मुंबईत सुमारे १९ हजार इलेक्ट्रीक वाहनांची नोंदणी; आणखी दहा सार्वजनिक वाहनतळांमध्ये उभारणार चार्जिंग स्टेशन

96

पर्यावरण संतुलन व संवर्धनासाठी विद्युत वाहने अर्थात इलेक्ट्रिकल व्हेईकलच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा भाग म्हणून मुंबईतील आणखी दहा सार्वजनिक वाहनतळांमध्ये इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) समवेत मुंबई महानगरपालिकेने करार केला आहे. पारंपरिक वाहनांचे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रुपांतर केल्यास प्रतिवर्षी सुमारे १०० अब्ज डॉलर किमतीच्या जीवाश्म इंधनाची बचत होऊ शकते. ज्यामुळे देशाचे मौल्यवान परकीय चलन वाचेल आणि शहरांमधील प्रदूषण कमी करता येवू शकेल. आजपर्यंत मुंबईत १८ हजार ९९३ आणि महाराष्ट्रात १ लाख ८९ हजार ६४३ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे.

प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संतुलनासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विद्युत वाहनांच्या वापरांना प्रोत्साहन दिले जात आहे. या धोरण अंतर्गत विद्युत वाहनांची निर्मिती, त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा यांनाही प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामध्ये योगदान म्हणून महानगरपालिकेने मुंबईत ठिकठिकाणी विद्युत वाहने ऊर्जा भारीत अर्थात चार्जिंग करण्याची सुविधा उभारणीला बळकटी दिली आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांमध्येही इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन निर्मिती केली जात आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) च्या वतीने महानगरपालिकेच्या दहा वाहनतळांमध्ये चार्जिंग स्टेशन निर्मिती केली जाणार आहे. त्याबाबतच्या करारावर महानगरपालिका मुख्यालयात समिती सभागृहात बुधवारी छोटेखानी समारंभात स्वाक्षरी करण्यात आली.

या करारावर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी तर एचपीसीएलच्या वतीने व्यवसाय विकास विभागाचे कार्यकारी संचालक संदीप माहेश्वरी, मुख्य महाव्यवस्थापक देबाशिष चक्रवर्ती यांनी स्वाक्षरी केली. महानगरपालिकेचे उप आयुक्त (पर्यावरण) अतुल पाटील, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (रस्ते) एम. एम. पटेल, उपप्रमुख अभियंता (वाहतूक) विवेक कल्याणकर, सहायक आयुक्त विनायक विसपुते, सहायक आयुक्त मनीष वळंजू, एचपीसीएलचे व्यवसाय विकास महाव्यवस्थापक अनंत मोहापात्रा, वायू इंधन विभागाचे अतुल गोयल, प्रशिक्षण विभागाचे महाव्यस्थापक शुभांकर दत्ता, मुंबई प्रादेशिक कार्यालयाच्या उपव्यवस्थापक रचना रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

