‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’.. गोष्ट एका इतिहासाची

802
‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’.. गोष्ट एका इतिहासाची

मंजिरी मराठे

१९०६ ते १९१० या लंडनमधल्या वादळी वर्षात ‘जोसेफ मॅझिनी : आत्मवृत्त आणि राजकारण’ या ग्रंथ लेखनानंतर सावरकरांनी केलेलं आणखी एक महत्वाचं कार्य म्हणजे त्यांनी लिहिलेला ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ. या ग्रंथानं इतिहास निर्माण केला. १९४७मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स : 1857’ च्या आवृत्तीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ग. म. जोशी या टोपणनावानं ‘त्या इतिहासाची गोष्ट’ लिहिली.

WhatsApp Image 2023 07 11 at 10.17.54 AM

शिपायांचं बंड म्हणून ज्या उठावाची ब्रिटिश हेटाळणी करत होतं ते स्वातंत्र्य समर होतं हे सावरकरांनी हा ग्रंथ लिहून सिद्ध केलं. स्कॉटलंड यार्डचा सुद्धा पहारा चुकवून छपाईसाठी हे पुस्तक भारतात आलं. ‘जोसेफ मॅझिनी’ हे पुस्तक बाबारावांनी प्रसिद्ध केलं, ते ब्रिटिशांनी जप्त केलं होतंच. अर्थात ते जप्त होण्यापूर्वीच त्या पुस्तकानं इच्छित परिणाम साधला होताच. आता सावरकरांचं आणखी एक पुस्तक छापण्याचा प्रयत्न आहे याचा ब्रिटिशांना सुगावा लागला आणि त्यांनी छापखान्यांचं झडती सत्र सुरु केलं. बाबाराव ते पुस्तक छापण्याच्या प्रयत्नात होतेच. सोलापूरचे ‘स्वराज्य’ पत्राचे संपादक लिमये यांनी ते प्रसिद्ध करण्याचं मान्य केलं होतं. पण एका सहृदयी पोलीस अधिकाऱ्यानं त्यांना आधीच झडतीची बातमी दिल्यामुळे ते हस्तलिखित ब्रिटिशांच्या हाती लागलं नाही. लिमये यांनी ते हस्तलिखित बाबांकडे पाठवलं आणि हिंदुस्थानात ते प्रसिद्ध करणं शक्य नाही हे लक्षात आल्यावर बाबांनी ते पॅरिसला पाठवलं.

जर्मनीत तो ग्रंथ छापण्याचा प्रयत्न झाला कारण तिथं संस्कृतची छपाई होत होती पण तिथल्या जुळाऱ्यांना मराठी छपाई काही जमली नाही. परदेशात मराठी पुस्तक छापणं शक्य नाही हे लक्षात आल्यावर त्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद छापण्याचं निश्चित झालं.

स्वत: सावरकर तसंच अभिनव भारतचे सदस्य वामनराव फडके आणि कायद्याचा अभ्यास करणाऱ्या अनेकांनी व्ही. व्ही. अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रंथाच्या अनुवादासाठी साहाय्य केलं.

‘द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स : 1857’ हा ग्रंथ इंग्लंडमध्ये छापण्याचा प्रयत्न झाला. पण गुप्तहेरांची नजर असल्यामुळे ते शक्य झालं नाही. त्यावेळी फ्रान्स, ब्रिटनच्या हातातील बाहुलं बनला असल्यामुळे फ्रान्समध्ये छपाई शक्य झाली नाही. मग तो ग्रंथ हॉलंडमध्ये छापण्यात आला. अभिनव भारतच्या सदस्यांनी तो ग्रंथ फ्रान्समध्ये छापला जात आहे, असं जाहीर केल्यामुळे ब्रिटिश गुप्तचर विभाग अंधारात तीर मारत राहिला. ग्रंथ हॉलंडमध्ये छापला जात आहे हे कळण्यापूर्वीच ग्रंथाची पहिली आवृत्ती तयार होऊन ती वितरणासाठी फ्रान्समध्ये पोहोचलीसुध्दा.
सावरकरांचं पुस्तक छापलं जात आहे या बातमीनंच ब्रिटिश आणि भारत शासन इतकं धास्तावलं होतं की, १९०८मध्ये प्रसिद्धीपूर्वीच त्यांनी त्या ग्रंथावर बंदी घातली.

