ठाण्यात तीन वर्षांत २२ माकडांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

101

मुंबई, ठाणे परिसरात गेल्या काही वर्षांत माकडांकडून माणसांवरील हल्ले वाढत असताना ठाण्यात २२  माकडांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. २०१९ ते २०२१ या तीन वर्षांच्या काळात तब्बल २२ माकडांना विजेच्या धक्क्याने प्राण गमवावा लागला. वनविभागाच्या नोंदणीतूनच ही माहिती समोर आली आहे.

माकडांच्या मानवी वस्तीजवळ वावर

वनविभाग व वन्यप्राणी बचाव कार्यासाठी वनविभागाला साहाय्य करणा-या खासगी प्राणीप्रेमी संस्था यांच्यात गेल्या वर्षी पार पडलेल्या संयुक्तिक बैठकीत मुंबई, ठाणे व महानगर परिसरात वाढत्या माकडांच्या मानवी वस्तीजवळील वावर आणि हल्ल्याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली होती. मानवी वस्तीजवळ माकडांना होणा-या दुखापती तसेच मृत्यूविषयीही चिंता व्यक्त करण्यात आली होती. विजेच्या धक्क्याने मृत्यू होणा-या माकडांमध्ये वानर आणि लाल तोंडाच्या माकडांचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

ठाण्यातील विजेच्या धक्क्याचे हॉटस्पॉट

मानवी वस्तीजवळील विजेच्या तारांवर पडून किंवा झाडांवरील विजेच्या तारांशी संपर्क आल्याने ठाण्यातील वागळे इस्टेट हा माकडांसाठी धोकादायक ठरल्याची माहिती वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन (डब्ल्यूडब्ल्यूए) या प्राणीप्रेमी संस्थेचे अध्यक्ष आदित्य पाटील यांनी दिली. वागळे इस्टेटसह ठाणे रेल्वे स्थानकावरील विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने माकडांचा मृत्यू होत आहे. तीनहात नाका, नवपाडा या भागांतही विजेच्या धक्क्याने माकडांचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती पाटील यांनी दिली.

(हेही वाचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग का बनलाय मृत्यूचा सापळा?)

माकडे काही काळासाठी इमारतींवर मुक्काम करतात

ठाण्यानजीकच्या परिसरात रेल्वे लाईनला लागून असलेल्या कळव्यातील मफतलाल झोपडपट्टीतील मदा-यांकडून सुटलेली माकडेही विजेच्या धक्क्यामुळे प्राणाला मुकल्याच्या घटना नोंदीत आहेत. त्यासह ठाण्याहून मुलुंडमार्गे तसेच नवी मुंबईमार्गे जाणा-या रेल्वेच्या विजांच्या तारांवरही माकडांना शॉक लागून मृत्यू झाला असल्याची माहिती पाटील यांनी दिली. ठाण्यात घोडबंदर परिसरात माकडांना विजेच्या तारांचा त्रास नसला तरीही या भागांत माकडांचा मोठ्या प्रमाणात हैदोस दिसून येत आहे. बांधकाम इमारतीतील बांबूवर चढून माकडे काही काळासाठी या इमारतींवरच मुक्काम करतात. नजीकच्या मानवी वस्तीत माकडांकडून त्रास होत असल्याच्याही अनेक तक्रारी आहेत.

मृत्यू होण्यामागील कारणे 

वीजेचा धक्का लागल्याने माकड उंचावरून जोरात जमिनीवर आदळते. शरीरातील अंतर्गत रक्तस्त्राव हे मृत्यूमागील प्रमुख कारण असते. कित्येकदा जखम सहन झाल्याने माकडच त्या भागाचा जोरात चावा घेत जखमेतील रक्तस्राव वाढवते.

प्राणीप्रेमींची मागणी 

मानवी वस्तीजवळील माकडांचा वावर कमी करण्यासाठी मुळात माणसांनी वनविभागाने दिलेल्या आवश्यक सूचनांचे पालन करावे. माकडांना वीजांच्या तारांपासून वाचवण्यासाठी तारा जमिनीखालून घालण्याची तजवीज केली जावी. झाडांच्या फांद्यांची छाटणी करतानाही वीजेच्या तारा तुटत तर नाही ना किंवा इतरत्र फांदी किंवा पुन्हा झाडांवर ठेवली नाही पाहिजे.
– आदित्य पाटील, अध्यक्ष, वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन

गेल्या तीन वर्षांतील माकडांच्या मृत्यूंची आकडेवारी

वर्ष – मृत माकडांची संख्या

  • २०१९-२० – ४
  • २०२०-२१ – १०
  • २०२१-२२ – ७
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.