Maharashtra Government : बेवारस मनोरुग्णांसाठी मनोरुग्णालय २४ तास सुरू ठेवा; आरोग्यमंत्र्यांचे आदेश

85

राज्यात विविध शहरात बेवारस मनोरुग्ण सापडण्याच्या घटनेत वाढ होत आहे. त्यांना मनोरुग्णालयात कोणत्याही क्षणी उपचारासाठी दाखल करुन घ्या, त्यासाठी राज्यातील मनोरुग्णालय २४ तास सुरू ठेवा, असे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ.  तानाजी सावंत यांनी दिले आहेत.

बेवारस मनोरुग्णांसाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात काम करणाऱ्या स्माईल प्लस सोशल फाउंडेशनने बुधवारी मंत्रालयात आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकीत स्माईल फाउंडेशनच्या निवेदनावर सविस्तर चर्चा झाली. बेवारस मनोरुग्णांना योग्यवेळी योग्य उपचार मिळावेत. अश्या रुग्णांना मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन घेण्यासाठी कोर्टाकडून आदेश प्राप्त व्हावे लागतात. त्यानंतर त्यांना मनोरुग्णालयात दाखल करुन घेतले जाते. परंतु, ही प्रक्रिया सांभाळून अश्या बेवारस मनोरुग्णांना उपचारासाठी विलंब होऊ नये याची काळजीही घ्या, असे निर्देश आरोग्यमंत्री सावंत यांनी संबंधित अधिकारी आणि डॉक्टरांना दिले. यापूर्वी दुपारी १२ वाजेपर्यंतच मनोरुग्णालयात अश्या रुग्णांना दाखल करुन घेतले जायचे. यापुढे राज्यातील सर्व मनोरुग्णालये २४ तास चालू ठेवण्याचे आदेश आरोग्यमंत्री सावंत यांनी दिले.

(हेही वाचा Burkha : मुंबईतील महाविद्यालयातही मुसलमान विद्यार्थिनींचा बुरख्यासाठी धिंगाणा)

राज्यात कुठल्याही शहरात जिथे बेवारस मनोरुग्ण सापडला तिथूनच त्याला रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मनोरुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करा, असे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले. यासोबतच येत्या १५ ऑगस्टपर्यंत अश्या बेवारस मनोरुग्णांवर उपचार करण्यासंदर्भातील नवी नियमावली तयार करुन सादर करण्याचे आदेश आरोग्यमंत्री डॉ सावंत यांनी दिले.

हेल्पलाईन सुरू करणार

बेवारस मनोरुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्यातील सर्व मनोरुग्णालय २४ तास सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय अश्या रुग्णांची माहिती मिळवून त्यांना वेळेत उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरच एक हेल्पलाईन सेवा सुरु केली जाईल.
– प्रा. डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.