रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टर कोसळलं, दोन्ही वैमानिकांचा मृत्यू

160

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. छत्तीसगडमधील रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर गुरुवारी रात्री सरकारी हेलिकॉप्टर ऑगस्टा वेस्टलँडला अपघात झाला. हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित असलेल्या दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. लँडिंग दरम्यान हेलिकॉप्टर वेगाने जमिनीवर आदळले आणि त्याचा चक्काचूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी बचाव पथक आणि पोलीस उपस्थित आहेत. रात्री उशिरापर्यंत हेलिकॉप्टरचे भाग हटवण्याचे काम सुरू होते. या अपघातामुळे नियमित उड्डाणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे विमानतळ संचालकांनी सांगितले.

एएनआयच्या वृत्तानुसार, या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून जखमींना रामकृष्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पायलट ईपी श्रीवास्तव आणि कॅप्टन पांडा हे हेलिकॉप्टरमध्ये होते. सरावाच्या वेळी ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. हे हेलिकॉप्टर रायपूर राज्य सरकारचे असल्याचे सांगितले जात असून या दुर्घटनेत दोन पायलटांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ही घटना गुरूवारी रात्री ९.१० च्या सुमारास रायपूर विमानतळावर घडली आहे.

(हेही वाचा -NIA च्या अतिरिक्त महासंचालकपदी अतुलचंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती)

दरम्यान, रुग्णालय प्रशासनानंही दोघांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. दोघांनाही आता आयसीयूमधून बाहेर काढले जात असून मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवले जाणार आहे. या अपघातात हेलिकॉप्टरचे पूर्णपणे नुकसान झाले असून, त्याच्या पंखाचा काही भाग निखळला आहे. मात्र, या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही ट्विट करून या घटनेची माहिती दिल्याचे दिसतेय.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.