Scientific Progress : वर्ष २०२३ मधील भारताची वैज्ञानिक प्रगती!

269
  • दा. कृ. सोमण

सन २०२३ हे वर्ष भारताच्या वैज्ञानिक प्रगतीच्या (Scientific Progress) दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण ठरलं. चंद्रयान-३ आणि आदित्य एल १ यांच्या नेत्रदीपक यशामुळे इस्रोतील शास्त्रज्ञांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. अन्नधान्योत्पादन, दुग्धोत्पादन, औषधनिर्मिती, लस उत्पादन इत्यादी क्षेत्रातही भारताने यावर्षी खूप महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. सुपर संगणक देण्यास अमेरिकेने नकार दिला होता, भारतीय शास्त्रज्ञांनी तो तयार केला. राॅकेटमधील क्रायोजेनिक इंजिन देण्यासही अमेरिकेने नकार दिला होता, भारताने क्रायोजेनिक इंजिन तयार केले. चंद्रयान-२ मधील चंद्रावर फिरणारी बग्गी रशिया वेळेत तयार करून देऊ शकत नव्हता. भारताने ती तयार केली. एव्हढेच नव्हे तर चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात यशस्वीपणे यान उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला, ते संपूर्ण चंद्रयान-३ भारतीय बनावटीचे होते. सन २०२३ हे वर्ष वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने खूप यशदायी ठरले.

चंद्रयान-३चे यश

२२ ॲाक्टोबर २००८ रोजी चंद्रयान -१ ची मोहीम सफल झाली. या मोहिमेतून चंद्रावर पाणी आहे, याचे पुरावे भारताने जगाला मिळवून दिले. चंद्रयान -२ ने २२ जुलै २०१९ रोजी यशस्वी उड्डाण केले. परंतू त्या मोहिमेत विक्रम लॅन्डर चंद्रावर अलगद उतरू शकला नव्हता. म्हणून यावर्षीच्या चंद्रयान-३ च्या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. १४ जुलै २०२३ रोजी चंद्रयान-३ ने सतीश धवन केंद्रावरून यशस्वी उड्डाण केले. पूर्वी चंद्रयान-२ च्या वेळी ज्या त्रूटी राहिल्या होत्या त्या यावेळी दूर करण्यात आल्या होत्या. एव्हढेच नव्हे, तर प्रत्येक गोष्ट पद्धतशीरपणे तपासण्यात आली होती. त्यामुळे प्रोप्युलशन मोड्यूल व्यवस्थितपणे चंद्रकक्षेत भ्रमण करू लागले. विक्रम लॅन्डर २३ ॲागस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात उतरणार होते, त्यावेळी केवळ भारतियांचेच नव्हे, तर संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे लागले होते. तो क्षण महत्त्वाचा होता. भारतीय शास्त्रज्ञांनी मोठे यश मिळविले. विक्रम लॅन्डर चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात सुखरूप उतरले. जगाच्या अंतराळ संशोधन इतिहासांत या यशाची नोंद झाली. चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात यान अचूकपणे उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. प्रत्येकाला आनंद झाला होता. २०२३ ने भारतीय शास्त्रज्ञांच्या शिरपेचात मानाचा तुरा लावला. चंद्रावर यान उतरविणारा भारत हा चौथा देश ठरला. परंतू चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात यान उतरविणारा भारत जगातील पहिला देश ठरला. ही महान देणगी २०२३ ने भारतियांना मिळवून दिली. ठरल्याप्रमाणे १४ दिवसांत संशोधन पूर्ण झाले.

अभूतपूर्व यश

संशोधन पूर्ण झाल्यानंतरही भारतीय शास्त्रज्ञांनी जगाला आणखी दोन प्रयोग करून दाखविले. विक्रम लॅन्डरनी चंद्र पृष्ठभागावर उडी मारून जागा बदलून दाखविली. भविष्यकाळात चंद्रावर उतरलेले यान पुन्हा आपली जागा बदलू शकेल, पुन्हा उड्डाण करू शकेल ही शक्यता भारतीय शास्त्रज्ञांनी पडताळून पाहिली. जगाला अगोदर माहीत नसलेली चाचणी घेण्यात आली. तसेच चंद्रकक्षेत भ्रमण करीत असलेले प्रोप्युलशन मोड्यूल पृथ्वीकक्षेत आणून ठेवले. या दोन्ही गोष्टी आधी जाहीर केल्या नव्हत्या. भारतीय शास्त्रज्ञांनी जगाला दाखवून दिले की ही क्षमताही आमच्यात आहे.

