Mann Ki Baat : ‘मन कि बात’मध्ये पंतप्रधानांनी सांगितले मानसिक आरोग्याचे महत्त्व

156
Mann Ki Baat : 'मन कि बात'मध्ये पंतप्रधानांनी सांगितले मानसिक आरोग्याचे महत्त्व
Mann Ki Baat : 'मन कि बात'मध्ये पंतप्रधानांनी सांगितले मानसिक आरोग्याचे महत्त्व

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत असलेल्या ‘मन कि बात’चा (Mann Ki Baat) आज १०८ वा भाग प्रसारित झाला. या भागात पंतप्रधानांनी २०२३ मध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घडोमोडींचा मागोवा घेतला. तसेच देशवासियांना व्यायाम करून तंदुरुस्त रहाण्याचा सल्ला दिला. ही ‘मन कि बात’ येथे जशीच्या तशी देत आहोत.

(हेही वाचा – GOOGLE-DOODLE: नववर्षाच्या स्वागतासाठी गुगलने तयार केले खास ‘डूडल’; आकर्षक रंगसंगती, वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे)

नमस्कार, माझ्या प्रिय देशवासियांनो. ‘मन की बात’ म्हणजे तुम्हा सगळ्यांना भेटण्याची एक शुभ संधीच आणि जेव्हा आपण आपल्या कुटुंबियांना भेटतो, तो क्षण खूपच आनंददायी आणि समाधानकारक असतो. ‘मन की बात’ (Mann Ki Baat) च्या माध्यमातून मी जेव्हा तुम्हाला भेटतो, तेव्हा मलादेखील हाच अनुभव येतो आणि आज आपल्या एकत्रित प्रवासाचा हा 108 वा भाग आहे. आपल्याकडे 108 या अंकाचे महत्त्व, त्याचे पावित्र्य हा एक सखोल अध्ययनाचा विषय आहे.

‘मन की बात’चा 108 वा भाग

जपमाळेतील 108 मणी, 108 वेळा होणारा जप, 108 दिव्य क्षेत्र, मंदिरांच्या 108 पायऱ्या, 108 घंटा, 108 हा आकडा अपार श्रद्धेशी निगडित आहे. ‘मन की बात’ चा हा 108 वा भाग माझ्यासाठी अजूनच खास झाला आहे. या 108 भागांमध्ये आपण लोकसहभागाची अनेक उदाहरणे पहिली आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. आता या टप्प्यावर पोहोचल्यानंतर, आपल्याला नवीन जोमाने, नवीन ऊर्जेसह आणि अधिक वेगाने आगेकूच करण्याचा संकल्प केला पाहिजे. उद्याचा सूर्योदय हा 2024 चा पहिला सूर्योदय असणार आहे, हा किती सुखद योगायोग आहे; आपण 2024 मध्ये प्रवेश केला असेल. तुम्हा सर्वांना 2024 च्या हार्दिक शुभेच्छा.

‘व्होकल फॉर लोकल’ मंत्राने दिवाळीत विक्रमी व्यवसाय

मित्रांनो, ‘मन की बात’ ऐकणाऱ्या अनेक श्रोत्यांनी मला पत्राद्वारे त्यांचे अविस्मरणीय क्षण लिहून पाठविले आहेत. आपल्या देशाने यावर्षी अनेक विशेष कामगिरी पार पाडल्या आहेत, ही या 140 कोटी लोकांची ताकदच आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणारा ‘नारी शक्ती वंदन कायदा’ यावर्षी मंजूर झाला. भारत सर्वात मोठी 5 वी अर्थव्यवस्था झाल्याबद्दल अनेकांनी पत्र लिहून आपला आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी मला G20 परिषदेच्या यशाची देखील आठवण करून दिली आहे. मित्रांनो, आज भारतातील प्रत्येक कानाकोपरा आत्मविश्वासाने भरलेला आहे, विकसित भारताच्या भावनेने, आत्मनिर्भरतेच्या भावनेने भारावलेला आहे. वर्ष 2024 मध्ये देखील आपल्याला हीच भावना आणि चालना कायम ठेवायची आहे. प्रत्येक भारतीय हा ‘व्होकल फॉर लोकल’ (Vocal for Local) या मंत्राला महत्व देत आहे हे दिवाळीतील विक्रमी व्यवसायाने सिद्ध केले आहे.

(हेही वाचा – Ram Mandir: 600 किलोमीटर दंडावत यात्रेतून 3 भाविक अयोध्येत दाखल, रोमांचकारी प्रवास वर्णन वाचून आश्चर्यचकित व्हाल !)

मित्रांनो,आजही मला अनेक लोकं चांद्रयान 3 च्या यशाबद्दल संदेश पाठवत आहेत. मला विश्वास आहे की, माझ्याप्रमाणेच तुम्हाला देखील आपल्या शास्त्रज्ञांचा आणि विशेषतः महिला शास्त्रज्ञांचा विशेष अभिमान वाटत असेल.

