-
प्रतिनिधी
FDA : उच्चभ्रू आणि आलिशान हॉटेल्समधील जेवणाचा दर्जा, सेवा आणि स्वच्छतेबाबत नागरिकांच्या नेहमीच मोठ्या अपेक्षा असतात. अशा पंचतारांकित ठिकाणांवर अन्नसुरक्षेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातात असा सर्वसामान्यांचा समज असतो. मात्र, याच प्रतिष्ठेवर बोट ठेवणारी एक घटना उघडकीस आल्याने आता नामांकित हॉटेल्समधील स्वच्छतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या प्रकाराची चित्रफीतही समोर आल्याने समाजमाध्यमांवर चांगलीच खळबळ उडाली आहे.
(हेही वाचा – Apple Foldable iPhone : भारतीयांमध्ये फोल्डिंग आयफोनची एवढी क्रेझ का? रेग्युलर आयफोनपेक्षा काय आहे खास? )
अन्नाचा दर्जा राखण्यासाठी आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये म्हणून प्रशासकीय पातळीवर कडक नियमावली आखण्यात आलेली असते. परंतु, थेट आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉटेलमध्येच नियमांची पायमल्ली झाल्याचा दावा समोर आल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संबंधित रेस्टॉरंटची प्रत्यक्ष तपासणी करून अशा निष्काळजीपणावर प्रशासन काय पावले उचलणार, यावरून सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
मुंबईतील सहार परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमधील ‘रोमानो’ (Romano) रेस्टॉरंटमध्ये शनिवारी रात्री जेवणासाठी गेलेल्या प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक सेठ यांच्या टेबलवर थेट झुरळ फिरताना आढळले. त्या झुरळाला हटवण्याचा प्रयत्न करूनही ते जागेवरून हलले नाही, ज्यामुळे जेवणाची सर्व इच्छा उडाल्याने डॉ. सेठ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जेवण न करताच तिथून काढता पाय घेतला. त्यांनी मिश्किलपणे त्या झुरळाचे नाव ‘रोची’ (Roachie) ठेवत सोशल मीडियावर घडल्या प्रकाराची माहिती दिली आणि या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी करत वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे तसेच अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) तक्रार नोंदवली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