या करारानुसार, महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये एचपीसीएल यांना चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी जागा पुरवली जाणार आहे. त्यासाठी महानगरपालिका प्रारंभीची वर्षे भाडे आकारणार नाही. परंतु, एचपीसीएलच्या वतीने प्रति वीज युनिट एक रुपया दराने महानगरपालिकेला रक्कम देण्यात येईल. तसेच या चार्जिंग स्टेशनवर विद्युत वाहने चार्जिंसाठी एचपीसीएलकडून वाजवी दर आकारले जाणार आहेत. प्रत्येक स्टेशनवर सरासरी दोन पॉईट पुरवले जाणार आहेत, म्हणजेच दोन वाहने चार्ज करता येतील. वाहनतळांची ठिकाणे, त्यांच्या गरजा यानुसार या सर्व बाबींना अंतिम रुप दिले जाणार आहे.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू म्हणाले की, केंद्र सरकारच्या धोरणानुसार, २०३० पासून भारतात विक्री केली जाणारी प्रत्येक मोटार कार इलेक्ट्रिक असेल. इलेक्ट्रिक कार जीवाश्म इंधनाऐवजी पर्यायी इंधन म्हणून वीज वापरते. पारंपरिक वाहनांचे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर केल्यास प्रतिवर्षी सुमारे १०० अब्ज डॉलर किमतीच्या जीवाश्म इंधनाची बचत होऊ शकते. ज्यामुळे देशाचे मौल्यवान परकीय चलन वाचेल आणि शहरांमधील प्रदूषण कमी करता येवू शकेल. विद्युत वाहने विक्रीचा हिस्सा ३० टक्के खासगी कारसाठी, ७० टक्के व्यावसायिक वाहनांसाठी आणि ८० टक्के दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी असावा, असा सरकारचा प्रयत्न आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि इतरही सर्व संबंधित प्राधिकरणांना आपापली भूमिका निभवावी लागेल. त्यादिशेने प्रयत्न करताना वित्तीय व्यवस्थापन, वित्तीय व्यवहार्यता शोधून सुयोग्य वित्तीय पद्धती व पायाभूत सुविधा यांची अंमलबजावणी करावी लागेल. त्यादृष्टीने आजच्या कराराला विशेष महत्त्व आहे, असे सांगून सौर ऊर्जा आणि इतर नवीन ऊर्जा स्त्रोतांच्या वापरावर देखील महानगरपालिका आगामी काळात भर देईल, त्यांनी नमूद केले.

अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार (पश्चिम उपनगरे) म्हणाले की, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर एचपीसीएलच्या सहकार्याने मुंबई शहर विभागात चार, पूर्व उपनगरात एक आणि पश्चिम उपनगरात पाच अशा एकूण दहा ठिकाणी चार्जिंग स्टेशन सार्वजनिक वाहनतळांमध्ये उभारले जाणार आहेत. आजपर्यंत मुंबईत १८ हजार ९९३ आणि महाराष्ट्रात १ लाख ८९ हजार ६४३ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा प्रदान करणे आवश्यक आहे. मुंबईतील नागरिकांना त्यांच्या घराजवळ चोवीस तास कार्यरत चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महानगरपालिका करीत आहे. एचपीसीएलच्या सहकार्याने आणि भविष्यात इतर भागधारकांच्या सहकार्याने असे उपक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.

नवीन प्रस्तावित दहा इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशनची ठिकाणेः

१) एच. पी. पेट्रोल पंपाजवळील रुणवाल अँथोरियम, लालबहादूर शास्त्री मार्ग, मुलुंड (पश्चिम)

२) डॉ. आनंदराव नायर मार्ग, जेकब सर्कल, भायखळा

३) सी. एस. क्रमांक ६३ (पीटी) व ६४, अपोलो मील कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ

४) कल्पतरू एव्हाना इमारत, जनरल नागेश मार्ग, एम.जी. एम. हॉस्पिटलजवळ, परळ-शिवडी

५) भूखंड क्रमांक ११/१२४ (अंशतः) व १२/१३४ (अंशतः) मिळून सलग भूखंड, ग. द. आंबेकर मार्ग, काळाचौकी, एफ/दक्षिण

६) हिल रोड व आइस फॅक्टरी लेन यांच्या जंक्शनवर, वांद्रे (पश्चिम)

७) वसंत ओऍसिसजवळ, मरोळ गांव, अंधेरी (पूर्व)

८) पहाडी गोरेगावच्या भूखंडावरील बहुमजली सार्वजनिक वाहनतळ, उमिया माता मंदिरामागे, विश्वेश्वर मार्ग, गोरेगाव (पूर्व)

९) पहाडी गोरेगाव, एस. व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम) (टोपीवाला मार्केट इमारत, गोरेगाव रेल्वे स्थानक (पश्चिम) जवळ, पी/दक्षिण विभाग)

१०) एकसार गाव, देविदास गल्ली, (क्लब एक्वारिया), बोरिवली (पश्चिम), आर/उत्तर विभाग

(हेही वाचा – गोरेगाव – मुलुंड जोडरस्त्यांतील मालाडमधील मार्ग मोकळा; ८७ बांधकामे महापालिकेने हटवली)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.