म्हाडाच्या ‘या’ सदनिकांसाठी पात्र ठरल्यास मोजावे लागणार जास्त पैसे

146
म्हाडाच्या ‘या’ सदनिकांसाठी पात्र ठरल्यास मोजावे लागणार जास्त पैसे
म्हाडाच्या ‘या’ सदनिकांसाठी पात्र ठरल्यास मोजावे लागणार जास्त पैसे

सचिन धानजी, मुंबई

म्हाडा मुंबई मंडळाच्यावतीने ४०८३ घरांची ऑनलाईन लॉटरी जाहीर करण्यात आली असून या लॉटरीमध्ये तब्बल ३४१ घरे ही विविध विकास प्रकल्पांमधून प्राप्त होणाऱ्या तसेच विखुरलेल्या सदनिका आहेत. विशेष म्हणजे यासर्व सदनिकांसाठी यशस्वी ठरणाऱ्या लाभार्थ्याला सदनिकेचा ताबा घेताना त्या जागेचे यापूर्वी वीज बिलासह महापालिकेच्या मालमत्ता कराची रक्कम सोसायटीला आधी भरावे लागणार आहे. त्यामुळे वीज बिलासह महापालिकेच्या मालमत्ता कराची किती थकीत रक्कम प्रलंबित आहे, प्रत्यक्षात घराचा ताबा घेतल्यानंतरच ही रक्कम भरावी लागणार असल्याने लाभार्थ्याच्या खिशावर अधिक भार पडण्याची शक्यता आहे.

म्हाडा मुंबई मंडळाच्यावतीने ४०८३ घरांची लॉटरी सोडत जाहीर करून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत रविवारपर्यंत एकूण ६५ हजार ९६७ ऑनलाईन अर्जांची नोंदणी झाली आहे. तर यापैकी २४ हजार ७७६ अर्जदारांनी यासाठीची अनामत रक्कम म्हाडाकडे जमा केली आहे. मात्र, या ४०८३ घरांपैकी ३४१ सदनिका या म्हाडा वसाहतीतील तथा जागेवरील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासातून म्हाडाच्या मुंबई मंडळाला प्राप्त झालेल्या तथा होणाऱ्या तसेच विखुरलेल्या अशाप्रकारच्या आहेत. यामध्ये विकास नियंत्रण नियमावली ३३(५)अंतर्गत म्हाडाच्या माध्यमातून गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकास करण्यास परवानगी दिल्यानंतर म्हाडाला १३९ सदनिका प्राप्त झाल्या आहेत.

(हेही वाचा – म्हाडाचे घर घ्यायचे तर केवळ बँकेच्या कर्जावर नका राहू अवलंबून!)

तर या विकास नियंत्रण नियमाली ३३(५)अंतर्गत बांधकाम सुरु असलेल्या आणि भविष्यात प्राप्त होणाऱ्या अल्प व मध्यम उत्पन्न गटाच्या ७५ सदनिकांचा समावेश आहे. तर ३०० मीटर कमी क्षेत्रफळ असलेल्या म्हाडाच्या जमिनीवर राबवण्यात येणाऱ्या विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत मध्यम व उच्च उत्पन्न गटाच्या २५ सदनिका प्राप्त झालेल्या आहेत. तसेच मुंबई मंडळा अंतर्गत विखुरलेल्या अर्थात वेगवेगळ्या ठिकाणी सर्व प्रकारच्या उत्पन्न गटातील १०२ सदनिकांचा समावेश आहे. या सर्व प्रकारच्या सदनिकांसाठी यशस्वी ठरणाऱ्या लाभार्थ्याला सदनिकांच्या सेवाशुल्क आकार, मालमत्ता कर, विद्युत बिलांची प्रलंबित रक्कम भरावी लागणार आहे. सदनिकांच्या विक्री किंमतीमध्ये या सेवा शुल्क आकारासह इतर थकीत तथा प्रलंबित रकमेचा समावेश नसल्याने जेवढी थकीत रक्कम असेल तेवढी रक्कम लाभार्थ्याला घराचा ताबा घेताना संबंधित गृहनिर्माण संस्थेकडे भरावी लागणार आहे. विशेष म्हणजे या म्हाडाच्या माध्यमातून विक्रीसाठी काढण्यात आलेली सदनिका किती वर्षे बंद होती, त्यावर प्रलंबित रक्कम ही कमी अधिक असेल. त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून जाहीर केलेल्या विक्री किंमतीपेक्षा थकीत तथा प्रलंबित रक्कम मोजावी लागणार असल्याने अधिकचा भार या सदनिकांच्या लॉटरी यशस्वी ठरणाऱ्या लाभार्थ्यांच्या खिशावर पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

  • डिसीआर ३३ (५) अंतर्गत प्राप्त होणाऱ्या सदनिका : १३९
  • डिसीआर ३३ (५) अंतर्गत बांधकाम सुरु असलेल्या सदनिका : ७५
  • डिसीआर ३३(७) अंतर्गत प्राप्त होणाऱ्या सदनिका : २५
  • विखुरलेल्या सदनिका : १०२

लॉटरी सोडत जाहीर झाल्यानंतर नोंदणी झालेले अर्जदार आणि रक्कम भरलेले अर्जदार

सोमवार २२ मे २०२३
अर्ज नोंदणी : ६५५
रक्कम भरलेले अर्जदार : २०८

मंगळवार २३ मे २०२३
अर्ज नोंदणी : ४२३६
रक्कम भरलेले अर्जदार : १७००

बुधवार २४ मे २०२३
अर्ज नोंदणी: ६६१४
रक्कम भरलेले अर्जदार : २७८०

गुरुवार २५ मे २०२३
अर्ज नोंदणी : ८६१८
रक्कम भरलेले अर्जदार : ३७४९

शुक्रवार २६ मे २०२३
अर्ज नोंदणी : १०,२९२
रक्कम भरलेले अर्जदार : ४६२२

शनिवार २७ मे २०२३
अर्ज नोंदणी : १२२०२
रक्कम भरलेले अर्जदार : ५५०३

रविवार २८ मे २०२३
अर्ज नोंदणी : १३६५०
रक्कम भरलेले अर्जदार : ६२१४

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.