
Savitribai Jotirao Phule Serial : क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी सुरू केलेल्या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेचा गौरवशाली इतिहास आता पुन्हा एकदा डिजिटल पडद्यावर जिवंत होणार आहे. ‘जगदंब क्रिएशन’ निर्मित ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ या मालिकेचे २० जूनपासून ‘मराठी वारसा’ (Marathi Warasa) या युट्यूब चॅनलवरून प्रसारण सुरू झाले आहे. मराठी मालिकाविश्वातील या पहिल्यावहिल्या अभिनव प्रयोगात डोंबिवलीची (Dombivli) चिमुरडी स्मिहा पाटोळे (Smiha Patole) हिची विद्यार्थ्यांनीच्या भूमिकेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील ३५०० हजार विद्यार्थ्यांनीमधून मालिकेसाठी निवड करण्यात आलेल्या सहा विद्यार्थ्यांनींची नावे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शुक्रवारी समाजमाध्यमावरून जाहीर केली.
स्मिहा पाटोळे ही डोंबिवलीच्या टिळकनगर विद्यामंदिर शाळेत इयत्ता चौथीत शिकत असून ती अवघ्या ९ वर्षांची आहे. सावित्रीमाईंनी सुरू केलेल्या पहिल्या शाळेतील पहिल्या सहा विद्यार्थिनींपैकी एक असलेल्या सोनू पवार हिची ऐतिहासिक व्यक्तिरेखा स्मिहा साकारताना दिसणार आहे. (Savitribai Jotirao Phule Serial)
(हेही वाचा – FIH Women’s Nations Cup 2026 : भारतीय महिला हॉकी संघाला नेशन्स कपचे विजेतेपद)
अशी झाली निवड
स्मिहाला मिळालेली ही भूमिका सहजसाध्य नव्हती. या मालिकेतील ६ विद्यार्थिनींच्या भूमिकांसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल ३,५०० मुलींनी ऑडिशन्स दिल्या होत्या. अभिनयाचे कोणतेही शास्त्रशुद्ध किंवा पूर्व प्रशिक्षण पाठीशी नसतानाही, केवळ स्वतःच्या उपजत कलागुणांच्या आणि कौशल्याच्या जोरावर स्मिहाने या सर्व स्पर्धकांवर मात करत बाजी मारली. (Savitribai Jotirao Phule Serial)
१२ तासांचे कठीण शूटिंग आणि जिद्द
नऊ वर्षांच्या स्मिहासाठी चंदेरी दुनियेचे हे क्षेत्र पूर्णपणे नवीन आहे. डोंबिवली ते गोरेगाव फिल्मसिटी असा प्रवास आणि त्यानंतर सेटवर १२ तासांचे शूटिंग, हे तिच्यासाठी नक्कीच आव्हानात्मक आहे. परंतु, स्मिहा या आव्हानाचे कोणतेही दडपण न घेता त्याचा आनंद घेत आहे. संवादांचे पाठांतर असो वा कॅमेऱ्यासमोरील सादरीकरण, ती अगदी सहजपणे अभिनय करते. सेटवरचा तिचा मोकळा वावर आणि दिग्दर्शकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची तिची वृत्ती यामुळे सेटवरील सर्वजण तिचे कौतुक करत आहेत. (Savitribai Jotirao Phule Serial)
अभिनय हे स्मिहाचे स्वप्न किंवा पॅशन नसले, तरी या निमित्ताने तिला काहीतरी नवीन शिकण्याची आणि ऐतिहासिक अनुभवाला सामोरे जाण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. लहान वयातच वक्तशीरपणा, कठोर परिश्रम आणि वेळेचे नेटके नियोजन यांसारख्या गोष्टी ती शिकत असल्याचे तिचे पालक सांगतात. महिलांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचा इतिहास जिवंत करणाऱ्या या मालिकेत पहिली विद्यार्थिनी साकारण्याचा स्मिहाचा हा प्रवास डोंबिवलीकरांसाठी आणि तिच्या शाळेसाठी अभिमानास्पद ठरला आहे. स्मिहा सोबतच कार्तिकी सोनार, सार्थकी रांजणीकर, अनघा शिंदे, गार्गी आहेर, शरण्या गायकवाड या राज्यभरातील अन्य विद्यार्थ्यांनीचीही मालिकेसाठी निवड झाली आहे. (Savitribai Jotirao Phule Serial)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