चित्रपट आणि क्रीडा क्षेत्राचे यश

मित्रांनो, जेव्हा नाटु-नाटु ला ऑस्कर मिळाला, तेव्हा संपूर्ण देश आनंदाने नाचत होता. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ला मिळालेल्या सन्मानाबद्दल ऐकून कोणाला बरं आनंद झाला नाही ? या सगळ्यातून जगाने भारताची सर्जनशीलता पाहिली आणि पर्यावरणा बाबत असणारा आपला जिव्हाळा समजून घेतला. या वर्षी आमच्या खेळाडूंनीही चमकदार कामगिरी केली. आशियाई खेळांमध्ये आमच्या खेळाडूंनी 107 पदके आणि आशियाई पॅरा गेम्समध्ये 111 पदके जिंकली. क्रिकेट विश्वचषकातील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली. अंडर-19 T-20 विश्वचषक स्पर्धेत आपल्या महिला क्रिकेट संघाचा विजय खूपच प्रेरणादायी आहे. अनेक खेळांमधील खेळाडूंच्या कामगिरीने देशाचे नाव उंचावलं आहे. आणि आता 2024 मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी संपूर्ण देश आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे.

मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण एकत्रित प्रयत्न केले, तेव्हा त्याचा आपल्या देशाच्या विकासच्या वाटचालीवर खूपच सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि ‘मेरी माटी मेरा देश’ या मोहिमा आपण यशस्वी होताना पाहिल्या आहेत. यामध्ये करोडो लोकांच्या सहभागाचे आपण सर्वच साक्षीदार आहोत. 70 हजार अमृत तलावांचे निर्माण हे देखील आमचे सामूहिक यश आहे.

(हेही वाचा – Israel-Hamas Conflict: इस्रायल हमासमधील ओलिस ठेवलेल्या ५० नागरिकांची सुटका करणार, कॅबिनेट वॉर मिटिंगमध्ये निर्णय)

ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये 40 वा क्रमांक

मित्रांनो, जो देश नाविन्याला महत्त्व देत नाही, त्याचा विकास थांबतो, यावर माझा विश्वास आहे. भारताचे इनोव्हेशन हब हे याचेच प्रतीक आहे की, आपण आता कधीच थांबणार नाही. 2015 मध्ये आम्ही ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये (Global Innovation Index) 81 व्या क्रमांकावर होतो, आज आमचा क्रमांक 40 आहे. या वर्षी, भारतात दाखल केलेल्या पेटंटची संख्या जास्त आहे, त्यापैकी सुमारे 60 टक्के हे देशांतर्गत निधीतून उभे राहिले होते. या वेळी QS आशिया विद्यापीठ क्रमवारीत सर्वाधिक भारतीय विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे. या यशांची यादी ही न संपणारी आहे. भारताची क्षमता किती प्रभावशाली आहे ही याची केवळ एक झलक आहे – देशाच्या या यशातून, देशातील जनतेच्या या कामगिरीपासून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे, त्यांचा अभिमान बाळगायचा आहे, नवे संकल्प करायचे आहेत. पुन्हा एकदा, मी तुम्हा सर्वांना वर्ष 2024 च्या खूप खूप शुभेच्छा देतो.

2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे झाले

माझ्या कुटुंबियांनो, आता आपण भारताबद्दल सर्वत्र असलेल्या आशा आणि उत्साहाविषयी चर्चा केली – ही आशा आणि अपेक्षा खूप चांगली आहे. भारताच्या विकासाचा सर्वाधिक फायदा तरुणांनाच होणार आहे; पण देशातील तरुण जेव्हा सुदृढ असतील, तेव्हाच याचा अधिक फायदा तरुणांना होईल. आज काल जीवनशैलीशी निगडित आजारांबद्दल चर्चा होतांना आपण अनेकदा पाहिले आहे. ही आपल्या सर्वांसाठी, विशेषतः तरुणांसाठी चिंतेची बाब आहे. या ‘मन की बात’साठी मी तुम्हा सर्वांना ‘फिट इंडिया’शी संबंधित अभिप्राय पाठवण्याची विनंती केली होती. तुम्ही दिलेल्या प्रतिसादाने माझ्यात उत्साह संचारला आहे. नमो अॅपवर मला मोठ्या संख्येने स्टार्टअप्सनीही त्यांच्या सूचना पाठवल्या आहेत, त्यांनी त्यांच्या अनेक अनोख्या प्रयत्नांची चर्चा केली आहे.

(हेही वाचा – ISRO: नवीन वर्षात इस्रो करणार ‘कृष्णविवरां’चा अभ्यास, ‘PSLV-C58’ध्रृवीय उपग्रहाचे सोमवारी प्रक्षेपण)

मित्रांनो, भारताच्या प्रयत्नांमुळे 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (International Year of Millets) म्हणून साजरे करण्यात आले. यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्सना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत, यामध्ये लखनऊ मध्ये सुरू झालेल्या ‘किरोज फूड्स’, प्रयागराजच्या ‘ग्रँड-मा मिलेट्स’ आणि ‘न्यूट्रास्युटिकल रिच ऑरगॅनिक इंडिया’ सारख्या अनेक स्टार्टअप्सचा समावेश आहे. ‘अल्पिनो हेल्थ फूड्स’, ‘आर्बोरियल’ आणि ‘किरोस फूड’ शी निगडीत तरुण आरोग्यदायी आहाराच्या पर्यायांबाबत नवनवीन पर्यायांचा विचार करत आहेत. बंगळूरूच्या अनबॉक्स हेल्थशी संबंधित तरुणांनी देखील सांगितले आहे की, ते लोकांना त्यांचा आवडता आहार निवडण्यात कशा प्रकारे मदत करत आहेत ते सांगितलं आहे. शारीरिक आरोग्याची आवड जसजशी वाढत आहे, तसतशी या क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षकांची मागणीही वाढत आहे. “जोगो तंत्रज्ञान” सारखे स्टार्टअप ही मागणी पूर्ण करण्यात मदत करत आहेत.

