
गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पावसाची मुंबईकर (Mumbai Rain) अत्यंत मनापासून वाट पाहत होते, त्या पावसाचे अखेर मुंबईत आगमन झाले आहे. सोमवारी सकाळपासून मुंबईत विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. पावसाने अद्याप पुरेसा जोर धरला नसला तरी दक्षिण मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाच्या सरी बरसत आहेत. तसेच ढगांचा गडगडाट सुरु झाल्याने पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. (Mumbai Rain)
एरवी मुंबईत 7 ते 8 जूनच्या आसपास पावसाचे आगमन होते. मात्र, यंदा 20 जून उलटून गेला तरी मुंबईत पावसाचा पत्ता नव्हता. त्यामुळे मुंबईकर उकाड्याने प्रचंड हैराण झाले होते. तसेच शहरावर पाणीकपातीची वेळ ओढावली होती. त्यामुळे पाऊस कधी येणार, याची मुंबईकर प्रतीक्षा करत आहेत. रविवारी सकाळी मुंबई आणि ठाण्यात पावसाच्या तुरळक सरी बरसून गेल्या होत्या. मात्र, नंतर संपूर्ण दिवस कोरडा गेला होता. मात्र, सोमवारी सकाळपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर जास्त आहे. (Mumbai Rain)
दादरसह, पूर्व आणि पश्चिम उपनगरातदेखील पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. हा मान्सूनपूर्व पाऊस असण्याची शक्यता आहे. कारण, हवामान खात्याने अद्याप मुंबई आणि ठाण्यात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. एल निनोचा प्रभाव, कोरडी हवा आणि कमी दाबाच्या क्षेत्रांचा अभाव या सर्व घटकांच्या एकत्र येण्यामुळे मान्सूनची वाटचाल संथ झाली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात 24 ते 28 जून या कालावधीत हवामान प्रणाली हळूहळू उत्तर किनारपट्टी आणि राज्यांच्या अंतर्गत भागांकडे सरकणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. (Mumbai Rain)
Join Our WhatsApp Community
