भारतीय जहाजबांधणी उद्योगात कोट्यवधींचा घोटाळा, गुन्हा दाखल

181
भारतीय जहाजबांधणी उद्योगाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा समोर आला आहे. परदेशी जहाजावर काम करणाऱ्या सुमारे एक लाख ६० हजार भारतीय नाविकांच्या भविष्य निर्वाह निधी, कल्याण निधी योगदान आणि सामाजिक भत्ता यामध्ये हजारो कोटींचा घोटाळ्याप्रकरणी ‘नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडिया’ (नुसी) च्या सरचिटणीस आणि खजिनदार यांच्याविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.
परदेशी खाजगी मालवाहू जहाजे तसेच भारतातील मालवाहू जहाजावर काम करणाऱ्या नाविकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिप मॅनेजर्स असोसिएशन आणि मेरीटाइम असोसिएशन ऑफ शिप ओनर्स शिप मॅनेजर्स अँड एजंट्स आणि वन युनियन नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडिया (नुसी) किंवा वैयक्तिक मॅनिंग एजंट या सारख्या संघटना आहेत. या संघटना नाविक आणि जहाज मालकांचे प्रतिनिधित्व करतात. भारतातून २ लाख नाविकांपैकी १ लाख ६० हजार नाविक हे परदेशी जहाजावर काम करत असून, उर्वरित ४० हजार नाविक भारतीय माल वाहू जहाजांवर आहेत. जहाज मालक आणि संघटनांमध्ये झालेल्या करारांनुसार वेतन ठरवले जाते.

( हेही वाचा :‘त्यांच्याकडून चूक झाली, मुख्यमंत्र्यांनी दिली समज’, गोगावलेंच्या विधानावरुन केसरकरांचे स्पष्टीकरण )

ज्या कंपन्या विदेशी मालवाहू जहाजांवर नॅशनल युनियन ऑफ सीफेअर्स ऑफ इंडिया (नुसी) च्या माध्यमातून नियुक्त करण्यात येते, अशा खलाशांच्या पगारातून दरमहा एक रक्कम कापली जाते, ही रक्कम नाविकांच्या भविष्य निर्वाह निधी, सामाजिक भत्ता, कल्याण निधी योगदान यासाठी नुसी खाजगी ट्रस्टकडे दरमहा हस्तांतरित केली जाते. मागील अनेक वर्षांपासून काढण्यात येणाऱ्या या रकमेत मोठा घोटाळा झाला असल्याचे समोर आले आहे. अनेक नाविकांनी याबाबत फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया यांच्याकडे तक्रारी केलेल्या होत्या. या संघटनेच्या तपासात ही बाब लक्षात आली असून, नुसी या  संघटनेचे सेक्रेटरी लिओ बान्स आणि खजिनदार अब्दुल गनी याकूब सारंग यांनी नाविकांच्या निधीचा अपहार केला असून, ही फसवणूक हजारो कोटींच्या घरात आहे. या प्रकरणी फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया या संघटनेकडून मुंबई आर्थिक गुन्हे शाखा, ईडी, सीबीआय या ठिकाणी तक्रारी दाखल केल्या असून, मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात लिओ बांस आणि अब्दुल गनी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. लिओ बांस यांचा मृत्यू झाला असून, या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून सर्वस्तरातून तपास केला जात असल्याचे, आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.