Shri Ganesh Murti आगमन–विसर्जन मार्गांवरील खड्डे आठवडा भरात बुजवा!

महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचे निर्देश.

166
Shri Ganesh Murti आगमन–विसर्जन मार्गांवरील खड्डे आठवडा भरात बुजवा!
Shri Ganesh Murti आगमन–विसर्जन मार्गांवरील खड्डे आठवडा भरात बुजवा!

यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान श्री गणेश मूर्तींचे आगमन आणि विसर्जन सुरळीत पद्धतीने व्हावे, यासाठी आगमन आणि विसर्जन मार्गांचा आढावा घ्यावा. त्या मार्गावर खड्डे आढळून आल्यास एका आठवड्याच्या आत खड्डे बुजविण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. यंदा १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीदरम्यान श्री गणेशोत्सव साजरा होणार आहे.

श्री गणेशोत्सव आनंदात आणि सुरळीतपणे पार पडावा, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये श्री गणेशमूर्तींचे आगमन तसेच विसर्जन मार्गाची पाहणी करून आवश्यक असेल तिथे डागडुजी करणे, गणेशोत्सवादरम्यान विविध गणेश मंडळांच्या परिसरात अधिकाधिक स्वच्छता राखणे, विसर्जनाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था राखणे, गणेशोत्सव मंडळांना आवश्यक परवानग्या देणे तसेच अन्य सोयीसुविधांचा समावेश आहे.

याच पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मध्यवर्ती यंत्रणांसह परिमंडळीय सहआयुक्त, उप आयुक्त, २४ विभागांचे सहायक आयुक्त तसेच संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत. त्यात गणेशोत्सवाशी निगडित सर्व कामे योग्यरित्या व वेळेवर पूर्ण करण्याच्या, तसेच रस्त्यांची नियमितपणे पाहणी करून खड्डे आढळून आल्यास ते त्वरित भरण्याच्या निर्देशांचा समावेश आहे.

(हेही वाचा – Shaktipeeth Expressway : महाराष्ट्रातील शक्तिपीठे आणि तीर्थक्षेत्रे जोडणारा शक्तीपीठ महामार्ग कसा असेल, वाचा…)

पावसामुळे मुंबई महानगरातील रस्त्यांवर काही ठिकाणी उद्भवलेले खड्डे बुजवण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. असे असले तरी, गणेशोत्सवाच्या कालावधीत श्री गणेशाचे आगमन, तसेच विसर्जनादरम्यान कोणत्याही रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होणार नाही, हे सुनिश्चित करावे. त्यासाठी २४ विभागातील परिमंडळ उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागीय कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता, मुख्य अभियंता (रस्ते), उपायुक्त (सुविधा) यांनी विविध मार्गांची पाहणी करून त्या मार्गावर खड्डे असल्यास ते बुजविण्याची मोहीम हाती घ्यावी. पुढील एका आठवड्यात ही कार्यवाही करत या मार्गांवर खड्डे राहणार नाहीत हे निश्चित करावे, असेही निर्देश इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा संपूर्ण अहवाल उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले हे नियमितपणे घेतील आणि सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे यांना सादर करतील. खड्डेमुक्त रस्त्यांचे उदिदष्ट साध्य करत असताना काही समस्या किंवा अडचणी उद्भवल्यास, पुढील दोन दिवसांत त्या तातडीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांना कळविणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यावर तातडीने उपाय योजना करता येईल, असेही आयुक्तांनी आदेशित केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.