मानसिक आरोग्याविषयी चर्चा

मित्रांनो, आज शारीरिक आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबत खूप चर्चा होत आहे, परंतु त्याच्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे मानसिक आरोग्य (mental health). मुंबईतील “Infi-heal” आणि “YourDost” सारखे स्टार्टअप्स मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काम करत आहेत, हे कळल्यावर मला अतिशय आनंद झाला. एवढेच नाही, तर आज यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचाही वापर होत आहे. मित्रांनो, मी येथे फक्त काहीच स्टार्टअप्सची नावे घेऊ शकतो, कारण यादी खूप मोठी आहे. फिट इंडियाचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने नाविन्यपूर्ण आरोग्यसेवा प्रदान करणाऱ्या स्टार्टअप्सबद्दल मला कळवत राहा, अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी बोलणार्‍या सुप्रसिद्ध लोकांचे अनुभवही मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत.

(हेही वाचा – आता युपीआय पेमेंट होणार अधिक सोपे)

हा पहिला संदेश सद्गुरु जग्गी वासुदेवजींचा आहे. ते सुदृढता, विशेषत: मानसिक सुदृढता, म्हणजेच मानसिक आरोग्याबाबत त्यांचे मत मांडतील.

या मन की बात मध्ये मानसिक आरोग्याविषयी चर्चा करणे हे आमच्यासाठी सौभाग्याचे आहे. मानसिक आजार आणि आपली न्यूरोलॉजिकल प्रणाली कशी कार्यरत आहे याचा थेट संबंध आहे. आपली न्यूरोलॉजिकल प्रणाली किती स्थिर आणि अडथळा मुक्त आहे यावर आपण किती आनंददायी असू हे अवलंबून आहे. ज्याला आपण शांतता, प्रेम, आनंद, हर्ष, वेदना, नैराश्य, परमानंद म्हणतो या सर्वांचा रासायनिक आणि न्यूरोलॉजिकल आधार असतो.औषधशास्त्र मूलत: शरीरात बाहेरील रसायनांच्या सहाय्याने शरीरातील रासायनिक असंतुलन दूर करण्याचा प्रयत्न करते. मानसिक आजारावर अशा प्रकारे उपचार केले जातात परंतु एखादी व्यक्ती जेव्हा अत्यंत गंभीर परिस्थिती मध्ये असते केवळ तेव्हाच औषधांच्या स्वरूपात बाहेरून रसायने घेतली पाहिजेत ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. अंतर्गत मानसिक आरोग्यावर उपचार करताना किंवा समतुल्य रसायनशास्त्रासाठी कार्य करत असताना शांतता, आनंद आणि हर्षाचे हे रसायन प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सामाजिक जीवन आणि जगभरातील देशांच्या संस्कृतींच्या आणि मानवतेच्या माध्यमाने आले पाहिजे. आपण आपले मानसिक आरोग्य समजून घेणे खूप महत्वाचे आहे, आपला विवेक हा एक नाजूक विशेषाधिकार आहे- आपण त्याचे संरक्षण केले पाहिजे, त्याचे पालनपोषण केले पाहिजे. यासाठी, योगिक प्रणालीमध्ये अनेक प्रकार आहेत, लोकं साध्या योग प्रकारांचा अवलंब करून त्यांचे आंतरिक आरोग्य तसेच शरीरारातील रासायनिक प्रक्रिया योग्य दिशेने करू शकतात; आणि यामुळे त्यांच्या न्यूरोलॉजिकल प्रणाली मध्ये सुधारणा होईल. आंतरिक आरोग्य सुदृढ राखण्याच्या या तंत्रज्ञानाला आपण योगिक विज्ञान म्हणतो त्याचा आपण प्रत्यक्ष जीवनात अवलंब करूया.
सद्गुरुजी त्यांचे विचार अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

(हेही वाचा – आता युपीआय पेमेंट होणार अधिक सोपे)

क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर यांनी मांडले त्यांचे विचार

चला, आता आपण प्रसिद्ध क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांचे विचार ऐकुया.

नमस्कार ‘मन की बात’च्या माध्यमातून मला माझ्या देशवासियांना काही सांगायचे आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिट इंडिया उपक्रमाने मला माझा आरोग्याचा मंत्र तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यास प्रोत्साहित केले आहे. तुम्हा सर्वांना माझी पहिली सूचना म्हणजे ‘one cannot out-train a bad diet’ याचा अर्थ असा की तुम्ही कधी खाता आणि काय खाता याची खूप काळजी घ्यावी लागेल. अलीकडेच माननीय पंतप्रधान मोदीजींनी सर्वांना आपल्या आहारात भरड धान्याचा समावेश करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शाश्वत शेतीसाठी मदत होते आणि हे धान्य पचायलाही हलके असते. नियमित व्यायाम आणि 7 तासांची झोप शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे आणि या सगळ्या बाबी शरीर सुदृढ राहण्यास मदत करते. यासाठी कठोर शिस्त आणि सातत्य आवश्यक आहे. जेव्हा तुम्हाला परिणाम मिळू लागतील, तेव्हा तुम्ही दररोज व्यायाम करायला सुरुवात कराल. मला तुम्हा सर्वांशी बोलण्याची आणि माझा आरोग्याचा मंत्र सांगण्याची संधी दिल्याबद्दल माननीय पंतप्रधानांचे खूप खूप आभार ! हरमनप्रीतजीने सारख्या प्रतिभावान खेळाडूचे शब्द तुम्हा सर्वांना नक्कीच प्रेरणा देतील.

