
Corona Pandemic: करोना महामारीमुळे २०२० ते २०२३ या कालावधीत जगभरात तब्बल २ कोटी २१ लाख अतिरिक्त मृत्यू झाल्याचा धक्कादायक अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) व्यक्त केला आहे. अधिकृतरीत्या नोंदविण्यात आलेल्या ७० लाख नागरिकांच्या मृत्यूंच्या तुलनेत हा आकडा जवळपास तिप्पट असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘वर्ल्ड हेल्थ स्टॅटिस्टिक्स २०२६’ अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, कोरोना महामारीमुळे जागतिक आयुर्मान आणि निरोगी आयुष्याच्या अपेक्षेतील जवळपास दशकभराची प्रगती २०२१ पर्यंत मागे गेली. जागतिक आरोग्य व्यवस्थेसाठी हा “ऐतिहासिक प्रमाणातील धक्का” असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
हेही वाचा – Nepal मध्ये १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंवरील सीमा शुल्काला स्थगिती दिली
अहवालानुसार, २०१९ ते २०२१ दरम्यान जागतिक आयुर्मानात १.८ वर्षांची घट झाली, तर निरोगी आयुर्मान १.५ वर्षांनी कमी झाले. अलीकडच्या दशकांतील हा सर्वात मोठा घसरणीचा कालावधी मानला जात आहे.
२०२१मध्ये अतिरिक्त मृत्यूंचा उच्चांक नोंदवला गेला. त्या वर्षात जगभरात १ कोटी ४ लाख अतिरिक्त मृत्यू झाले. आरोग्य व्यवस्था प्रचंड ताणाखाली आल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. त्यानंतर २०२२ मध्ये अतिरिक्त मृत्यूंचा आकडा ४९ लाखांवर, तर २०२३ मध्ये ३३ लाखांवर आला. मात्र अनेक देश अद्याप महामारीपूर्व आरोग्यस्थितीपर्यंत पोहोचले नसल्याचा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक
जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार, ‘अतिरिक्त मृत्यू’ म्हणजे एखाद्या कालावधीत अपेक्षित मृत्यूंपेक्षा अधिक झालेली मृत्यूसंख्या. यात कोरोनामुळे थेट झालेले मृत्यू तसेच आरोग्य सेवा विस्कळीत होणे, उपचारांमध्ये झालेला विलंब यामुळे झालेले अप्रत्यक्ष मृत्यू यांचाही समावेश असतो. अहवालात पुरुषांवर महामारीचा अधिक परिणाम झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. २०२१ मध्ये महामारीच्या शिखरकाळात पुरुषांमधील अतिरिक्त मृत्यूदर महिलांच्या तुलनेत सुमारे ५० टक्के अधिक होता. ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आढळले.
अप्रत्यक्ष मृत्यूंमध्ये मोठी वाढ
महामारीदरम्यान जागतिक मृत्यू नोंदणी व्यवस्थेतील काही गंभीर त्रुटीही समोर आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. २०२३मध्ये जगभरात अंदाजे ६ कोटी १० लाख मृत्यू झाले, मात्र त्यापैकी केवळ २ कोटी १० लाख मृत्यूंची कारणांसह अधिकृत नोंद जागतिक आरोग्य संघटनेकडे झाली. त्यातील फक्त १ कोटी २० लाख मृत्यूंची वैद्यकीय प्रमाणपत्रांसह ICD कोडिंग करण्यात आली होती. कोरोना काळात लसीकरण मोहिमा, क्षयरोग (TB) आणि HIV सेवा, तसेच असंसर्गजन्य आजारांवरील उपचार मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अप्रत्यक्ष मृत्यूंमध्ये मोठी वाढ झाली.
जागतिक आरोग्य संघटनेने २०२२ मधील स्वतंत्र विश्लेषणात भारतात २०२०-२१ दरम्यान जवळपास ४७.४ लाख अतिरिक्त मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र भारत सरकारने हा दावा फेटाळला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
