रुग्ण दगावल्यास आता डॉक्टरांना जाब विचारता येणार नाही!

120

डॉक्टर त्यांची पूर्ण क्षमता वापरुनही जर रुग्णाला वाचवू शकले नाही, तर आता डॉक्टरांना दोष देता येणार नाही, कारण
कोणताही डॉक्टर आपल्या रुग्णाला जीवनाची हमी देऊ शकत नाही. पण प्रत्येकावर डाॅक्टर त्याच्या क्षमतेनुसार उपचार करण्याचा प्रयत्न करू शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले. एखाद्या डॉक्टरला केवळ वैद्यकीय निष्काळजीपणासाठी दोषी ठरवता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

काय म्हणाले न्यायालय

एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला किंवा अपघात झाला तर डॉक्टरांना दोष देण्याची प्रवृत्ती आहे. अशा परिस्थितीत मृत्यू न स्वीकारणे हे कुटुंबीयांचे असहिष्णु आचरण आहे. रुग्णाच्या मृत्यूसाठी संबंधीत डाॅक्टरला जबाबदार धरणे, डाॅक्टरांना मारहाण करण्याचे अनेक प्रकार या कोरोना काळात पाहायला मिळाले आहेत. अशी व्यथा न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि व्ही रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने मांडली. वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढण्यासाठी न्यायनिवाडा करणार्‍या अधिकार्‍यांसमोर पुरेसे वैद्यकीय पुरावे उपलब्ध असले पाहिजेत, असेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. रुग्णाचा मृत्यू हा वैद्यकीय निष्काळजीपणा मानला जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण 

दिनेश जैस्वाल या रुग्णाचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला. रुग्णाच्या मृत्यूसाठी त्याच्या कुटुंबीयांनी डॅाक्टरांना जबाबदार धरुन राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगात तक्रार केली. त्यावर बॅाम्बे हॅास्पीटल अॅंड मेडिकल रिसर्च सेंटरने सर्वोच्च न्यायालयात अपील केलं. यावर सुनावणी करताना, खंडपीठ म्हणाले की, ज्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत्या त्या सुविधांमध्ये हॅास्पीटलने रुग्णाला उत्तम सुविधा दिल्या. रुग्णाला हाॅस्पीटलमध्ये दाखल होण्याआधीच गंभार स्थितीत गॅंगरीन झाला होता. त्यामुळे रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर वाचवता आले नाही, यात डॅाक्टरांचा दोष नाही असे सुनावणी करताना खंडपीठाने म्हटले आहे.

न्यायालय पुढे म्हणाले की, ऑपरेशनच्या वेळी हॅास्पीटलमधील तज्ज्ञ डाॅक्टरांची टीम उपलब्ध होती. रुग्णाची योग्य ती काळजी घेण्यात आली होती. पण, दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाला त्यासाठी डॅाक्टरांना दोष देता येणार नाही. कुटुंबाला आपल्या प्रिय माणसाला गमवावे लागले हे मान्य आहे पण त्यासाठी रुग्णालय वा डॅाक्टर जबाबदार नाहीत. असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

 ( हेही वाचा: माथाडी कामगार चाळींतून जाणार थेट आलीशान घरांत! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.