विश्वनाथन आनंद यांनी सांगितले व्यायामाचे महत्त्व

चला, ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांचे विचार आता आपण ऐकुया. ‘बुद्धिबळ’ या खेळासाठी मानसिक स्वास्थ्य किती महत्वाचे आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.

नमस्ते, मी विश्वनाथन आनंद आहे, तुम्ही मला बुद्धिबळ खेळताना पाहिले आहे आणि अनेकदा मला विचारले जाते, तुमची फिटनेस दिनचर्या काय आहे ? आता बुद्धिबळासाठी खूप एकाग्रता आणि संयम आवश्यक आहे, म्हणून मी खालील गोष्टी करतो ज्यामुळे मी तंदुरुस्त आणि चपळ राहते. मी आठवड्यातून दोन वेळा योगा करतो, आठवड्यातून दोनदा कार्डिओ करतो आणि आठवड्यातून दोनदा शारीरिक लवचिकता, स्ट्रेचिंग, भार प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित करतो आणि आठवड्यातून एक दिवस सुट्टी घेतो. या सर्व गोष्टी बुद्धिबळासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. 6 किंवा 7 तासांच्या मानसिक प्रयत्नांसाठी तुमच्याकडे क्षमता असणे खूप महत्त्वाचे आहे, परंतु तुम्हाला आरामात बसण्यासाठी तुमचे शरीर तितकेच लवचिक असणे देखील आवश्यक आहे आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या समस्येवर लक्ष केंद्रित करायचे असेल तेव्हा तुमच्या श्वासावरील नियंत्रण तुम्हाला शांत राहण्यास मदत करते आणि बुद्धिबळाच्या खेळात हेच महत्वाचे असते. शांत राहणे आणि पुढील कार्यावर लक्ष केंद्रित करणे हीच माझ्या ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना फिटनेस टीप आहे. माझ्यासाठी सर्वात महत्वाची फिटनेस टीप म्हणजे रात्रीची शांत झोप घेणे. रात्रीची चार ते पाच तासांची झोप ही अपुरी झोप असते, मला वाटते की रात्रीची किमान सात किंवा आठ तासांची झोप ही महत्वाची आहे त्यामुळे रात्री चांगली झोप घेण्यासाठी आपण शक्य तितके प्रयत्न केले पाहिजेत, कारण यामुळेच तुम्ही दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवसभर शांतपणे कार्यरत राहू शकता. तुम्ही आवेगपूर्ण निर्णय घेत नाही; तुमच्या भावनांवर तुमचे नियंत्रण आहे. माझ्यासाठी झोप ही सर्वात महत्त्वाची फिटनेस टीप आहे.

(हेही वाचा – Mann Ki Baat : नवीन वर्षातही आपल्याला उत्साह आणि वेग कायम ठेवायचा आहे – पंतप्रधान मोदी)

अक्षय कुमार सांगितले स्टिरॉईड्सचे दुष्परिणाम आणि शुध्द तूपाचे महत्त्व

नमस्कार, मी अक्षय कुमार. सर्वप्रथम मी आपल्या आदरणीय पंतप्रधानांचे आभार मानू इच्छितो की, त्यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात मला देखील माझ्या ‘मनातील गोष्ट’ तुम्हाला सांगण्याची एक छोटीशी संधी मिळाली आहे. तुम्हां सर्वांना माहितच आहे की तंदुरुस्तीची मला जितकी आवड आहे त्याहून कितीतरी अधिक आवड नैसर्गिक पद्धतीने तंदुरुस्त राहण्याची आहे. मला या भपकेदार व्यायामशाळा अजिबात आवडत नाहीत. त्यापेक्षा मला मोकळ्यावर पोहायला, बॅडमिंटन खेळायला, पायऱ्या चढायला, मुदगल घेऊन व्यायाम करायला, चांगले आरोग्यपूर्ण जेवण जेवायला अधिक आवडते. बघा, मला असं वाटतं की शुध्द तूप जर योग्य प्रमाणात खाल्ले तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. पण मी बघतो की बरेचसे तरुण तरुण केवळ जाड होण्याच्या भीतीने तूप खात नाहीत. आपल्या तंदुरुस्तीसाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे आपण समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही तुमची जीवनशैली डॉक्टरांच्या सल्ल्याने बदला, एखाद्या अभिनेत्याची शरीरयष्टी पाहून तसे करू नका. अभिनेते जसे पडद्यावर दिसतात तसे ते अनेकदा प्रत्यक्षात असत नाहीत. चित्रपटात अनेक प्रकारचे फिल्टर आणि स्पेशल इफेक्ट्स यांचा वापर करण्यात येतो आणि आपण पडद्यावर जे दिसते त्यानुसार आपले शरीर घडवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने शॉर्टकटचा वापर करू लागतो. आजकाल खूप लोक स्टिरॉईड्सचे सेवन (Side effects of steroids) करून सिक्स पॅक, एट पॅक यांच्या मागे लागतात.

