Gokhale bridge : गोखले पूल पुनर्बांधणी; डिसेंबर उलटला आता पहिल्या टप्प्यातील कामाची डेडलाईन फेब्रुवारी २०२४

431
अंधेरी पूर्व आणि पश्चिम दिशेच्या वाहतुकीदरम्यान महत्त्वाचा दुवा असलेल्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या (Gokhale bridge)  पहिल्या टप्प्यातील काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण केले जाणार होते, पण हेच काम आता दोन महिने पुढे ढकलले गेले आहे. तांत्रिक बाबींमुळे या पुलाच्या कामांसाठी आतापर्यंत अतिरिक्त कालावधी लागला असला आहे. त्यामुळे आता पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
गोखले पुलाच्या (Gokhale bridge) कामाच्या प्रगतीबाबत सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयात  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी १७ जानेवारी २०२४ रोजी बैठक पार पडली, त्यावेळी आयुक्त डॉ. चहल यांनी निर्देश दिले. या बैठकीस आमदार अमीत साटम, अतिरिक्त  आयुक्त (प्रकल्प)  पी. वेलरासू, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल)  विवेक कल्याणकर, पश्चिम रेल्वेचे अधिकारी, प्रकल्प सल्लागार, तांत्रिक पर्यवेक्षण सल्लागार मेसर्स राईट्स लिमिटेड तसेच दोन्ही कंत्राटदार उपस्थित होते.

आकस्मिक अडचणी व त्यांचे निराकरण करण्यासाठी..

आमदार अमीत साटम यांनी पुलाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेत महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त‍ केले. विविध तांत्रिक अडचणी, क्लिष्ट समस्या व अशा प्रकारचे भव्य स्वरूपाचे काम पहिल्यांदाच होत असल्याने आकस्मिक अडचणी व त्यांचे निराकरण करण्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक कालावधी आतापर्यंत लागला आहे. असे असले तरीही आता वेगाने कामे करून फेब्रुवारी महिन्यात पुलाची एक मार्गिका सर्वसामान्य जनतेसाठी खुली करावी, अशी अपेक्षा त्यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे व्यक्त‍ केली.

भारतीय रेल्वेच्या इतिहासातील पहिलेच…

लोखंडी तुळईची (गर्डर) संपूर्ण जुळवणी २० नोव्हेंबर २०२३  रोजी पूर्ण करून, रेल्वे भागावर सरकविण्याचे काम २ डिसेंबर २०२३ रोजी पूर्ण करण्यात आले. त्यानंतर लोखंडी तुळई, उत्तर दिशेला १३ मीटर समतल पातळीवर सरकविण्यात आली. त्यानंतर पहिल्या टप्प्याच्या रस्ता रेषेमध्ये, आरसीसी आधारस्तंभावर लोखंडी तुळई स्थानापन्न करण्यासाठी ७.८ मीटर उंचीवरुन खाली आणण्याचे काम १४ जानेवारी २०२४ रोजी पूर्ण करण्यात आले. स्थापत्य अभियांत्रिकीदृष्ट्या हे काम अत्यंत आव्हानात्मक, जोखमीचे व भारतीय रेल्वेच्या इतिहासातील पहिलेच अशा स्वरुपाचे काम होते.

पुलाच्या कामाला वेग…

गोखले उड्डाणपूल (Gokhale bridge) हा भारतातील सर्वात जास्त उंचीवरून म्हणजे ७.८ मीटर उंचीवरून खाली उतरविण्यात येणारा पहिलाच पूल आहे. मुंबईत अशाप्रकारच्या इतर ठिकाणच्या कामात साधारणत: १ ते दीड मीटर उंचीवरून पूल खाली उतरविण्याची आवश्यकता असते. सदर पुलाच्या बाबतीत जागेची कमतरता, रेल्वे भूभागासाठी एक व महानगरपालिका क्षेत्रासाठी एक असे दोन विविध कंत्राटदार, दोन वेगळे तांत्रिक सल्लागार आणि पश्चिम रेल्वे  प्रशासनाकडून मिळणा-या परवानग्या आदी बाबींची जुळवाजुळव करणे गरजेचे होते.  हा सर्व समन्वय साधून पुलाच्या कामाला वेग देण्यात आला आहे.

गर्डर खाली उतरविणे हे अत्यंत जिकीरीचे आणि कसोटीचे..

रेल्वे भागात ७.८ मीटर उंचीवरून गर्डर खाली उतरविणे हे अत्यंत जिकीरीचे आणि कसोटीचे काम होते. म्हणूनच २ डिसेंबर २०२३ रोजी पुलाचे रेल्वे भागावर लॉचिंगचे काम झाल्यानंतर देखील, पश्चिम रेल्वे  प्रशासन व तांत्रिक सल्लागार यांच्याकडून सर्व चाचण्या, परिक्षण यशस्वी पार पडल्यानंतरच पूल खाली उतरविण्याचे काम ३ जानेवारी २०२४ पासून सुरू करण्यात आले.

यासाठीच लागला अतिरिक्त कालावधी..

हे सर्व केवळ अतिदक्षता आणि जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून करण्या‍त आले आहे. त्यामुळे सदर लोखंडी तुळई रेल्वे भागावर सरकविणे व निर्धारित जागेवर आणण्यासाठी ७.८ मीटरने उतरविणे ही कामे सर्व संबंधित यंत्रणांनी खूप काळजीपूर्वक, सावधानतेने व रेल्वे मालमत्ता, रेल्वे  प्रवासी यांची काळजी घेऊन केलेली आहेत. त्या‍मुळे तुळई निर्धारित कालावधीत स्थानापन्न करण्यासाठी अतिरिक्त कालावधी लागला आहे. लवकरच हे काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे या बैठकीत प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

पुलाचे काम  १ एप्रिल २०२३ पासून सुरू…

गोखले पूल (Gokhale bridge) हा ७ नोव्हेंबर २०२२ रोजी पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात आला होता. या पुलाचे काम  १ एप्रिल २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे. पूल बांधणीसाठी आवश्यक पोलादाचा तुटवडा निर्माण झालेला असताना  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे,  महानगरपालिका आयुक्त  तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी यामध्ये लक्ष घालून संबंधित पोलाद कारखान्यातून लोखंडी प्लेटस् उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यानंतर लोखंडी तुळई निर्माण करणा-या अंबाला येथील फॅब्रिकेशन कारखान्यात अतिवृष्टीमुळे पाणी भरले. त्यामुळे लोखंडी तुळई निर्माण करण्याच्या कामात सुमारे १५ – २० दिवसांचा कालावधी वाढला. तुळईचे सुटे भाग प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामस्थळी आणून जून २०२३ मध्ये तुळई जुळवणीचे काम सुरू करण्यात आले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.