Thane: ठाण्यात नवं प्राणिसंग्रहालय उभारणार, १० कोटी रुपयांची तरतूद; कसा असेल प्रकल्प? वाचा सविस्तर

56
Thane: ठाण्यात नवं प्राणिसंग्रहालय उभारणार, १० कोटी रुपयांची तरतूद; कसा असेल प्रकल्प? वाचा सविस्तर
Thane: ठाण्यात नवं प्राणिसंग्रहालय उभारणार, १० कोटी रुपयांची तरतूद; कसा असेल प्रकल्प? वाचा सविस्तर

Thane: मुंबईतील जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर ठाण्यात अत्याधुनिक वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चितळसर-मानपाडा (टिकुजिनी वाडी) येथील सुमारे १० हेक्टर आरक्षित जागेवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने सुरुवातीला १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या प्रकल्पामुळे ठाणेकरांना शहरातच निसर्ग, जैवविविधता आणि विरंगुळ्याचा अनुभव घेण्यासाठी नवे आकर्षण उपलब्ध होणार आहे.

राज्य सरकारच्या नगरविकास विभागामार्फत महापालिकांमधील विविध विकासकामांसाठी निधी मंजूर केला आहे. त्याअंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी मंजूर झालेल्या १५० कोटी रुपयांच्या निधीत या प्रकल्पाचाही समावेश आहे. २० जुलैला जारी केलेल्या सरकारच्या शुद्धीपत्रकानुसार वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयासाठी सुरुवातीला १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? अहिल्याबाईंच्या पुतळ्यासमोर महिलांना नाचवण्यावरून MNS ची टीका

दर्जेदार विरंगुळ्याच्या सुविधा
चितळसर-मानपाडा येथील सव्हें क्रमांक ५१/अ/१/१ मधील आरक्षण क्रमांक ४ च्या जागेवर हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. या ठिकाणी विविध प्रजातींच्या वनस्पतींचे संवर्धन, प्राणिसंग्रहालय, पर्यावरणविषयक जनजागृती, जैवविविधतेचे संवर्धन तसेच नागरिकांसाठी दर्जेदार विरंगुळ्याच्या सुविधा निर्माण करण्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

कुटुंबासह निसर्गाचा आनंद घेण्याची संधी
विशेषतः विद्यार्थी आणि मुलांना निसर्ग व वन्यजीवांची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळावी, या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. वेगाने नागरीकरण होत असलेल्या ठाण्यात पर्यावरणपूरक सार्वजनिक जागांची गरज वाढत आहे. अशा पार्श्वभूमीवर हा प्रकल्प शहराच्या पर्यटन क्षमतेलाही चालना देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणेकरांना अशा सुविधांसाठी मुंबईकडे धाव घ्यावी लागणार नाही, तर शहरातच कुटुंबासह निसर्गाचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध होईल.

नागरीकरण, पर्यावरणाचा समतोल
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार, ठाण्यातील विविध विकासकामांसाठी राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे. त्यात या प्रकल्पाचाही समावेश आहे. शहराचा विकास करताना पर्यावरण आणि नागरीकरण यांचा समतोल राखण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भविष्यात ठाण्याची ओळख वाढविणाऱ्या पर्यटनस्थळांमध्ये या उद्यानाचा समावेश व्हावा या दृष्टीने त्याचा विकास करण्यात येईल, असेही त्यांच्याकडून नमूद करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.