अशा शॉर्टकट्सचा वापर केल्यावर शरीर बाहेरून वाढलेले दिसते मात्र आतून पोकळच राहते. तुम्ही सर्वांनी हे नेहमी लक्षात ठेवा की शॉर्टकट तुमचे आयुष्य कमी करू शकतात. तुम्हाला शॉर्टकट नव्हे तर दीर्घकाळ टिकणारी तंदुरुस्ती हवी आहे. मित्रांनो, तंदुरुस्ती एक तपस्या आहे. ती काही इंस्टंट कॉफी किंवा दोन मिनिटात तयार होणारे नूडल्स नव्हे. म्हणून नव्या वर्षात स्वतःला वचन द्या, रसायने वापरायची नाहीत, शॉर्टकट्स वापरायचे नाहीत. व्यायाम, योग, चांगले अन्न, वेळेवर झोप, थोडे मेडिटेशन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जसे तुम्ही आहात तसे आनंदाने स्वीकारा. आजपासून फिल्टर असलेले जीवन नव्हे, तर अधिक तंदुरुस्त जीवन जागा. काळजी घ्या. जय महाकाल.

प्राचीन व्यायाम प्रकार स्वीकारले पाहिजेत

या क्षेत्रात आणखी कितीत्तारी स्टार्ट अप उद्योग कार्यरत आहेत म्हणून मी विचार केला की या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या एका स्टार्ट अपच्या तरुण संस्थापकाशी देखील चर्चा करावी.

नमस्कार, माझे नाव ऋषभ मल्होत्रा आहे आणि मी बेंगळूरूचा रहिवासी आहे. ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमात तंदुरुस्ती वर चर्चा होते आहे, हे समजल्यावर मला अत्यंत आनंद झाला आहे. मी स्वतः तंदुरुस्तीच्या विश्वाशी संबंधित आहे आणि बेंगळूरूमध्ये आमचा ‘तगडा रहो’ नामक स्टार्ट अप उद्योग आहे. आमचा स्टार्ट अप भारतातील पारंपरिक व्यायाम प्रकारांना चालना देण्यासाठी सुरु करण्यात आला आहे. भारतातील पारंपरिक व्यायामांमध्ये एक अत्यंत अद्भुत व्यायाम प्रकार आहे, ‘गदा व्यायाम’ यामध्ये आम्ही गदा आणि मुदगल यांच्या साहाय्याने केल्या जाणाऱ्या व्यायामावर लक्ष केंद्रित केले आहे. लोकांना या गोष्टीचे अत्यंत आश्चर्य वाटते की, संही गदेच्या सहाय्याने सगळे प्रशिक्षण कसे घेतो. मी तुम्हांला हे सांगू इच्छितो की गदा व्यायाम हा हजारो वर्ष प्राचीन व्यायाम प्रकार आहे आणि भारतात गेल्या हजारो वर्षांपासून तो केला जात आहे. तुम्ही लहानमोठ्या आखाड्यांमध्ये तुम्ही हा प्रकार पहिला असेल आणि आमच्या स्टार्ट अपच्या माध्यमातून आम्ही या प्रकाराला आधुनिक स्वरुपात पुन्हा घेऊन आलो आहोत. आम्हांला संपूर्ण देशभरातून खूप प्रेम आणि उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘मन की बात’च्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की या प्रकाराखेरीज देखील भारतात असे अनेक प्राचीन व्यायाम प्रकार आहेत जे आरोग्य आणि तंदुरुस्ती यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या पद्धती आहेत ज्या आपण स्वीकारल्या पाहिजेत आणि जगाला त्या शिकवल्या देखील पाहिजेत. मी तंदुरुस्तीच्या जगात वावरतो, म्हणून तुम्हाला एक व्यक्तिगत सल्ला देऊ इच्छितो. गदा व्यायामाच्या सहाय्याने तुम्ही तुमचे बळ, ताकद, शारीरिक स्थिती आणि श्वसनक्रिया देखील योग्य पद्धतीने करू शकता म्हणून गदा व्यायामाचा स्वीकार करा आणि त्याचा प्रसार करा. जय हिंद.

मित्रांनो, प्रत्येकाने आपापली मते मांडली आहेत; पण सर्वांचा गुरुमंत्र एकच आहे – ‘निरोगी राहा, तंदुरुस्त राहा’. 2024 या वर्षाची सुरुवात करण्यासाठी तुम्हा सर्वांकडे स्वतःच्या तंदुरुस्तीहून मोठा दुसरा कोणता संकल्प असणार.

