International Yoga Day 2023 : ‘योगा’ला आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवा – राज्यपाल रमेश बैस

विधान भवन प्रांगणात योगप्रभात @ विधान भवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

151
International Yoga Day 2023 : 'योगा'ला आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवा - राज्यपाल रमेश बैस

सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र संघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभर साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र संघाने मान्यता देत २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा होत आहे. त्यामुळे आपला योग जगात पोहचला. प्रत्येकाला निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर योगाला आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनविले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले.

विधान भवन प्रांगणात योगप्रभात @ विधान भवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी राज्यपाल आपले विचार व्यक्त करीत होते. कार्यक्रमाला व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार सर्वश्री मनीषा कायंदे, संजय कुटे, विक्रम काळे आदी उपस्थित होते.

योगामुळे आत्मविश्वास, सहनशक्ती वाढते असे सांगत राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, “संपूर्ण जगात योगाभ्यास होत आहे. योगाचा संपूर्ण जगात प्रचार झाला पाहिजे, नव्या पिढीला योग शिकविणे, ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आत्म्याला परमात्म्याशी जोडण्याचे सामर्थ्य योगात आहे. देशात मधुमेह आजार वेगाने वाढत आहे. या आजारावर योगाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवणे शक्य आहे. सर्वाधिक युवा शक्तीचा देश भारत आहे. युवाशक्ती ने योग केला पाहिजे. ही योग चळवळ पुढे नेली पाहिजे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या युवकांना योगामुळे व्यसनांपासून दूर राहता येवू शकते. देशात योग विद्यापीठ होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. तणाव मुक्तीसाठी प्रत्यके कार्यालयात किमान १५ मिनिटे योग अभ्यास झाला पाहिजे.

योग करून निरोगी राहूया, करो योग रहो निरोग – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संपूर्ण जगात आंतराष्ट्रीय योग दिवस म्हणून २१ जून हा दिवस साजरा केला जातो. आजचा दिवस निरंतर स्मरणात ठेवावा, असा दिवस आहे. शरीर, मनाच्या आरोग्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. बदलत्या जीवनशैलीत योगाला आपलेसे करून निरोगी आयुष्य जगावे. त्यासाठी प्रत्येकाने निरोगी राहण्यासाठी योग करावा. ‘करो योग रहो निरोग’ हा मंत्र अंगिकारावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान भवन येथील योगप्रभात कार्यक्रमात केले. मनाच्या संतुलनासाठी योग महत्त्वाचा असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, असाध्य आजारावर मात करण्याची ताकद योगामध्ये आहे. योग आज ही लोकचळवळ झाली आहे. आज आंतराष्ट्रीय योग दिवसा निमित्ताने एकाच वेळेस राज्यातील ३५ लाख सदस्य योग अभ्यास करीत आहेत. वसुधैव कुटुंबकम ही या योगदिनाची ‘थीम’ आहे.

निरोगी भारतासाठी प्रत्येकाने योग करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले व संपूर्ण जगात योग पोहोचला. योग ही प्राचीन चिकित्सा पद्धत आहे. निरोगी राहण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने योगशास्त्र तयार करण्यात आले. निरोगी भारताच्या निर्माणासाठी प्रत्येकाने योग करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन येथील योगप्रभात कार्यक्रमात केले. रोग होऊच नये म्हणून योगशास्त्र प्रभावी उपाय असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की सध्याच्या जीवनात ताण-तणावांचा सामना करताना अनेक ‘लाइफ स्टाईल ‘ आजार बळावत आहेत. या आजारांचा सामना करण्यासाठी योगशास्त्र त्यावर प्रभावी उपाय आहे.

यानंतर योग प्रात्यक्षिक करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे संचालन निलेश मदाने यांनी केले. कार्यक्रमाला विधानभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच योगप्रेमी उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.