जखम असताना साचलेल्या पावसाच्या पाण्यातून चाललात, तर दुर्लक्ष करू नका..

तात्काळ वैद्यकीय उपचार घ्या

140
जखम असताना साचलेल्या पावसाच्या पाण्यातून चाललात, तर दुर्लक्ष करू नका..
जखम असताना साचलेल्या पावसाच्या पाण्यातून चाललात, तर दुर्लक्ष करू नका..

मुंबईत मागील काही दिवस अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. यादरम्यान ज्या व्यक्ती तुंबलेल्या पाण्यातून चालल्या आहेत, अशा व्यक्तींना लेप्टोचा (Leptospirosis) संसर्ग होण्याची शक्यता असते. तर ज्या व्यक्तींच्या शरीरावरील जखम किंवा खरचटलेल्या भागाचा साचलेल्या पाण्याशी किंवा चिखलाशी संपर्क आला असेल, त्या व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत, असे आवाहन महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. ‘लेप्टोस्पायरोसिस’ हा एक गंभीर आजार असून वेळीच औषधोपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे याबाबत वेळीच प्रतिबंधात्मक औषध उपचार करणे गरजेचे आहे, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी सार्वजनिक आरोग्य खात्याला जनजागृतीसह आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी कळविले आहे की, पावसाच्या पाण्यातून किंवा चिखलातून चाललेल्या व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. शहा यांनी कळविले आहे की, अतिवृष्टी दरम्यान पावसाच्या साचलेल्या किंवा वाहत्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते.

याच पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’ या रोगाचे ‘लेप्टोस्पायरा’ (स्पायराकिट्स) हे सूक्ष्म जंतू असू शकतात. अशा बाधीत पाण्याशी माणसाचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. तसेच व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल; तरी अशा छोट्याशा जखमेतून सुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल, त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत, असेही आवाहनही त्यांनी केले आहे.

(हेही वाचा – Heavy Rain : मुसळधार पावसाने शहराला झोडपले; अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत)

या आजारासाठी महानगरपालिकेचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने किंवा आरोग्य केंद्रे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने येथे संपर्क साधावा. या ठिकाणी वैद्यकीय तपासणी-मार्गदर्शन व आवश्यक ते औषधोपचार मोफत उपलब्ध आहेत. तसेच आपल्या कुटुंबातील व्यक्तींना व मित्रमंडळींना देखील याबाबत माहिती द्यावी. त्याचबरोबर पावसाळ्यात कोणताही ताप हा डेंग्यू, मलेरिया अथवा ‘लेप्टोस्पायरोसिस’ असू शकतो. त्यामुळे कोणत्याही तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. प्रतिबंधासाठी पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा गमबुटाचा वापर करावा. साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवून कोरडे करावेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.