(हेही वाचा – Tehreek-e-Hurriyat Banned : जम्मू-काश्मीरमध्ये इस्लामिक राजवट लादण्याचा कट; तहरीक-ए-हुर्रियतवर बंदी)

पंतप्रधानांनी केला भाषिणी या AI टूलचा वापर

माझ्या कुटुंबियांनो, काही दिवसांपूर्वी काशीमध्ये एक प्रयोग करण्यात आला होता, त्याबद्दल मी ‘मन की बात’च्या (Mann Ki Baat) श्रोत्यांना आवर्जून माहिती देऊ इच्छितो. तुम्हांला माहित आहेच की काशी-तमिळ संगमम मध्ये भाग घेण्यासाठी हजारो लोक तामिळनाडूहून काशीला पोहोचले होते. तिथे मी त्या लोकांशी संवाद साधण्यासाठी भाषिणी या AI टूल अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता साधनाचा सार्वजनिक पातळीवर पहिल्यांदाच वापर केला. मी व्यासपिठावरून हिंदीत भाषण करत होतो मात्र भाषिणी या साधनामुळे तिथे उपस्थित असलेल्या तामिळनाडूच्या लोकांना माझे तेच भाषण तमिळ भाषेत ऐकू येत होते. काशी-तमिळ संगमममध्ये आलेले लोक या प्रयोगामुळे अत्यंत आनंदित झाले. कोणत्याही एका भाषेत केलेलं भाषण जनता त्याच वेळी स्वतःच्या भाषेत ऐकू शकेल, असा दिवस आता फार दूर नाही. अशीच परिस्थिती चित्रपटांच्या बाबतीत देखील होऊ शकेल. चित्रपटगृहात प्रेक्षक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने संवादांचे स्वतःच्या भाषेत भाषांतर त्याच वेळी ऐकू शकाल. जेव्हा हे तंत्रज्ञान आपल्या शाळांमध्ये, रुग्णालयांमध्ये, आपल्या न्यायालयांमध्ये व्यापक प्रमाणात वापरले जाईल तेव्हा किती मोठे परिवर्तन घडून येईल याची आपण कल्पना करू शकता. मी आज तरुण पिढीला आवर्जून सांगु इच्छितो की वास्तव वेळी होणाऱ्या भाषांतराशी संबंधित कृत्रिम बुद्धीमत्ता साधनाला आणखी खोलवर समजून घ्या, त्याला शंभर टक्के निर्धोक रूप द्या.

स्वतःच्या भाषेत शिक्षण मिळाल्यामुळे मुलांचा शिकण्याचा वेग वाढला

मित्रांनो, बदलत्या काळात आपल्याला आपल्या भाषा वाचवायच्या आहेत आणि त्यांचे संवर्धन देखील करायचे आहे. आता मी तुम्हाला झारखंड राज्यातल्या एका आदिवासी गावाबाबत काही सांगू इच्छितो. या गावाने तेथील मुलांना मातृभाषेत शिक्षण देण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे. गढवा जिल्ह्यातील मंगलो गावात मुलांना कुडूख भाषेत शिक्षण देण्यात येत आहे. या शाळेचे नाव आहे ‘कार्तिक उरांव आदिवासी कुडूख शाळा’. या शाळेत 300 आदिवासी मुळे शिक्षण घेत आहेत. कुडूख भाषा उरांव आदिवासी समाजाची मातृभाषा आहे. कुडूख भाषेला स्वतःची लिपी देखील आहे. या लिपीला ‘तोलंग सिकी’ या नावाने ओळखतात. ही भाषा हळूहळू लोप पावत चालली आहे; म्हणून ही भाषा वाचवण्यासाठी या समाजाने मुलांना स्वतःच्या भाषेत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. ही शाळा सुरु करणारे अरविंद उरांव म्हणतात की, आदिवासी मुलांना इंग्रजी भाषेत शिक्षण घेण्यात अडचणी होत्या; म्हणून त्यांनी गावातील मुलांना आपल्या मातृभाषेत शिकवण्यास सुरुवात केली. त्यांच्या या प्रयत्नांचा चांगला परिणाम होऊ लागल्यावर इतर गावकरी देखील त्यांच्यासोबत या उपक्रमात सहभागी झाले. स्वतःच्या भाषेत शिक्षण मिळाल्यामुळे, मुलांचा शिकण्याचा वेग देखील वाढला आहे. आपल्या देशात अनेक मुलं भाषेच्या अडचणीमुळे शिक्षण मध्येच अर्धवट सोडून देतात. या समस्या सोडवण्यात नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची देखील मदत होत आहे. भाषा हा कोणत्याही मुलाचे शिक्षण तसेच प्रगती यांमधील अडथळा ठरू नये, या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत.

(हेही वाचा – आता युपीआय पेमेंट होणार अधिक सोपे)

