मुंबई पोलीस आयुक्त कोण? डॉ. भूषण उपाध्याय की अमिताभ गुप्ता

79
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे ३० जून रोजी निवृत्त होत असून मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त कोण असणार आहे, याची उत्सुकता आतापासूनच पोलीस दलाला लागली आहे. मुंबई पोलिस आयुक्त पदासाठी काही जेष्ठ आयपीएस अधिकारी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे, त्यात पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे आघाडीवर आहेत.

मुंबईचे पोलीस आयुक्त पदाला घरघर

आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त हे पद मानाचे मानले जाते. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदासाठी जेष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये चुरस लागलेली असते. शक्यतो सरकारच्या मर्जीतील जेष्ठ आयपीएस अधिकारी या पदावर  नियुक्त केले जातात. अँटिलिया प्रकरण, १०० कोटींची वसुली, तसेच मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणानंतर पोलीस आयुक्त पदाला घरघर लागली होती. या वादग्रस्त प्रकरणानंतर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर हेमंत नगराळे यांना पोलीस आयुक्तपदी बसविण्यात आले. मात्र त्यांना देखील या पदाचा पूर्ण कार्यकाळ भोगता आला नाही, त्यांची बदली करण्यात आल्यावर जेष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांना फेब्रुवारी महिन्यात मुंबईचे पोलीस आयुक्त करण्यात आले. पांडे यांना केवळ अवघ्या चार महिन्यांसाठी मुंबई पोलीस आयुक्त पदावर राहावे लागत आहे, येत्या ३० जून रोजी संजय पांडे हे निवृत्त होत आहे. पांडे यांना कार्यकाळ वाढवून मिळेल ही आशा जवळजवळ संपली असून ३० जून रोजी ते सेवेतून निवृत्त होत आहेत. पांडे यांच्या निवृत्तीला अवघे दोन आठवडे उरले असून मुंबईचे पोलीस आयुक्त पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याची उत्सुकता पोलीस दलात आणि मुंबईकरांमध्ये आहे.

कोण आहेत स्पर्धेत?

मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत राज्य गृहरक्षक दलाचे महासंचालक डॉ. भूषण उपाध्याय, नवी मुंबईचे आयुक्त बिपीन कुमार सिंग, ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची नावे चर्चेत असले तरी पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता हे नाव सर्वात पुढे असून पाठोपाठ ज्येष्ठ आयपीएस अधिकारी तसेच राज्य गृहरक्षक दलाचे महासंचालक डॉ. भूषण उपाध्याय यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. या दोन अधिकाऱ्यांमध्ये आयुक्तपदासाठी चुरस असून आयुक्तपदाची माळ नक्की कुणाच्या गळ्यात पडते ते लवकरच कळणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.