Mumbai Water Reservoir : मुंबईला १८ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा, पण…

मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा आवश्यक असतो.

277
Mumbai Water Reservoir : मुंबईला १८ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा, पण...

मुंबईला पाणीपुरवठा (Mumbai Water Reservoir) करणाऱ्या सात तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी जमा झालेला पाणीसाठा मागील दोन वर्षांच्या तुलनेत कमी होता. परंतु आता ६ जून रोजी पाण्याचा एकूण साठा केवळ ११.४२ टक्केच शिल्लक राहिला असून हा पाणी साठा येत्या १८ जुलै २०२३ पर्यंत पुरेल इतकाच असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असले तरी अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने मुंबईला अधिकचा पाणी साठा मिळेल की महापालिकेला भविष्यातील पाणी पुरवठ्याची व्यवस्था म्हणून कपात जाहीर करावी लागेल,याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मुंबईला पाणी पुरवठा (Mumbai Water Reservoir) करणाऱ्या मोडकसागर, तानसा, तुळशी, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा या तलावांमध्ये १ ऑक्टोबर २०२२ रोजी एकूण पाण्याची पातळी ही ९८.५७ टक्के एवढी नोंदवली गेली होती. मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा आवश्यक असतो. त्यातुलनेत यासर्व तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख २६ हजार ६६५ दशलक्ष लिटर एवढा पाण्याचा साठा जमा झाला होता. हा साठा पुढील ३८० दिवस पुरेल इतका असला तरी मागील दोन वर्षांच्या तुलनेत हा एकूण साठा कमी नोंदवला गेला होता.

(हेही वाचा – Thane : ठाण्यात हत्यारांचा साठा जप्त; १७ पिस्तुलांसह मोठ्या प्रमाणात काडतुसे हस्तगत; दोघांना अटक)

परंतु ६ जुन रोजी सर्व धरणांमध्ये १ लाख ६५ हजार २३४ दशलक्ष लिटर अर्थात १६ हजार ५२३ कोटी लिटर एवढा पाणी साठा (Mumbai Water Reservoir) उपलब्ध आहे. हा पाणी साठा एकूण पाणी साठ्याच्या ११.४२ टक्के एवढा आहे. तर सन २०२२ व २०२१ या वर्षात जून रोजी अनुक्रमे १५.४५ व १३.२२ टक्के एवढा होता.

मागील वर्षी २० जून २०२२ पर्यंत यासर्व धरणांमध्ये एकूण १५ हजार १२३कोटी लिटर एवढा पाण्याचा साठा (Mumbai Water Reservoir) शिल्लक होता. अर्थात एकूण पाणी साठ्याच्या १० टक्के. त्यावर्षी मागील दोन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक कमी असलेला हा पाणी साठा होता. परंतु यंदा ६ जुनलाच ११.४२ टक्के असल्याने मागील वर्षांप्रमाणेच पाणी साठा असल्याचे दिसून येते. २०२१ मध्ये या २० जून पर्यंत १४ टक्के तर २०२० मध्ये ११ टक्के एवढा पाणी साठा होता. त्यामुळे सद्या ४२ दिवस एवढाच पुरेल इतका पाणी साठा असून नाशिक परिसरात या महिन्यात मुसळधार पाऊस पडल्यास आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे प्रमाण वाढल्यास कपातीची गरज राहणार नाही. त्यातच शासनाने अधिकचा पाणी साठा दिल्यास मुंबईकरांची चिंता दूर होणार आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबईला अधिकचा पाणी साठा देण्याची तयारी सरकारने दाखवली असल्याची माहिती खुद्द आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अधिकचा साठा मिळाल्यास मुंबईचे टेन्शन जाईल आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाणी साठा ९ टक्क्यांच्या खाली आला तरी कपातीशिवाय मुंबईकरांना पाणी पुरवठा करू शकतो असे काही निवृत्त जल अभियंता यांचे म्हणणे आहे.

६ जुन रोजीचा पाणी साठा (Mumbai Water Reservoir)

वर्ष २०२३ : १,६५,२३४ दशलक्ष लिटर(११.४२ टक्के)

वर्ष २०२२ : २,२३,५५६दशलक्ष लिटर(१५.४५ टक्के)

वर्ष २०२१ : १,१९,३५९ दशलक्ष लिटर(१३.२२ टक्के)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.