सावित्रीबाई फुले आणि रानी वेलू नाचियार यांच्या शिक्षणक्षेत्रातील कार्याचा गौरव

मित्रांनो, आपल्या प्रत्येक कालखंडात देशाच्या असामान्य कन्यांनी अभिमानास्पद कामगिरी करून भारतभूमीला गौरवान्वित केलं आहे. सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) आणि रानी वेलू नाचियार या देशाच्या अशाच असामान्य विभूती आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे एखाद्या प्रकाश स्तंभाप्रमाणे आहे, जे प्रत्येक युगात नारी शक्तीला पुढे जाण्याचा मार्ग दाखवत राहणार आहे. आजपासून काही दिवसांनी, 3 जानेवारी रोजी आपण सर्वजण या दोन्ही व्यक्तिमत्त्वांची जयंती साजरी करणार आहोत. सावित्रीबाई फुले यांचे नाव घेताच सर्वात आधी आपल्याला शिक्षण, तसेच समाज सुधारणेच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान आठवते. त्यांनी नेहमीच स्त्रियांच्या आणि वंचितांच्या शिक्षणासाठी जोरदार आवाज उठवला. त्या त्यांच्या काळाच्या फार पुढे होत्या आणि चुकीच्या प्रथांचा विरोध करण्यात त्या नेहमीच आघाडीवर असत. शिक्षणाच्या मदतीने समाजाचे सशक्तीकरण करण्यावर त्यांचा दृढ विश्वास होता. महात्मा फुले यांच्या साथीने त्यांनी मुलींसाठी अनेक शाळा सुरु केल्या. त्यांच्या कविता लोकांमध्ये जागरुकता आणि आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या असत. त्या लोकांकडे गरजेच्या वेळी एकमेकांची मदत करण्याचा आणि निसर्गासह समरसतेने राहण्याचा आग्रह धरत असत. त्या किती दयाळू होत्या, याचे वर्णन शब्दात करता येणारच नाही. जेव्हा महाराष्ट्रात दुष्काळ पडला, त्या वेळी सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी गरजूंसाठी स्वतःच्या घराची दारे खुली केली. सामाजिक न्यायाचे असे उदाहरण क्वचितच पाहायला मिळते. जेव्हा प्लेगची भयंकर साठ आली, तेव्हा सावित्रीबाई यांनी स्वतःला लोकांच्या सेवेप्रती समर्पित केले. या दरम्यान त्या स्वतःदेखील या आजाराच्या विळख्यात सापडल्या. मानवतेला समर्पित असलेले त्यांचे जीवन आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देत आहे.

मित्रांनो, परदेशी सत्तेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या देशातील अनेक महान व्यक्तिमत्त्वांमध्ये राणी वेलू नाचियार यांचा देखील समावेश होतो. तमिळनाडूमधील माझे बंधू-भगिनीआजही त्यांना वीरा मंगई म्हणजे वीर स्त्री या नावाने ओळखतात. राणी वेलू नाचियार यांनी इंग्रजांशी ज्या शौर्याने लढल्या आणि त्यांनी जो पराक्रम करून दाखवला, तो अत्यंत प्रेरणादायक आहे. इंग्रजांनी शिवगंगा साम्राज्यावरील हल्ल्यात तेथील राजा असलेल्या त्यांच्या पतीची हत्या केली. राणी वेलू नाचियार आणि त्यांची कन्या शत्रूच्या तावडीतून कशाबशा बाहेर पडल्या. त्यानंतर अनेक वर्ष राणी वेलू नाचियार यांनी संघटना उभारण्यात आणि मरुदु ब्रदर्स म्हणजेच आपल्या कमांडरांच्या मदतीने सैन्य उभे करण्यासाठी कंबर कसली. राणीने संपूर्ण तयारीनिशी इंग्रजांविरुद्ध युध्द छेडले आणि अत्यंत हिंमतीने आणि निर्धाराने ती इंग्रजांशी लढली.ज्यांनी स्वतःकडील सैन्यात पहिल्यांदाच संपूर्णपणे स्त्रियांचा समावेश असलेली तुकडी उभारली अशा निवडक लोकांमध्ये राणी वेलू नाचियार हिचा समावेश होतो. मी या दोन्ही वीरांगनांना श्रद्धांजली वाहतो.

