शाळा-कॉलेज बंद मग परीक्षा कशा घेणार?

110

केंद्र सरकारने अनलॉक ४ च्या दिशेन पाऊल टाकले असून, शनिवारी केंद्र सरकारने अनलॉक ४ चा टप्पा जाहीर केला आहे. अनलॉक ४ मध्ये ३० सप्टेंबपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंदच राहणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर राज्याचे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शाळा-कॉलेज बंद मग परीक्षा कशा घ्यायच्या असा सवाल केंद्र सरकारला उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घ्याव्याच लागतील असे निर्देश दिले होते. त्यानंतर भाजपाकडून ठाकरे सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती.

काय म्हणाले उदय सामंत

केंद्र सरकार म्हणते ३० तारखेपर्यंत शाळा व महाविद्यालय लॉकडाऊनमुळे बंद राहणार. यूजीसी म्हणते ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्या. राज्य सरकारने आणि विद्यार्थ्यांनी नक्की करायचे काय? ३० सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज बंद असतील तर परीक्षा घ्यायच्या कशा? असे ट्विट सामंत यांनी केले आहे.

काय आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय

सुप्रीम कोर्टाने परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय दिला आहे. परीक्षांसंदर्भात यूजीसीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले असून,  यूजीसीच्या ६ जुलैच्या गाईडलाईन्सनुसार ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यास सांगितले होते. तसेच ३० सप्टेबरपर्यंत परीक्षा घेऊ न शकणाऱ्या राज्यांनी परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यासाठी यूजीसीशी संपर्क करावा, असे देखील कोर्टाने म्हटले आहे. एखाद्या राज्याला जर परीक्षा घ्यायची नसेल तर त्यांनी यूजीसीशी चर्चा करावी असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. आज न्या. अशोक भूषण, न्या. सुभाष रेड्डी, न्या. एम.आर.शाह यांनी हा फैसला सुनावला आहे.

राज्य सरकारची भूमिका

राज्यातील १४ सार्वजनिक विद्यापीठात आत्ता ७ लाख ३४ हजार ५१६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणारे यात २ लाख ८३ हजार ९३७ विद्यार्थी आहेत. राज्य सरकारने पदवीच्या मुलांच्या परीक्षा होणार नाहीत असे म्हटले आहे. पण यूजीसी परीक्षांवर ठाम होती. ३०  सप्टेंबरच्या आत परीक्षा घ्याव्यात अशा मार्गदर्शक सूचनाही यूजीसीने दिल्या आहेत. त्याविरोधात महाराष्ट्र, ओडिशा आणि दिल्ली सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याशिवाय आदित्य ठाकरे यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी आणि संस्थांनीही सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.