
Tukaram Mundhe : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, यांच्या निर्देशांनंतर राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांविरोधात कारवाईची मोहीम वेगाने सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून वसई-विरार (Vasai Virar) परिसरात, गेल्या १८ दिवसांत अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत, तब्बल १४ लाख रुपयांहून अधिक किमतीचा संशयित अन्नसाठा आणि प्रतिबंधित पदार्थ जप्त केले आहेत.
२७ मे पासून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल, आईस्क्रीम तसेच प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेमुळे परिसरातील अनेक व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: Abhijit Dipake Jaipur : कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेला जयपूरमध्ये मारहाण; Video व्हायरल
जुन्या डब्यांमध्ये साठवलेले हजारो किलो खाद्यतेल जप्त
उपलब्ध माहितीनुसार, या कारवाईदरम्यान अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांनी, वसई-विरारमधील तीन वेगवेगळ्या आस्थापनांवर छापे टाकले. या छाप्यांमध्ये ४ हजार ७९८ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या तेलाची किंमत ९ लाख ९४ हजार ६९८ रुपये इतकी असल्याचे प्रशासनाने सांगितले.
प्राथमिक तपासात हे तेल आरोग्यास अपायकारक ठरू शकणाऱ्या जुन्या आणि पुनर्वापर केलेल्या डब्यांमध्ये साठवण्यात आल्याचे आढळून आले. या तेलाचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
निकृष्ट दर्जाच्या आईस्क्रीमवरही कारवाई
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने आईस्क्रीम उत्पादक आणि विक्रेत्यांची तपासणी सुरू केली. या तपासणीत ९८६ लिटर निकृष्ट दर्जाचे आईस्क्रीम जप्त करण्यात आले. या साठ्याची किंमत १ लाख ९७ हजार २०० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
अन्नसुरक्षेच्या निकषांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा: Drip irrigation: पाऊस लांबल्यामुळे शेतकरी चिंतेत, पिके वाचवण्यााठी ठिबक सिंचनाचा वापर
गुटखा-पानमसाला विक्रेत्यांवरही धडक मोहीम
प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या विक्रीविरोधातही प्रशासनाने व्यापक कारवाई केली. या मोहिमेत १८ दुकाने सील करण्यात आली, तर २ लाख १० हजार ५७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात पोलिस आणि संबंधित यंत्रणांच्या मदतीने १९ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.
FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या धडक मोहिमेमुळे, भेसळ माफिया आणि प्रतिबंधित पदार्थ विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, राज्यभर अशाच प्रकारच्या कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Join Our WhatsApp Community