(हेही वाचा – Indian Navy : भारतीय नौदलाला मिळू शकतात २६ ‘Rafale-M’ लढाऊ विमाने)

प्रसिद्धीपूर्वीच ग्रंथावर जप्ती आणण्याची जगाच्या वाङ्मय इतिहासातील ही पहिली घटना. वृत्तपत्र स्वातंत्र्याचा टेंभा मिरवणाऱ्या ब्रिटिशांच्या या कृतीचा तिथल्या वर्तमानपत्रांनीदेखील निषेध केला. लंडन टाईम्सला लिहिलेल्या पत्रात सावरकरांनी सरळ ब्रिटिश शासनालाच आव्हान दिलं, “पुस्तक छपाईसाठी दिलं आहे की नाही, याची खात्री नसल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे. मग प्रकाशनापूर्वीच पुस्तकावर बंदी घालण्याइतकं ते पुस्तक धोकादायक, राजद्रोही आहे हे त्यांना कसं कळलं? शासनाकडे हस्तलिखिताची प्रत आहे की नाही? असेल तर उपलब्ध वैधानिक मार्गानुसार ते माझ्यावर राजद्रोहाचा अभियोग का दाखल करत नाहीत? आणि जर त्यांच्याकडे प्रत नसेल तर संदिग्ध, पक्षपाती आणि अप्रमाणित अहवालांशिवाय ठोस माहिती नसताना, पुस्तक राजद्रोही आहे, असा दांडगा आत्मविश्वास ते का दाखवत आहेत?”
लंडन टाईम्सनं सावरकरांचं पत्र नुसतं छापलंच नाही तर ब्रिटिशांच्या हेतूबद्दलच संशय आहे, खूप काही चुकलं आहे हे सांगण्यासाठी शेक्सपियर यांच्या हॅम्लेट नाटकातील “something very rotten in the state of Denmark” हे वाक्य उद्धृत केलं.

अभिनव भारतच्या सदस्यांनी पिकविक पेपर्स, स्कॉट्स वर्क अशा पुस्तकांची वेष्टणं घालून हजारो प्रती खोक्यांच्या तळाशी दडवून भारतात पाठवल्या पण सीमाशुल्क अधिकाऱ्यांना त्याचा पत्ताही लागला नाही. पुस्तकं लपवलेलं एक खोकं अभिनव भारतचे सदस्य सिकंदर हयात खान यांनी सुद्धा भारतात आणलं होतं, जे पुढे सर सिकंदर हयात खान म्हणून प्रसिद्धी पावले आणि पंजाबचे मुख्यमंत्री झाले. या सर्व प्रती टपाल खर्चही न घेता मोफत वितरीत करण्यात आल्या.
हा ग्रंथ नंतर फ्रान्समध्ये छापला जाऊन आयर्लंड, रशिया, अमेरिका, इजिप्त असा सर्वदूर पोहोचला.

पॅरिसमधून मादाम कामांनी या ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली. मार्च १९१०मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर पकडले गेले. त्यानंतर मादाम कामा, लाला हरदयाळ, विरेन्द्रनाथ चट्टोपाध्याय अशा सावरकरांच्या सहकाऱ्यांनी या ग्रंथाची तिसरी आवृत्ती काढायचं ठरवलं. अमेरिकेत अभिनव भारतची शाखा काढणारे आणि ‘गदर’ हे वृत्तपत्र चालवणारे लाला हरदयाळ यांनी तिसरी आवृत्ती प्रकाशित केली. (१९१२) पुस्तक विक्रीतून संस्थेसाठी निधीही मिळवला. ‘गदर’च्या माध्यमातून गुप्तपणे त्या पुस्तकाचे पंजाबी, उर्दू, हिंदी अनुवादही प्रसिद्ध झाले.

