मुंबईत ४० हजारांनी रुग्ण संख्या वाढली तरीही नसणार कडक निर्बंध?

93

मुंबईत सध्या झपाट्याने कोविड रुग्णांची संख्या वाढत असतानाच महापौर आणि महापालिका आयुक्त यांनी रुग्णांचा २० हजारांपर्यंत पोहोचल्यास लॉकडाऊन करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. परंतु आता त्यांनी तुर्तास तरी अशा प्रकारचे लॉकडाऊन लागू करता येणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र सध्याची रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांची तथा लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या पाहता ४० हजारांपर्यंत जरी रुग्ण संख्या वाढली, तरी लॉकडाऊन होणार नाही, अशा प्रकारे चर्चा आरोग्य विभागांमध्येच सुरु आहे. आता अशा प्रकारची संख्या ४० हजारांपर्यंत वाढली तरीही लॉकडाऊन करण्याची गरज भासणार नाही, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

रुग्ण संख्या २० हजार पार, तरीही…

मुंबईत गुरुवारी २० हजार १८१ रुग्ण आढळून आले, तर शुक्रवारी २० हजार ९७१ नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे वाढत्या रुग्ण संख्येबाबत प्रतिक्रिया देताना महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना, जर दरदिवशी २० हजार रुग्ण आढळून आल्यास त्वरीत लॉकडाऊन लावले जाईल, असे सांगितले होते. तर महापौर किशोरी पेडणेकर यांनीही आयुक्तांच्या प्रतिक्रियेवर रि ओढली होती. परंतु गुरुवारी रुग्णांनी २० हजारांचा आकडा पार केल्यानंतर आयुक्तांनी, मुंबईत तुर्तास लॉकडाऊन नाही, लोकल सेवाही सुरुच राहिल, असे स्पष्ट केले. मुंबईतील सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन नाही, असे त्यांनी म्हटले होते. सध्या ऑक्सिजनचा वापर नगण्य आहे, बेड रिकामे असल्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही लॉकडाऊनची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर महापौरांनीही लॉकडाऊनबाबतचा निर्णय शुक्रवारी संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री घोषणा करतील, असे सांगत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.

(हेही वाचा कर्नाटकाप्रमाणे देशभरातील मंदिरे सरकारी नियंत्रणापासून मुक्त करण्याची मागणी)

…तरीही लॉकडाऊन नाहीच

मात्र, एका बाजुला दैनंदिन २० हजार रुग्ण झाल्यास लॉकडाऊनची भीती दाखवल्यानंतरही आयुक्तांनी यामध्ये स्पष्टता आणली असली तरी आरोग्य विभागातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते मुंबईतील आजची स्थिती पाहता ४० हजार रुग्ण झाले तरी लॉकडाऊन करण्याची गरज भासणार नाही. कडक निर्बंध लादण्याबाबतची स्थिती नसल्याचे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. ऑक्सिजन बेडचा वापर कमी होत असून काही लक्षणे नसलेले रुग्णच अधिक दाखल होऊ लागल्याने रुग्णालयांमधील दाखल रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. त्यामुळे मुंबईतील वाढते रुग्ण असले तरी मुंबईकरांनी योग्यप्रकारची काळजी घेतली तरीही कोणत्याही प्रकारे घाबरण्याची गरज नाही,असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

धारावीत १५० रुग्ण

धारावीत गुरुवारी रुग्णांची शंभरी पार झालेली असतानाच शुक्रवारी दिवसभरात १५० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील सक्रिय रुग्णांची संख्या आता ५८८ वर पोहोचली आहे. यापैकी केवळ १४७ रुग्ण हे लक्षणे असलेले असून त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये तसेच कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. तर ४४१ रुग्णांना हे घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दादर, धारावी व माहिम या जी उत्तर विभागात दिवसभरात ७७० नवीन रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये दादरमध्ये २५० नवीन रुग्ण आणि माहिममध्ये ३७० नवीन रुग्ण आढळून आहेत. या दोन्ही भागांमध्ये अनुक्रमे ३२१ व ४०४ रुग्ण हे रुग्णालय व कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. तर अनुक्रमे ९६० व १२१२ हे रुग्ण घरीच क्वारंटाईन असल्याची माहिती जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.