Kalyan Contaminated Ice : गटारावरचा बर्फ पोटात! कल्याण-डोंबिवलीकरांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ

सरबताच्या नावाखाली कावीळ-टायफॉइडची खुली विक्री; सरबत गाड्या, ज्यूस सेंटर्ससह समारंभात घाणेरड्या बर्फाचा सर्रास वापर

89
गटारावर विकला जाणारा दूषित बर्फ
Kalyan Contaminated Ice : गटारावरचा बर्फ पोटात! कल्याण-डोंबिवलीकरांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ
  • कल्याण, प्रतिनिधी

Kalyan Contaminated Ice                कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात नागरिकांच्या आरोग्याशी सरळ सरळ खेळ सुरू आहे. पिण्याच्या सरबतात, उसाच्या रसात आणि बर्फाच्या गोळ्यात वापरण्यात येणारा बर्फ थेट गटाराच्या झाकणावर, रस्त्याच्या कडेला उघड्यावर ठेवून विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उन्हाळा वाढला की रस्त्यांवर बर्फाच्या लाद्या उघड्यावर पडलेल्या दिसतात. ज्यूस, सरबत, गोळा, लस्सी, ताकासाठी हाच बर्फ वापरला जातो. पण हाच बर्फ पोटात गेल्यास जीवघेणे आजार जडू शकतात याची कल्पना तरी आहे का ? असा सवाल नेटकऱ्यांतील तज्ज्ञांकडून उपस्थित केला आहे. (Kalyan Contaminated Ice)

रेल्वे स्टेशन, बस डेपो, रिक्षा स्टँड परिसर, बाजारपेठ आणि इतर गर्दीच्या ठिकाणी बर्फ विक्रेते कोणतीही स्वच्छता न पाळता गटाराच्या लोखंडी झाकणावरच बर्फाच्या लादी ठेवतात. त्याच्यावरून भटकी कुत्री, उंदीर, झुरळे फिरतात, लोक थुंकतात, धूळ-माती बसते. हाच बर्फ फोडून थेट सरबताच्या गाड्यांवर, ज्यूस सेंटरमध्ये आणि छोट्या-मोठ्या लग्नसमारंभ, राजकीय कार्यक्रमांतील सरबतासाठी वापरला जातो. डॉक्टरांच्या मते, असा दूषित बर्फ पोटात गेल्यास कॉलरा, कावीळ, टायफॉइड, गॅस्ट्रो, यांसारखे गंभीर आजार उद्भवू शकतात. विशेषतः लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होतो. औद्योगिक वापरासाठीचा टेक्निकल बर्फ आणि खाण्यायोग्य इडिबल बर्फ यात फरक असतो. मात्र नफ्यासाठी स्वस्तातला घाणेरडा बर्फच खाण्यासाठी वापरला जात आहे. दोन पैसे वाचविण्यासाठी बर्फ विक्रेते आणि सरबतवाले कल्याण-डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळत आहेत. केडीएमसीने तातडीने धडक मोहीम राबवून नमुने तपासावेत आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. (Kalyan Contaminated Ice)

(हेही वाचा – बांगलादेशी घुसखोरांना हाकलून देणे हीच खरी Veer Savarkar यांना आदरांजली ठरेल – रणजित सावरकर)

एफडीएचे नियम काय सांगतात?

अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार मानवी सेवनासाठीचा बर्फ पोर्टेबल वॉटर म्हणजेच पिण्यायोग्य पाण्यापासून तयार करणे बंधनकारक आहे. बर्फाचे उत्पादन, वाहतूक आणि साठवण पूर्णपणे स्वच्छ, बंदिस्त जागेत व्हायला हवी. बर्फ हाताळणाऱ्या कामगारांना हातमोजे आणि ॲप्रन घालणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात मात्र कल्याण-डोंबिवलीमध्ये या नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे. (Kalyan Contaminated Ice)

अन्न व औषध प्रशासन अनभिज्ञ?

कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात शेकडो सरबत गाड्या, ज्यूस सेंटर आहेत. पण केडीएमसी आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आजपर्यंत एकाही बर्फ विक्रेत्यावर किंवा सरबत विक्रेत्यावर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. नागरिकांच्या तक्रारींनंतरही प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. (Kalyan Contaminated Ice)

(हेही वाचा – Kalyan : जोकर टॉकीज परिसरातील कुख्यात ‘मॅडी’ गजाआड; पोलिसांनी घटनास्थळी नेऊन केला पंचनामा)

नागरिकांनी काय करावे?

१) उघड्यावर ठेवलेला काळपट दिसणारा बर्फ टाळावा.

२) ज्यूस, सरबत घेताना हा बर्फ कुठला आहे? असा सवाल विक्रेत्याला विचारावा.

३) शक्यतो बाटलीबंद पाणी किंवा स्वतः घरी बनवलेला बर्फ वापरावा.

४) उघड्यावरील सरबत, बर्फाचा गोळा टाळावा.

५) लग्नकार्यातील वेलकम ड्रिंक घेताना बर्फ स्वच्छ आहे का? हे तपासावे.

६) असा प्रकार दिसल्यास केडीएमसीचा आरोग्य विभाग ०२५१-२२१०००० किंवा एफडीएच्या टोल फ्री १८००२२२३६५ वर तक्रार करावी. (Kalyan Contaminated Ice)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.