भगतसिंग यांच्याप्रमाणेच असंख्य क्रांतिकारकांना ‘१८५७’ या ग्रंथातून प्रेरणा तर मिळालीच पण त्यावेळी पकडल्या गेलेल्या बहुतेक क्रांतिकारकाकडे ‘१८५७’ची प्रत सापडली होती. भगतसिंग यांनी चौथी आवृत्ती (१९२८) दोन भागात छापली आणि त्याच्या विक्रीतून त्यांच्या संघटनेला निधी उपलब्ध झाला. या ग्रंथाला इतकी मागणी होती की, त्या काळी हा ग्रंथ ३०० रुपयांना विकला जात होता. भगतसिंग यांच्यासह हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या सदस्यांच्या घरांवर घातलेल्या धाडीत ‘१८५७’ या ग्रंथांच्या प्रती मिळाल्या होत्या.

रासबिहारी बोस, सुभाषचंद्र बोस यांनी जपानमध्ये या ग्रंथाची पाचवी आवृत्ती प्रकाशित केली. आझाद हिंद सेनेत या ग्रंथाची पारायणं केली जात होती. आझाद हिंद सेनेच्या सैनिकांवर घातलेल्या छाप्यात जीर्ण झालेली, फाटलेली पानं चिकटवलेली एक तमिळ भाषेतील आवृत्ती सापडली होती. आझाद हिंद सेनेनं प्रकशित केलेल्या त्या पुस्तकाचा अनुवाद जयमणी सुब्रमण्यम यांनी केला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आशीर्वादानं त्या तमिळ अनुवादाची दुसरी आवृत्ती देखील प्रसिद्ध झाली होती.

क्रांतिकारकांच्या गीतेचा मान मिळालेल्या या ग्रंथाच्या आवृत्त्या गुपचूप निघत राहिल्या. या ग्रंथावरची बंदी उठवावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. अखेर १९४६मध्ये जनमताच्या रेट्यामुळे या ग्रंथावरची बंदी उठवण्यात आली. ढवळे प्रकाशनानं १९४७मध्ये ‘१८५७’ची भारतातील पहिली आवृत्ती प्रकाशित केली.

विशेष म्हणजे मूळ मराठी हस्तलिखिताच्या बाबतीत १९४७ मध्ये एक विलक्षण घटना घडली. मूळ हस्तलिखित सावरकरांनी जपून ठेवण्यासाठी मादाम कामा यांच्याकडे दिलं होतं. त्यांनी ते पॅरिसमधल्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलं होतं. पहिल्या महायुद्धाच्या धामधुमीत ते नष्ट झालं असेल असंच वाटत होतं. १९३६ मध्ये मादाम कामा यांचंही निधन झालं. त्यामुळे हस्तलिखित मिळण्याची आशाही नष्ट झाली. पण नोव्हेंबर १९४७ मध्ये अमेरिकेत राहणाऱ्या रामलाल वाजपेयी यांनी सावरकरांना पत्र लिहून कळवलं की, ते हस्तलिखित लंडनमध्ये राहणाऱ्या डी. डी. एस. कुटिन्हो यांच्याकडे सुरक्षित आहे. कुटिन्हो हे अभिनव भारताचे सदस्य होते. त्यामुळे त्या सर्व गोंधळाच्या वातावरणात ते पोर्तुगालला निसटले आणि तिथून अमेरिकेला गेले. आपल्याकडचं हस्तलिखित जपण्यासाठी त्यांना देखील अनेक अग्निदिव्यातून जावं लागलं. त्यानंतर १९४९ मध्ये अमेरिकेच्या डॉ. गोहोकर यांनी ते हस्तलिखित प्रत्यक्ष सावरकरांच्या हाती सुपूर्द केलं आणि त्यानंतर मराठी ग्रंथाला प्रसिद्धीचा प्रकाश लाभला. ते मूळ हस्तलिखित आता मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ठेवण्यात आलं आहे. अशी आहे ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’ या विलक्षण ग्रंथाची विलक्षण गोष्ट..

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.