अखेर के.पी. गोसावीला अटक! कोणत्या गुन्ह्याखाली घेतले ताब्यात? 

कॉर्डिलीया क्रूझवर कारवाईत ८ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी आर्यन खानसोबत गोसावी याने सेल्फी काढून तो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर गोसावी चर्चेत आला.

88

क्रूझवरील ड्रग्स पार्टीप्रकरणी किंग खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यावर त्याच्यासोबत सेल्फी काढलेला के.पी. गोसावी नंतर पुढे चर्चेत आला. त्याच्या विरोधात पुण्यातील तरुणाने परदेशात नोकरी मिळवून देतो म्हणून फसवणूक केल्याची पोलिसांत तक्रार केली आहे. या तक्रारीवरून पुणे पोलिसांनी गोसावीला गुरुवारी, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी अटक केली.

असा चर्चेत आला गोसावी!

कॉर्डिलीया क्रूझवर ड्रग्स पार्टी होणार होती, ही माहिती एनसीबीला मिळाली, तेव्हा एनसीबीने क्रूझवर धाड टाकली. त्यावेळी ८ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी आर्यन खानसोबत गोसावी याने सेल्फी काढून तो सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे अवघ्या जगाला एक क्षणात या कारवाईत शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला अटक झाल्याचे समजले. त्यानंतर गोसावी चर्चेत आला. तो घटनास्थळी कसा, असा प्रश्न एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विचारल्यावर तो कारवाईत पंचाच्या भूमिकेत होता, असे उत्तर एनसीबीने दिले होते. मात्र त्यानंतर गोसावी फरार होता.

(हेही वाचा : दोन दिवसात जामीन नाही मिळाला तर आर्यन खानची दिवाळी तुरूंगातच!)

महाराष्ट्र पोलिस का लागले मागे?

  • किरण गोसावी हा परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्स रिक्रूटमेंट कंपनीचा मालक असल्याची माहिती आहे. के. पी. जी. ड्रीम्स कंपनीचे मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरतो, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता.
  • गोसावीने पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची २०१८ मध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे. मलेशियात नोकरी लावण्याच्या आमिषाने किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी चिन्मयची तीन लाखांना फसवणूक केली होती. त्यानंतर २०१८ मध्ये दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच गुन्ह्यात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक केली.
  • पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केळवे सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन तरुणांना परदेशात नोकरीनिमित्त पाठवण्यासाठी दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांची गोसावींनी फसवणूक केल्याचा दावा केला जात आहे.
  • या सर्व गुन्ह्याखाली पोलिस त्याचा शोध घेत होते. बुधवारी संध्याकाळी गोसावी पुणे पोलिसांना शरण येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. तो शरण आला नाही. अखेर पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याविरूद्ध लूक आऊट नोटीसही जारी केली होती.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.