Pedhambe Education Society : पेढांबे येथील शिक्षण प्रसारक संघाने घडवल्या विद्याविभूषितांच्या पिढ्या – भास्कर जाधव

127
Pedhambe Education Society : पेढांबे येथील शिक्षण प्रसारक संघाने घडवल्या विद्याविभूषितांच्या पिढ्या - भास्कर जाधव
Pedhambe Education Society : पेढांबे येथील शिक्षण प्रसारक संघाने घडवल्या विद्याविभूषितांच्या पिढ्या - भास्कर जाधव

आपली भावी पिढी अज्ञानामुळे गरिबीच्या वणव्यात होरपळू नये, या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘शिक्षण प्रसारक संघ मौजे पेढांबे’ या संस्थेने गेल्या ७५ वर्षांत विद्याविभूषितांच्या पिढ्या घडवल्या आहेत. ही संस्था उत्तरोत्तर यशाची शिखरे गाठत राहो, असे गौरवोद्गार शिवसेना (उबाठा) नेते तथा गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी काढले. ‘शिक्षण प्रसारक संघ मौजे पेढांबे, मुंबई’ या संस्थेचा अमृत महोत्सव सोहळा सोमवारी, २ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भास्कर जाधव बोलत होते. यावेळी चिपळूण मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, विधानपरिषदेचे आमदार सुनील शिंदे, माजी आमदार रमेश कदम, प्रताप शिंदे, शशिकांत शिंदे, इंद्रसेन चव्हाण, सार्थकी शिंदे, राजेंद्र कदम आदी व्यासपीठावर उपस्थित होते. (Pedhambe Education Society)

भास्कर जाधव म्हणाले, १९४६ ते १९४९ काळात या संस्थेने शासनाकडून कोणतेही अनुदान अथवा मदत न घेता, गावातील मुलांना पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण मिळावे म्हणून श्रमदान व निधी उभारून शाळेची पहिली इमारत पूर्ण केली. आपली भावी पिढी अज्ञानामुळे गरिबीच्या वणव्यात होरपळू नये, हा यामागील हेतू होता. म्हणजे तुमच्या पूर्वजांनी तुमच्या भविष्याचा वेध ७५ वर्षांपूर्वी घेतला होता. शिकून काय करायचे, शेवटी गुरेच राखावी लागणार, असा विचार ज्या काळात रुढ होता, त्याकाळात तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला शिक्षणाचा रोडमॅप आखून दिला. आज त्याची फळे दसपटीमधील प्रत्येक व्यक्ती चाखत आहे. आज या शिक्षण संस्थेची ७५ वर्षे पूर्ण झाली असताना, कालागणिक आव्हानेही बदलू लागली आहेत. त्यामुळे बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी काळाची गरज ओळखून संस्थेच्या नव्या पिढीने पावले टाकावीत, असे आवाहन त्यांनी केले. (Pedhambe Education Society)

यावेळी संस्थेच्या अमृतमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या स्मरणिकेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुभेच्छा संदेश पाठवले आहेत. त्याचप्रमाणे राजरत्न जनरल नानासाहेब शिंदे यांच्या पुनर्मुद्रित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. दसपटीमधील गुणीजनांचा सन्मान सोहळा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला. (Pedhambe Education Society)

माझ्यावर शिक्षण प्रसारक संघाचे संस्कार – सुनील शिंदे

‘मी आज आमदार म्हणून तुमच्यासमोर वावरत असलो, तरी माझ्यावर शिक्षण प्रसारक संघ मौजे पेढांबे या संस्थेचे संस्कार आहेत. या संघाच्या अनेक बैठका माझ्या घरी, दहा बाय दहाच्या खोलीत झाल्या. रात्री बारा-एक वाजेपर्यंत बैठका चालायच्या. त्यामुळे शेजारच्या लोकांनाही माहित झाले होते, याच्या गावची मिटिंग असली, की ती रात्रभर चालणार. या बैठकांमधून अनेक चर्चा-युक्तिवाद व्हायचे, त्यातून चांगले निर्णय व्हायचे. त्याचा संपूर्ण गावाला फायदा झाला. इथली चर्चासत्रे ऐकून आमच्यातले नेतृत्त्वगुण पुढे आले’, अशी आठवण शिवसेना (उबाठा) आमदार सुनील शिंदे यांनी सांगितली. (Pedhambe Education Society)

एखादी संस्था ७५ वर्षे टिकवणे खूप कठीण – शेखर निकम

‘७५ वर्षे एखादी संस्था जगवणे, वाढवणे आणि टिकवणे खूप कठीण असते. त्यामुळे अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या ‘शिक्षण प्रसारक संघ मौजे पेढांबे’ या संस्थेच्या पदाधिकारी आणि सभासदांचे विशेष अभिनंदन. येथे उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे सहकारी भास्कर जाधव यांच्या जीवनात आतापर्यंत अनेकवेळा संघर्षाचा काळ आला आहे. पुढेही येत राहील, हे मला माहिती आहे. पण संघर्षाच्या काळात त्यांनी अनेक संस्था जगवण्यासाठी हातभार लावला. राजकीय शत्रूत्व मनात धरून त्यांनी कोणत्याही संस्थेच्या विरोधात काम केले नाही. त्यामुळे पुढे त्यांचे चांगले दिवस येतील. त्यांचे नाही आले तर माझे तरी येतील. त्यामुळे आम्ही दोघे मिळून विकासकामे करीत राहू’, अशी कोपरखळी आमदार शेखर निकम यांनी यावेळी काढली. (Pedhambe Education Society)

(हेही वाचा – Nanded : धक्कादायक ! एकाच दिवसात २४ रुग्णांचा मृत्यू , १२ बालकांचा समावेश)

संस्थेविषयी थोडक्यात…
  • चिपळूण तालुक्यातील पेढांबे गावचा शैक्षणिक व सामाजिक विकास साधावा म्हणून मुंबईस्थित ग्रामस्थांनी १ जानेवारी १९४६ रोजी ‘शिक्षण प्रसारक संघ मौजे पेढांबे, मुंबई’ या नावाने संघटनारुपी रोपटे लावले. आज त्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. स्थापनेपासून ही संस्था गावच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी प्रयत्नशील राहिली आहे.
  • सन १९४९ मध्ये संस्थेने पेढांबे गावी सातवीपर्यंतची शाळा सुरु केली. गावामध्ये शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणोपयोगी वस्तू पुरवणे, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणे, आरोग्य शिबीर भरवणे, बालवाडी, ग्रामपंचायतीची स्थापना, फुटब्रीज, विजपुरवठा, पोष्ट ऑफीस, एस.टी. बससेवा, गावात नळपाणी पुरवठा योजना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, वाचनालय, शिधावाटप दुकान, ग्रामदेवतेच्या मंदिराचा जीर्णोद्धार इत्यादी विकास कामे पूर्ण करण्यात संस्थेचा सिंहाचा वाटा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.