Mumbai-Pune Highway: जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचे रुंदीकरणाचे काम वेगात सुरू

रस्त्यावर बीआरटी न करता रस्त्याच्या दोन्ही बाजूने पीएमपी बससाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे.

161
Mumbai-Pune Highway: जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचे रुंदीकरणाचे काम वेगात सुरू
Mumbai-Pune Highway: जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचे रुंदीकरणाचे काम वेगात सुरू

जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचे (Mumbai-Pune Highway) रुंदीकरणाचे काम वेगात सुरू असताना त्याच्या मध्यभागातून बीआरटी मार्ग प्रस्तावित आहे, मात्र या रस्त्यावर बीआरटी न करता रस्त्याच्या दोन्ही बाजूने पीएमपी बससाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे. त्यामुळे पीएमपीच्या प्रवाशांना रस्ता ओलांडून बस पकडण्याची गरज पडणार नाही, असे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला जोडण्यासाठी जुना मुंबई-पुणे महामार्ग हा महत्त्वाचा रस्ता आहे. पुण्याच्या हद्दीत लष्कराकडून खडकीतील २.१ किलोमीटर लांबीच्या रस्ता आहे. तेथे लष्कराकडून जागा ताब्यात मिळत नसल्याने ८ वर्षांपासून अंडी उबवणी केंद्रापासून ते संत तुकाराम महाराज पुलापर्यंत (हॅरिस ब्रीज) रस्त्याचे रुंदीकरणाचे काम रखडले होते.

भूसंपादनासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन व लष्कर यांच्यात चर्चा झाल्यानंतर ही जागा महापालिकेच्या ताब्यात आली. त्याबदल्यात विभागीय आयुक्त कार्यालयाकडून लष्कराला येरवड्यातील १०. ५८ एकर जागा दिली आहे. लष्कराची जागा ताब्यात आल्यानंतर गेल्यावर्षीपासून हा रस्ता ४२ मिटर रुंद करण्याचे काम सुरु झाले असून, आत्तापर्यंत ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.

(हेही वाचा – Flipkart Cost Cutting: फ्लिपकार्टकडून कर्मचाऱ्यांची कपात, १५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची शक्यता )

रस्त्याच्या दोन्ही बाजूने बससाठी स्वतंत्र मार्ग
जुन्या मुंबई पुणे महामार्गावर सीओईपी ते निगडी बीआरटी प्रस्तावित आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील बीआरटी मार्गाचे काम पूर्ण झाले असून, तेथे या सेवेचा वापरही सुरू आहे, पण पुणे महापालिकेच्या हद्दीत जागा ताब्यात नसल्याने बीआरटी सेवा सुरू होऊ शकली नव्हती. रस्ता रुंदीकरणानंतर बीआरटी सेवा सुरू केली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. पण आता हा निर्णय रद्द करून रस्त्याच्या दोन्ही बाजूने बससाठी स्वतंत्र मार्ग असेल.

रस्त्याची रचना
४२ मीटर रुंद असून, त्यामध्ये अडीच मीटरचा दोन्ही बाजूने पादचारी मार्ग असणार आहे. त्यानंतर दोन्ही बाजूने साडे तीन मीटरचा बससाठी मार्ग असेल. त्यांनतर छोटे दुभाजक लावले जाणार आहेत. त्यानंतर सव्वा तीन मीटरच्या चार लेन या दुचाकी, चारचाकी यासह इतर वाहनांसाठी असणार आहेत.

रस्त्याच्या दोन्ही बाजूने कडेला स्वतंत्र मार्गिका
‘जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी बीआरटी मार्गाची रचना न करता रस्त्याच्या दोन्ही बाजूने कडेला स्वतंत्र मार्गिका असणार आहे. मुख्य रस्ता आणि पीएमपीचा रस्ता वेगळा असण्यासाठी छोटा दुभाजकही त्यात टाकला जाईल. रस्त्याच्या कडेला बसथांबा असल्याने प्रवाशांना बस पकडणे सोईचे होईल.’, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.