आयटीआयमधील अभ्यासक्रमासाठी विशेष स्पर्धा, विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

89

आयटीआयच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. शनिवारपर्यंत तब्बल ६७ हजार ९९० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे, अशी माहिती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

मागील काही वर्षांपासून आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून, अधिकाधिक विद्यार्थी कौशल्याधारित प्रशिक्षण घेऊन रोजगार किंवा स्वयंरोजगार करत आहेत. आता उद्योगांमधील बदलते नवीन तंत्रज्ञान आणि त्या अनुषंगाने आयटीआयच्या अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी विभागाने पुढाकार घेतला असून, यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून १५ नोव्हेंबरपर्यंत ही राज्यस्तरीय स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.

(हेही वाचाः EPFO: PF धारकांना मोठा धक्का, पेन्शनवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला)

विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निवडण्याची संधी

याअंतर्गत वेगळ्या हटके संकल्पना सुचवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार आहेत. औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात वेगाने बदल होत असल्याच्या काळात विद्यार्थ्यांना नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे बनले आहे. हे लक्षात घेऊन आयटीआयमध्ये शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्सेस सुरु करण्याचा निर्णय विभागाने घेतला असून स्वत: अभ्यासक्रम निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

या स्पर्धेअंतर्गत सर्वाधिक २० हजार ७६० इतक्या विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगाराशी संबंधित अभ्यासक्रम सुचवण्यासाठी सहभाग घेतला आहे. त्या खालोखाल २० हजार ३६४ विद्यार्थी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम सुचवण्यासाठी स्पर्धेत सहभागी झाले आहेत. कृषी क्षेत्रातील अभ्यासक्रम सुचवण्यासाठी १७ हजार ४४५ विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले आहेत, तर ४ हजार २५५ विद्यार्थी महिला रोजगाराशी संबंधित अभ्यासक्रम सुचवणार आहेत.

(हेही वाचाः आदिवासींच्या ‘उंची’वरुन MPSC, UPSC च्या निकषांत तफावत, MPSC च्या कारभारावर आक्षेप)

५ हजार १६६ विद्यार्थ्यांनी अतिशय उपयुक्त अभ्यासक्रम सुचवण्यासाठी स्पर्धेत नोंदणी केली आहे. स्पर्धेत सुमारे ५६ हजार २०७ इतक्या मुलांनी तर ११ हजार ७०५ इतक्या मुलींनी सहभाग घेतला आहे. यातील सुमारे 61 टक्के विद्यार्थी हे आयटीआयच्या प्रथम वर्षातील तर 27 टक्के विद्यार्थी हे द्वितीय वर्षात शिकणारे आहेत.

कशी आहे स्पर्धा ?

या स्पर्धेत विद्यार्थ्यांना शेती, स्वयंरोजगार, महिलांचे रोजगार, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम व अन्य उपयुक्त अभ्यासक्रम सुचवता येणार आहेत. ते विषय कसे उपयुक्त आहेत हे देखील सांगायचे आहे. सुचवलेले अभ्यासक्रम एनएसक्यूएफशी संलग्न असावेत. सर्वोत्कृष्ट विषयानुसार विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. त्यासाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली निवड समिती नियुक्त केली आहे.

सर्वोत्कृष्ट संकल्पना सुचवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जाणार असून, त्यांनी सुचवलेल्या अभ्यासक्रमांचा आयटीआयमध्ये समावेशासाठी विचार केला जाणार आहे, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.