पुन्हा चीन संकटात, २६ शहरांत लॉकडाऊन; शाळा, फॅक्टरी पूर्णतः बंद!

119

चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला नियंत्रणात ठेवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असतानाही प्रशासनाला हवं तितकं यश आले नसल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या चीनमधील २६ शहरात लॉकडाऊन असून साधारण २१ कोटी नागरिक घरात अडकून पडले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १ मे रोजी होणाऱ्या मजूर दिनाच्या सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी आहे. चीनच्या गेल्या ७३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मे दिनाचे आयोजन झाले नसल्याचे सांगितले जात आहे. आर्थिक राजधानी शांघायमध्ये कडक लॉकडाऊन आणि बीजिंगमध्ये कोरोना रुग्ण कमी होत नसतानाही चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी या मुद्द्यांवर कोणतेच भाष्य केले नाही.

(हेही वाचा – राज ठाकरेंच्या ‘वसंता’ने अखेर सोडले मौन; म्हणाले, “साहेबांच्या आदेशानंतर…”)

दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेची अवस्था दयनीय

चीनच्या अत्यंत कडक लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात चीनमध्ये मंदीचा उद्रेक वाढला आहे. या परिणामामुळे शांघायसह अनेक शहरांतील कारखान्यांमध्ये उत्पादन ठप्प झाल्याने मागणीतही घट झाली आहे. आता चीनच्या या निर्बंधांच्या प्रभावामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची भीती आहे, त्यामुळे मंदीची व्याप्ती वाढून जगभरात पोहोचू शकते. कोरोनामुळे चीनमध्ये लागू करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनमुळे जगभरात मंदीचा आवाज तीव्र होत आहे. वास्तविक, चीनमधील अनेक मोठ्या शहरांमधील निर्बंधांमुळे सामान्य जनजीवनासह आर्थिक घडामोडींनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जगातील या दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेची अवस्था दयनीय झाली आहे.

दोन महिन्यांपासून शाळांना कुलूप

लॉकडाऊनमुळे एप्रिलमध्ये चीनमधील आर्थिक घडामोडींमध्ये झपाट्याने घट झाली आहे. चीनमधील शांघायसह अनेक मोठ्या शहरांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे कारखाने बंद असून रस्ते सुनसान झाले आहेत. तब्बल दोन महिन्यांपासून चीनच्या झिजिंगयान, जिलिन, शांघाय, बीजिंगसह ८ प्रांतात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या प्रांतात ओमिक्रॉनमुळे संसर्गाचे प्रमाण कायम असून लॉकडाऊन असल्याचे सांगितले जात आहे. जिनिपिंग सरकारने या प्रांतातील प्राथमिक शाळांतील मुलांची चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.