मुंबईत वर्षभरात तब्बल १४ हजारांहून अधिक महिलांनी केली नसबंदी

188
मुंबईत वर्षभरात तब्बल १४ हजारांहून अधिक महिलांनी केली नसबंदी
मुंबईत वर्षभरात तब्बल १४ हजारांहून अधिक महिलांनी केली नसबंदी

सन २०२२ ते २०२३ या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये एकूण १४ हजार ५०९ अधिक नसबंदी करण्यात आल्या. त्यात १४ हजार २९ महिला आणि ४८० पुरुषांचा समावेश आहे. ३ हजार ८९५ महिलांनी अंतरा या गर्भनिरोधक इंजेक्शनसाठी निवड केली. तर, ३९ हजार ४७७ महिलांनी कॉपर-टीचा पर्याय निवडला. या कालावधीत १४ हजार ५८१ गर्भनिरोधक गोळ्यांचेही वाटप करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत पुरुष नसबंदीची संख्या व अंतरा आणि छाया या तात्पुरत्या गर्भनिरोधक पद्धतींचा अवलंब करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली आहे.

दरवर्षी ११ जुलै रोजी जगभरात लोकसंख्या दिवस आयोजित केला जातो. याच अनुषंगाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ११ जुलैपासून २४ जुलै २०२३ या कालावधीमध्ये जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त सर्व आरोग्य केंद्रांमध्ये इच्छुक दांपत्याला कुटुंब नियोजनाच्या सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांच्या देखरेखीत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

(हेही वाचा – PMRBP : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी अर्ज पाठवण्याला मुदतवाढ)

“स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात करू संकल्प, कुटुंब नियोजनास बनवू आनंदाचा विकल्प” हे यंदाच्या जागतिक लोकसंख्या दिनाचे घोषवाक्य आहे. त्यानुसार जागतिक लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक २७ जून ते १० जुलै २०२३ या कालावधीमध्ये संपूर्ण मुंबई महानगरात लोकसंख्या स्थिरीकरण पंधरवड्याचेही आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन त्या भागातील पात्र जोडप्यांना लहान कुटुंबाचे महत्व पटवून दिले. सोबतच कुटुंब नियोजन सेवा स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याकरीता यासंबंधीत विविध योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठीच्या उपाययोजना तसेच अंतरा, छाया यांच्यासारख्या गर्भनिरोधक साधनांसंदर्भातील माहितीचा समावेश होता.

११ जुलैपासून २४ जुलैपर्यंत आयोजित लोकसंख्या पंधरवड्यामध्ये महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये इच्छुक दांपत्यांना कुटुंब नियोजनाच्या सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत. यासाठी ठिकठिकाणी कुटुंब नियोजन शिबिरे, नसबंदी शिबिरे आदींचेही आयोजन केले जाणार आहे. याशिवाय, नागरिकांमध्ये कुटुंब नियोजनासंदर्भात जनजागृती व्हावी, यासाठी पोस्टर तसेच बॅनर्सचेही वितरण करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.