सासऱ्यांनी हुंडा दिला नाही, पत्नीला मुलगी झाली म्हणून तस्लिमने दिला Triple Talaq ; पोलिसात गुन्हा दाखल

डिसेंबर 2023 मध्ये तस्लीम मोहम्मद सुट्टीवर घरी आला. तोही आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे वागू लागला आणि जानेवारी 2024 मध्ये पीडितेला तिहेरी तलाकची (Triple Talaq) नोटीस पाठवली. पीडितेने ही नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्यावर तिच्या पतीने १७ फेब्रुवारीला दुसऱ्या तलाकची आणि २१ मार्चला तिसऱ्या तलाकची नोटीस पाठवली.

141

मुंबईत तिहेरी तलाकचे (Triple Talaq) प्रकरण समोर आले आहे. येथे मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीला पत्राने तिहेरी तलाक पाठवला. ही पत्रे वेगवेगळ्या तारखांना दोनदा पाठवण्यात आली होती. तस्लीम मोहम्मद असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणात आरोपी पतीसह त्याचे वडील, भाऊ, बहीण आणि भावजय यांचीही नावे आहेत. पत्नीला मुलगा झाला नाही आणि हुंडा दिला नाही या कारणांमुळे तलाक (Triple Talaq) दिल्याचे आरोपीने सांगितले.

हे प्रकरण मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्याच्या परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या 30 वर्षीय मुस्लिम महिलेने तिच्या सासरच्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत असे म्हटले आहे की, पीडितेचा विवाह तस्लीम मोहम्मदसोबत 2018 साली झाला होता, जेव्हा तस्लीम शिकत होता. त्यावेळी पीडितेच्या वडिलांनी हुंडा म्हणून पाच लाख रुपये दिले होते. दरम्यान, जानेवारी 2021 मध्ये तस्लीम मोहम्मद याला मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळाली आणि तो 9 महिन्यांसाठी त्यांच्या जहाजावर गेला. तस्लीम मोहम्मद जहाजावर जाताच सासरच्या लोकांनी पीडितेचा छळ सुरू केला, असा आरोप आहे. घर लहान असल्याच्या बहाण्याने सर्वप्रथम पीडितेला तिच्या माहेरी पाठवले. दरम्यान, पीडित मुलगी गरोदर राहिली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर तस्लीमच्या कुटुंबीयांनी पीडितेचा आणखी छळ सुरू केला. आरोपींना मुलगा हवा होता, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, पीडितेच्या सासूचे नोव्हेंबर २०२३ मध्ये निधन झाले.

(हेही वाचा Ban Ind vs Ban Test Series : बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या वार्तांकनावर बंदीचा ‘हिंदुस्थान पोस्ट’चा निर्णय )

फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, सासूचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पीडित मुलगी सासरच्या घरी पोहोचली असता, पीडितेच्या मेव्हणीने तिला घरातही जाऊ दिले नाही. काही दिवसांनी, डिसेंबर 2023 मध्ये तस्लीम मोहम्मद सुट्टीवर घरी आला. तोही आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे वागू लागला आणि जानेवारी 2024 मध्ये पीडितेला तिहेरी तलाकची (Triple Talaq) नोटीस पाठवली. पीडितेने ही नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्यावर तिच्या पतीने १७ फेब्रुवारीला दुसऱ्या तलाकची आणि २१ मार्चला तिसऱ्या तलाकची नोटीस पाठवली.

पीडितेला यापैकी एकही नोटीस मिळाली नसली तरी तस्लीम मोहम्मदने तीच घटस्फोटाची नोटीस पीडितेला व्हॉट्सॲपवर पाठवली. पीडित महिला घटस्फोटाच्या बाजूने नसल्याचे सांगण्यात येत आहे. तिने तिच्या सासरच्या घरी राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि समुपदेशन करण्यास सांगितले. पण, तस्लीम आणि त्यांच्या कुटुंबावर या प्रयत्नांचा काहीही परिणाम झाला नाही. अखेर पीडितेला तिच्या सासरच्या मंडळींकडून एकूण ७ आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी लागली.

या तक्रारीवरून पोलिसांनी तिहेरी तलाक कायद्यासह विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. एफआयआरमध्ये पीडितेचा पती तस्लीम मोहम्मद, सासरा इलियास खान, मेहुणी आफरीन आणि परमीन, मेहुणीचा पती बिलाल, मेहुणा इम्रान आणि गुफरान यांची नावे एफआयआरमध्ये आहेत. या सर्वांवर 2018 ते 2024 या कालावधीत पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करणे, हुंड्याची मागणी करणे आणि तिहेरी तलाक दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.