(हेही वाचा Ajit Pawar : मी ६० वर्षांचा झाल्यावर भूमिका घेतली, काहींनी ३८व्या वर्षी घेतली; अजित पवारांनी नाव न घेता शरद पवारांवर केली टीका)

आदित्य एल १

सन २०२३ ने आणखी एक विज्ञान क्षेत्रातील मोठे यश भारताला मिळवून दिले ते म्हणजे आदित्य एल १ ही सूर्याच्या संशोधनासाठी सुरू केलेली मोहीम! आदित्य एल १ या यानाचे २ सप्टेंबर २०२३ रोजी यशस्वी उड्डाण केले. हे यान ७ जानेवारी २०२४ रोजी पृथ्वीपासून १५ लक्ष किलोमीटर अंतरावर लॅग्रान्ज बिंदूवर पोहोचणार असून तेथून सूर्याचा अधिक अभ्यास करणार आहे. जरा विचार करा की, आपला चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. आपण आदित्य एल १ पृथ्वीपासून १५ लक्ष किलोमीटर अंतरावर इतक्या दूर पाठवला आहे. भारतीय शास्त्रज्ञांची कमाल आहे ना? त्यावरील उपकरणांनी नुकतेच सूर्याचे फोटो पृथ्वीकडे पाठवले आहेत. पृथ्वीच्या वातावरणात जो बदल होतो तो बदल सूर्यावर होणा-या बदलामुळे होतो का? सौरज्वाळांचा पृथ्वीवरील वातावरणावर काही परिणाम होतो का? सूर्याचा क्रोमोस्पिअर आणि कोरोना कसा आहे? वगैरे अनेक प्रश्नांची उत्तरे या संशोधनामुळे मिळणार आहेत. सूर्य स्वत:भोवती २४ दिवस १६ तासात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. परंतू तो वायूचा प्रचंड गोल असल्यामुळे त्याच्या परिभ्रमणाचा वेग सर्वत्र सारखा नाही. विषुववृत्तावर वेग सर्वात जास्त असून तो उत्तर दक्षिण दिशेत कमी कमी होत जातो. सूर्याच्या स्वांगभ्रमणाचा अक्षही लंबरूप नसून सुमारे ७ अंशांतून कललेला आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान सुमारे ६ हजार अंश सेल्सिअस आहे. पण काही ठिकाणी तापमान तुलनेने कमी म्हणजे ४ हजार अंश सेल्सिअस आहे. तेथील भाग काळपट दिसतो. त्याला सौरडाग म्हणतात. सर्वसाधारणपणे सौर डागांची संख्या दर ११.१ वर्षांनी जास्तीत जास्त होते. सौरडाग आणि सूर्याचे चुंबकत्व यांचेही संशोधन होणे गरजेचे आहे. सौरवाताविषयी संशोधन व्हायला हवे आहे.

भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट हा १९ एप्रिल १९७५ रोजी सोविएत युनियनच्या मदतीने अंतराळात सोडण्यात आला. त्यानंतर २ एप्रिल १९८४ रोजी भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा याने सोविएत युनियनच्या मदतीने यशस्वी अंतराळ सफर केली. त्यानंतर चंद्रयान १ (२००८), मंगळयान (२०१३), एकाच अग्निबाणाद्वारे १०४ उपग्रह (२०१७), चंद्रयान-२ (२०१९) या मोहिमा झाल्या. भारत या सर्व मोहिमा कमीतकमी खर्चात करीत आहे हे विशेष आहे. ‘स्काय इज दी लिमिट‘ म्हणतात ते अगदी खरे आहे. गगनयानाची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. प्रत्येक भारतिय नागरिक २०२३ ला धन्यवाद देत आहे. कारण अंतराळ विज्ञानात प्रगती (Scientific Progress) होत असताना हे विज्ञान आता प्रत्येक भारतीयाच्या घरात पोहोचले आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी हे यश मदत करीत आहे.<
(लेखक खगोल अभ्यासक आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.