. कासव संरक्षित असल्याने वनविभागाला कासवाची माहिती देण्याची सूचना संस्थेच्या प्रमुख नेहा पंचमिया यांनी ऐश्वर्या श्रीधर यांना केली. महिन्याअखेरीच्या नोंदीत पनवेलहून पुण्यात उपचाराला गेलेले स्टार टर्टल प्रजातीचे कासव विनापरवाना नेले गेल्याचे वनाधिका-यांच्या लक्षात आले. या प्रकरणी पनवेल प्रादेशिक वनविभागाने ऐश्वर्या श्रीधर यांना चौकशीला बोलावले. ऑगस्ट महिन्यात १३ व २२ तारखेला ऐश्वर्या श्रीधरची पनवेल वनाधिका-यांकडून चौकशी झाली. रेस्क्यू संस्थेतील जखमी कासवाच्या उपचाराचे ऐश्वर्या श्रीधरने रॅकोर्डिंगही केले. हे रॅकोर्डिंगही वनाधिका-यांनी तपासले.

(हेही वाचा – दसरा मेळावा पीएफआयच्या रडारवर? गृहमंत्र्यांचे सूचक ट्विट )

पनवेलच्या फार्महाऊसमधील एका नाल्याजवळील जखमी कासव ऐश्वर्या श्रीधरने पुण्यातील रेस्क्यू संस्थेला नेले. वनविभागाच्या नियमानुसार, संरक्षित वन्यप्राणी आढळल्यास त्याला वनविभागाच्या परवानगी शिवाय हाताळता येत नाही. वन्यजीव प्राण्यांसंदर्भातील प्रकरणांविषयी तक्रार करण्यासाठी वनविभागाच्या १९२६ हेल्पालाईनवरही ऐश्वर्या श्रीधरने जखमी स्टार टर्टल कासवाची माहिती दिलेली नाही. नाल्याजवळ अजून काही स्टार टर्टल कासवे असल्याचा दावा करणा-या ऐश्वर्या श्रीधरच्या माहितीच्या आधारे वनविभागाच्या टेहाळणी पथकाने घटनास्थळाची पाहणीही केली. मात्र स्टार टर्टल प्रजातीचे कासव टेहाळणी पथकाला सापडले नाही.

जखमी कासवावर उपचार मिळण्यासाठी ऐश्वर्या श्रीधर पुण्यात रेस्क्यू संस्थेकडे गेली होती. कासवाबाबत श्रीधर यांनी वनविभागाला कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही. निदान पुण्यातील स्थानिक वनविभागाला ऐश्वर्या श्रीधरने कळवणे आवश्यक होते. मला वन्यजीव कायद्याचे ज्ञान नाही असे सांगत ऐश्वर्या श्रीधरने गुन्हा कबून केला आहे. त्याप्रकरणी तडजोड रक्कम म्हणून २० हजार रुपये ७ ऑक्टोबर अगोदर वनविभागाला देणे तिला बंधनकारक राहील – संजय कदम, उपवनसंरक्षक, अलिबाग वनविभाग (प्रादेशिक)

जखमी कासवाला उपचारासाठी मी ताबडतोब रुग्णालयात नेले. एक नागरिक म्हणून माझ्या संविधानिक मूलभूत कर्तव्याची पूर्तता म्हणून मी कासवाला पुण्यातील रेस्क्यू संस्थेत उपचारांसाठी नेले. मला वन्यप्राणी बचाव कार्याचे प्रशिक्षण नाही त्यामुळे परवानाविषयी मला माहित नव्हते. चौकशीदरम्यान मी वनविभागाला संपूर्ण सहकार्य केले. वनविभागाच्या निर्णयाचा मी स्विकार केला आहे, असे वन्यजीव छायाचित्रकार ऐश्वर्या श्रीधर यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.