लखनऊ एक्स्प्रेसमध्ये सामूहिक बलात्कार, दरोडा! रातोरात पोलिसांनी ‘असा’ शोध लावला!

दरोडेखोरांनी प्रवाशांजवळील सुमारे ९८ हजारांची लूट केली, तसेच २० वर्षीय तरुणीसोबत अश्लील आणि अनैसर्गिक कृत्य केले.

67

लखनऊ येथून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये इगतपुरी ते कसारा दरम्यान ८ जणांच्या टोळीने दरोडा टाकून २० वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. या लुटमारीत ६ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून दरोडेखोरांनी सुमारे ९८ हजारांची लूट केली आहे. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी दरोडा आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून रात्रीतून कसारा येथून २ दरोडेखोरांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली.

लखनऊ येथून मुंबईकडे येणारी पुष्पक एक्सप्रेस शुक्रवारी काही तास उशिरा धावत होती. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी रेल्वे स्थानकावर आली असता काही संशयित इसम एक्सप्रेसच्या सी-१ बोगीत शिरले. एक्सप्रेस इगतपुरी स्थानकातून निघताच या संशयितांनी प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवत लूटमार सुरू केली, काही प्रवाशांनी विरोध करताच त्या प्रवाशांना या दरोडेखोरांनी मारहाण करून एका जागेवर बसण्यास सांगितले.

दरोडेखोरांनी असा घातला गोंधळ

दरोडेखोरांनी प्रवाशांजवळ असणारे मोबाईल फोन, अंगावरील दागिने, महिलांच्या अंगावरील दागिने ओरबडून काढले. एवढ्यावर न थांबता दरोडेखोरांनी प्रवाशांच्या बॅगा उचकटून त्यातील मौल्यवान वस्तू लुटल्या. ही लूटमार सुरू असताना काही दरोडेखोर या बोगीतून प्रवास करणाऱ्या २० वर्षीय तरुणीकडे आले व तिची छेड काढून तिचे कपडे काढून तिच्यासोबत चार ते पाच जणांनी अश्लील आणि अनैसर्गिक कृत्य केले. या सर्व प्रकारामुळे सी-१ बोगीत एकच गोंधळ, आरडाओरडा सुरू होता. भयभीत झालेले काही प्रवासी स्वतःला सीटखाली दडून बसले, तर काही जणांनी स्वतःला शौचालयात कोंडून घेतले होते. इगतपुरी ते कसारा स्थानकाच्या दरम्यान सी-१ बोगीत लूटमार महिला तरुणीची छेड काढणे, त्यांच्याशी अश्लील वर्तवणूक करणे हा प्रकार सुरू होता.

(हेही वाचा : खोटं बोलणा-यांना त्यावेळी बाळासाहेबांनी काढून टाकले! उद्धव ठाकरेंचा राणेंना अप्रत्यक्ष टोला)

…आणि दरोडेखोर काळोखात पसार

कसारा स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी दरोडेखोरांनी गाडीतून पटापट उड्या टाकून काळोखात पसार झाले. कसारा स्थानक आल्यावर प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढली. अनेकांनी स्थानकावरील पोलिसांना हाका मारल्या. कसारा स्थानकावर गाडी उभी राहताच सी- १ बोगीतील प्रवाशांनी फलाटावर येऊन आरपीएफ तसेच लोहमार्ग पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी प्रवाशांना त्यात एक्स्प्रेसमधून कल्याण रेल्वे स्थानकात उतरवून तक्रार दाखल करण्यासाठी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात आणले. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध दरोडा आणि सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्व लुटमारीत सुमारे ९८ हजारांचा ऐवज लुटण्याचा आला असल्याची माहिती रेल्वे पोलिसानी दिली.

कसारा येथून दोन दरोडेखोरांना अटक

दरम्यान लोहमार्ग पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांनी तात्काळ रेल्वे गुन्हे अन्वेषण विभाग आणि कल्याण रेल्वे पोलिसांचे विशेष पथक तयार करून दरोडेखोरांचा रात्रभर शोध घेऊन कसारा येथून दोन दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे असून फरार झालेल्या इतर सहा दरोडेखोरांचा कसून शोध घेण्यात येत आहे, लवकरच इतर दरोडेखोरांना अटक करण्यात येईल, अशी माहिती लोहमार्ग पोलिस विभागाचे पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.