समाजकार्यासाठी उत्पन्न दान करणारे प्रसिध्द कलाकार भाई जगदीश त्रिवेदी

माझ्या कुटुंबियांनो, गुजरातमध्ये डायराची परंपरा आहे. हजारो लोक रात्रभर डायरा मध्ये सहभागी होऊन मनोरंजनासह ज्ञानार्जन करतात. या डायरा मध्ये लोकसंगीत, लोकसाहित्य आणि हास्य यांचा त्रिवेणी संगम प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद निर्माण करतो. या डायराचे एक प्रसिध्द कलाकार आहेत, भाई जगदीश त्रिवेदी (Bhai Jagdish Trivedi) जी. हास्य कलाकार म्हणून भाई जगदीश त्रिवेदी यांनी गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ छाप पाडली आहे. नुकतेच भाई जगदीश त्रिवेदी यांचे एक पत्र मला मिळाले आणि त्यासोबत त्यांनी स्वतःचे पुस्तक देखील पाठवले आहे. पुस्तकाचे नाव आहे- सोशल ऑडिट ऑफ सोशल सर्विस. हे पुस्तक अत्यंत अनोखे आहे. यामध्ये हिशोब आहे, हे पुस्तक म्हणजे एक प्रकारचा ताळेबंद आहे. गेल्या ६ वर्षांमध्ये भाई जगदीश त्रिवेदी यांना कोणकोणत्या कार्यक्रमातून किती उत्पन्न मिळाले, आणि ते पैसे कुठे-कुठे खर्च झाले याचा संपूर्ण जमाखर्च आहे. हा ताळेबंद अशासाठी विलक्षण आहे कारण की, त्यांनी स्वतःचे संपूर्ण उत्पन्न, एक एक रुपया समाजासाठी – शाळा, रुग्णालये, वाचनालये, दिव्यांग व्यक्तींशी संबंधित संस्था आणि अशाच इतर समाजसेवेसाठी खर्च केला आहे. त्याचा संपूर्ण 6 वर्षांचा हिशोब या पुस्तकात आहे.उदाहरणार्थ, या पुस्तकात एका जागी लिहिले आहे की,2022 मध्ये त्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांतून त्यांना दोन कोटी, पस्तीस लाख एकोणऐंशी हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये मिळाले आणि त्यांनी शाळा, रुग्णालये, वाचनालये यांना दिले दोन कोटी, पस्तीस लाख एकोणऐंशी हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये. एक रुपयादेखील स्वतःसाठी ठेवला नाही. खरेतर या सगळ्याच्या मागे देखील एक मनोरंजक घटना आहे. तर झालं असं की,भाई जगदीश त्रिवेदी यांनी सांगितले की जेव्हा 2017 या वर्षी ते 50 वर्षांचे होतील, त्यानंतर ते त्यांच्या कार्यक्रमांचे उत्पन्न घरी देणार नाहीत तर समाजासाठी खर्च करणार आहेत. 2017 पासून आतापर्यंत विविध सामाजिक कार्यांसाठी त्यांनी सुमारे पावणेनऊ कोटी रुपये खर्च केले आहेत. इक विनोदी कलाकार स्वतःच्या किश्श्यांनी प्रत्येकाला हसवतो. मात्र, आतल्याआत किती भावनांच्या कल्लोळातून जात असतो हे भाई जगदीश त्रिवेदी यांचे आयुष्य पाहिल्यावर आपल्याला समजते. त्यांनी तीन वेळा पीएचडी मिळवली आहे हे समजल्यावर तुम्हांला आणखीनच आश्चर्य वाटेल. त्यांनी आतापर्यंत, 75 पुस्तके लिहिली आहेत आणि त्यातील अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत.त्यांनी केलेल्या समाज कार्यासाठी देखील अनेक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यत आला आहे. मी भाई जगदीश त्रिवेदी यांना त्यांच्या समाज कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो.

श्रीराम आणि अयोध्या यांच्यावर आधारित गीते आणि भजने #shriRamBhajan हा हॅशटॅग वापरून शेअर करा 

माझ्या कुटुंबीयांनो, अयोध्येतील राम मंदिराविषयी संपूर्ण देशभरात हर्ष आणि उल्लास आहे. लोक आपल्या भावनांना विविध प्रकारे व्यक्त करत आहेत. तुम्ही पाहिलेच असेल की, गेल्या काही दिवसांमध्ये श्री राम आणि अयोध्या यांच्यावर आधारित अनेक नवी गीते, नवी भजने तयार करण्यात आली आहेत. अनेक लोक नव्या कविता देखील रचत आहेत. यामध्ये मोठमोठे अनुभवी कलाकार सहभागी झाले आहेत, तर नव्याने उदयाला येत असलेल्या तरुण मित्रांनी देखील मनमोहक भजनांची रचना केली आहे. यातील काही गाणी तसेच भजने मी माझ्या समाजमाध्यमांवर देखील सामायिक केली आहेत. असं वाटतंय की कलाविश्व स्वतःच्या वैशिष्टयपूर्ण शैलीसह या ऐतिहासिक क्षणांमध्ये सहभागी होत आहे.माझ्या मनात एक विचार आला आहे की आपण सर्वजण अशा सगळ्या रचनांना एका सामायिक हॅश टॅगसह सामायिक करूया. मी तुम्हां सर्वांना हे आवाहन करतो की हॅश टॅग श्री राम भजन (#shriRamBhajan) सह तुमच्या रचना समाज माध्यमांवर सामायिक कराव्या. हे संकलन म्हणजे भावनांचा, भक्तीचा एक असा ओघ बनेल की त्यात प्रत्येकजण राममय होऊन जाईल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आजच्या ‘मन की बात’ (Mann Ki Baat) मध्ये इतकंच. 2024 उजाडायला आता काहीच तास बाकी उरले आहेत. भारताचे यश हे प्रत्येक भारतीयाचे यश आहे. आपल्याला पंच निर्धारांचे स्मरण ठेवून भारताच्या विकासासाठी निरंतर प्रयत्न करत राहायचे आहे. आपण कोणतेही काम करताना, कोणताही निर्णय घेताना, आपला पहिला निकष हाच असला पाहिजे की यातून देशाला काय मिळणार, देशाला कोणता लाभ होणार. सर्वप्रथम देश- नेशन फर्स्ट यापेक्षा मोठा कोणताही मंत्र नाही. याच मंत्राच्या आधाराने वाटचाल करत आपण सर्व भारतीय, आपल्या देशाला विकसित करणार आहोत, आत्मनिर्भर बनवणार आहोत. आपण सर्वजण 2024 मध्ये यशाच्या नव्या उंचीवर पोहोचावे, सर्वांनी निरोगी राहावे, तंदुरुस्त राहावे, अत्यंत आनंदी राहावे- हीच माझी प्रार्थना आहे. वर्ष 2024 मध्ये आपण पुन्हा एकदा देशवासीयांच्या नव्या यशोगाथांबद्दल बोलू या. खूप खूप धन्यवाद.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.