अंदमानातील सावरकर कोठडीतील इतिहास खरवडून काढला, कोण आहे दोषी?

155

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी क्रांतीची ज्योत पेटवली आणि ब्रिटिशांना नाकीनऊ आणली, ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटिशांनी ज्या अंदमानातील कोठडीत ठेवले होते, त्या कोठडीत वीर सावरकर यांनी कोठडीतील भिंतींवर महाकाव्य लिहिले. मात्र मागील वर्षांपासून सावरकर कोठडीतील भितींवरील प्लास्टर खरवडून काढले आहे आणि तिथे भिंतीच्या विटा दिसत आहेत. अजून त्यावर प्लास्टर केले नाही. अशा प्रकारे वीर सावरकर यांनी अंदमानातील कोठडीतील भिंतीवर लिहिलेले काव्य सरकारला ठेवायचे होते की नष्ट करायचे होते? इथला इतिहास खरवडून काढला गेला आहे, असे गंभीर विधान राष्ट्रीय प्रवचनकार, ज्येष्ठ इतिहासकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ सोबत बोलतांना केले.

नूतनीकरणाच्या नावाखाली सावरकर कोठडी बनवली खिंडार 

डॉ. शेवडे हे अंदमानात ‘सावरकर वंदनयात्रे’वर होते त्यांच्यासोबत अनेक पर्यटक होते. त्यावेळी पर्यटकांना वीर सावरकरांची कोठडी दाखवण्यासाठी डॉ. शेवडे गेले असता कोठडीतील भिंतीवरील प्लास्टर खरवडून काढण्यात आल्याचे दिसले, कोठडीतील भिंतीवरील विटा दिसत आहे. कोठडीतील भिंतींचे छायाचित्रे काढून ती जेव्हा सोशल मीडियातून व्हायरल केली, तेव्हा खळबळ उडाली. याविषयी ‘हिंदुस्थान पोस्ट’ च्या वतीने डॉ. शेवडे यांच्याकडून तेथील वस्तुस्थिती समजून घेतली. त्यावेळी डॉ. शेवडे म्हणाले की, सरकारला जर अंदमान येथील सेल्युलर जेलचे नूतनीकरण करायचे असेल, तर तेथील भिंतींचा रंग खरवडून काढायचा असतो, तुम्हाला प्लास्टर खरवडून काढायची काय गरज? वीर सावरकर यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीतील प्लास्टरच खरवडून काढले आहे. गेल्या वर्षी जेव्हा तेथील प्लास्टर खरवडून काढले जात होते, तेव्हा मी तिथे होतो. त्यांना विचारले होते, तेव्हा त्यांनी मला सांगितले होते की, कारागृहाचे नूतनीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे आपण काय बोललो नाही, परंतु जेव्हा यावर्षी जेव्हा मी पाहतो तेव्हा संपूर्ण जेलमधील खोल्यांच्या भिंतींचे प्लास्टर खरवडून काढलेले दिसत आहे, मग याला नूतनीकरण कसे म्हणता येईल? जर नूतनीकरण असेल तर भिंतींवर नवीन प्लास्टर केले पाहिजे होते. आता तिथे कुठेही काम सुरु नाही. जर तेथे नूतनीकरणाचे काम सुरु असते, तर काही आक्षेप घेता आला नसता. बहुतेक परत प्लास्टर लावणार असतील असे म्हणता आले असते, परंतु आता तिथे भिंती नाही तर विटा दिसत आहेत, हे तर सावरकर कोठडीची नूतनीकरणाच्या नावाखाली केलेले खिंडार आहे, असे डॉ. शेवडे म्हणाले.

veer savarkar 1

(हेही वाचा अखेर ‘इंटरनॅशनल हलाल शो’ रद्द, हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनाचा परिणाम)

सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारकात अनागोंदी कारभार

वीर सावरकरांच्या खोलीत जी पाटी लावली आहे, ज्यावर लिहिले आहे की, ‘कमला’सारखे महाकाव्य इथे जन्माला आले’. ही पाटी पाहून आमच्यासोबत आलेले पर्यटक विचारायला लागले की, वीर सावरकर यांनी त्यांचे काव्य कुठे लिहिले होते? तेव्हा त्यांना खोलीतील विटा दाखवाव्या लागल्या. त्यावर पर्यटक म्हणाले, ‘विटांवर लिहिता येते का?’ त्यावर पर्यटकांच्या प्रश्नाचे आपल्याकडे उत्तर नव्हते. मुळात हे असे करण्याची गरज काय होती? इथे वीर सावरकर यांनी लिहिलेले काव्य तुम्हाला ठेवायचे होते की नष्ट करायचे होते? इथे इतिहास नष्ट झाला, असे म्हणायला जागा आहे. वीर सावरकर यांनी भितींवर महाकाव्य लिहिले तेव्हा ते आजही शाबूत राहील, असे आम्ही समजत नाही, पण पर्यटकांना जेव्हा आम्ही सांगतो की, ही भिंत दिसत आहे, त्यावर वीर सावरकर यांनी महाकाव्य लिहिले होते, तेव्हा तिथे भिंत दिसली पाहिजे ना, तिथे विटाच दिसत आहेत. इतिहास खरवडून काढला गेला आहे. यामागे नेमके डोके कुणाचे? आता तर गेली २-४ वर्षे काँग्रेस सरकार नाही. त्यामुळे काँग्रेसवर खापर फोडता येणार नाही. समजा काँग्रेसने असा प्रस्ताव पारित केला असेल तर तो तुम्ही स्थगित केला पाहिजे होता. तेही केले नाही. तिथे लाईट अँड शो चालू होता, तोही बंद आहे, आता तिथे लेझर शो चालू करणार आहेत. लेझर शो तयार आहे, पण तो चालू केला नाही, तेथील लोक सांगतात लेझर शो चे पेमेंट झाले नाही. मग तुम्ही आधीच लाईट अँड शो बंद केला आहे आणि नवीन लेझर शो सुरूच केला नाही, तर मग हा अनागोंदी कारभार नाही का? हे राष्ट्रीय स्मारक आहे ना. जर त्यात तांत्रिक अडचणी असतील तर आधीचा लाईट अँड शो चालू ठेवायला हवा होता.

(हेही वाचा इराणमधील मुस्लिम युवती मौलवींच्या डोक्यावरील टोप्या उडवतायेत, हिजाबविरोधी आंदोलनाला अनोखे वळण )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.