Mhada : म्हाडाने अडवली विक्रोळीतील ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या बांधकामाची एनओसी

अतिरिक्त एफएसआय आणि इतर शुल्कापोटी १३.१३ कोटी रुपयांची रक्कम म्हाडाने महापालिकेला भरण्यास सांगितली आहे.

227

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने विक्रोळी कन्नमवार नगर येथे क्रांतिवीर ज्योतिबा फुले रुग्णालयाचा पुनर्विकास महापालिकेच्यावतीने सुरु असून या रुग्णालयाच्या बांधकामात अतिरिक्त एफएसआय आणि इतर शुल्क न भरल्याने या रुग्णालयाच्या बांधकामाची एनओसी म्हाडाने रखडवली आहे. अतिरिक्त एफएसआय आणि इतर शुल्कापोटी १३.१३ कोटी रुपयांची रक्कम म्हाडाने महापालिकेला भरण्यास सांगितली आहे. म्हाडाला ही रक्कम न भरल्याने बांधकामाची एनओसी महापालिकेला प्राप्त झालेली नाही. परिणामी या बांधकामाचे काम रखडले आहे.

क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले या रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले असून या रुग्णालयातील सेवा विक्रोळी पूर्व येथील टागोर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रसुतीगृहात हलवण्यात आल्या आहेत. या रुग्णालयाचा पुनर्विकास करून अत्याधुनिक सोयीसुविधा युक्त रुग्णालय सुरु करण्यास तसेच प्रकल्पांतर्गत रुग्णालयातील खाटांची क्षमता जी १४० केली जाणार होती, ती रुग्ण खाटांची संख्या ५०० पर्यंत वाढण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले होते. त्यामुळे या रुग्णालयाच्या बांधकाम करण्यासाठी म्हाडाच्या ताब्यातील या रुग्णालयाच्या अंशत भूखंडाचा आगावू ताबा महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आला होता.

(हेही वाचा Aurangzeb : एमआयएमचे पुन्हा उफाळून आले औरंग्यावरील प्रेम; शहराध्यक्ष फोटो घेऊन नाचला )

त्यानुसार महापालिकेच्या वास्तूविशारदांनी या रुग्णालयाचे नकाशे नियोजन प्राधिकरण म्हणून म्हाडा प्राधिकरणाकडे मंजुरीला सादर केले होते. त्यावर म्हाडाने असे म्हटले आहे की, रुग्णालयाचे अतिरिक्त चटई क्षेत्र (एफएसआय) व इतर शुल्क म्हणून १३ कोटी २३ लाख ३४ हजार रुपयांची रकमेची भरणा केल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र तथा दाखला मुंबई महापालिकेला कळवले आहे. त्यामुळे ही रक्कम उपलब्ध नसल्याने म्हाडाला भरण्यात आली नसून परिणामी या रुग्णालयाचे बांधकाम रखडले असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार या रुग्णालयाचे बांधकाम सुरु असताना म्हाडाने ही शुल्क न भरल्याने याची एनओसी देण्यास टाळाटाळ करत असून दुसरीकडे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता कराची थकबाकी ठेवली जात आहे. महापालिकेच्यावतीने याठिकाणी रुग्णालय उभारले जात असून त्यासाठीचेही शुल्क भरल्याशिवाय एनओसी देण्यास म्हाडाकडून टाळाटाळ केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.